शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

नॉस्टाल्जिया!

 नॉस्टाल्जिया

~अमित कालेकर, फेब्रुवारी 2014

 (Do like and comment!)


काही खूप जुन्या पण त्या काळातल्या आपल्या एकदम फेव्हरेट गोष्टी-गाणी-घटना, किंवा वस्तू-वास्तु-व्यक्ती जर आपल्याला अनेक वर्षानंतर होत्या त्याच (फ़्रोझन इन टाइम!) अवस्थेत असल्यासारख्या भेटल्या, सापडल्या तर जे वाटते, तेच मला ह्या 'टायटन'च्या घड्याळाकडे बघून काल वाटले! 

1993 साली मी सोलापूरला इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षात होतो. तेंव्हा वडिलांनी हौसेने हे गोल्ड प्लेटेड 'रोयाले' घड्याळ माझ्या हाती बांधले. खूप भारी वाटलेले तेंव्हा! आणि कुणास ठाउक, पण ही वस्तू आयुष्यभर जपली जावी अशी एक भावना मनात कायम राहिली.

हे घड्याळ घालून मी असंख्य क्रिकेट म्याचेस खेळलोय. प्रॉडक्शन इंजीनियरिंग करत असल्यामुळं स्मिथि, लेथ मशीन्स, जॉब वेल्डिंगशी सतत संपर्क. पण कधीही पट्टा तुटणे, घड्याळ बंद पडणे अश्या क्षुल्लक, त्रासदायक गोष्टी घडल्याच नाहीत! तसे काचेवर 2 छोटे वेल्डिंग स्पॉट्स आहेत! पण त्या आठवणी म्हणून काच नाही बदलली!

काही इंटरव्यूजनाही हेच घड्याळ सोबतीला होते. नोकरी लागल्यानंतर पहिल्या कंपनीतली पहिल्यावहिल्या बॉसची पहिली भेट ... पहिली जॉब असाइनमेंट ... पहिला पगार ... पहिले प्रमोशन ... पहिला मुलगी बघण्याचा ऑकवर्ड प्रोग्राम ... पहिली (आणि बहुधा शेवटची!) अमेरिका वारी ... बरेच काही नॉस्टालजिक घडले ते ह्याच पिव्ळ्याधम्मक वस्तूबरोबर!

2001 मध्ये केवळ एक बदल म्हणून (आणि बायकोचा हट्ट!) एक नवे डिजिटल घड्याळ घेतले, आणि हे घड्याळ कपाटात विसावले.

पण काल सकाळी परत वडिलांचाच फोन आला. टायटन कंपनी सेल बदलून देतेय, तर तुझे घड्याळ आणून दे असा. टायटन कंपनीतला तो सेल बदलणारा कर्मचारीही हे 21-22 वर्षांपूर्वीचे घड्याळ बघून आनंदित झाला! म्हणाला की आता हे घड्याळ कंपनी बनवत नाही. किती व्यवस्थित अवस्थेत आहे हे तुमचे घड्याळ!

मग काय! परत एकदा 'गोल्डन रोयाले'ची स्वारी अस्मादिकांच्या मनगटावर विराजमान! 'जुनं ते सोनं' म्हणतात ना, ते असं खरं ठरलं!