आसाम मेघालय 2025
~ अमित कालेकर, 5 एप्रिल 2025
(लेख आवडल्यास कंमेंट, लाईक, शेअर करा!)
कुणीसं म्हटलंय, असा मी असामी.... तर हा असामी शब्द आसामी व्हायला कारण घडलं.... मायमराठी प्रांताबाहेरचं जग लहानपणापासून फारच थोडे पाहून झालेले. शाळा-कॉलेजात असताना दिल्ली, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, नैनिताल, दहावीच्या परिक्षेनन्तरच्या सुट्टीतला यूथ हॉस्टेलकडून घडलेला कुलू-मनाली ट्रेक, नोकरीनिमित्ताने हैदराबाद आणि थोडाफार आसपासचा परिसर, मागच्या वर्षीची (एप्रिल २०२४) वीणा वर्ल्डबरोबरची 'उंदीरमामा की जय' म्हणत केलेली रमणीय काश्मीर सहल, मुलीला नोकरीनिमित्त सोडायला जायचं म्हणून पाहिलं गेलेलं केरळातलं कोचीन शहर, आणि २०१८ च्या दिवाळीत पाहिलेलं प्राचीन सुंदर हम्पी, बस इतकाच भारत आजवर पाहिलेला. पूर्वोत्तर राज्यांना भेट देण्याची मनीषा कैक वर्षांपासून बाळगून होतो. इन्स्टाग्रामवर येणारे असंख्य रील्स मेघालय-आसामची ओढ लावत होते. तिथला निसर्ग, उंचसखल प्रदेश, धबधबे, झाडी बघायची उत्सुकता होती. 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल' ऐकल्यापासून तो प्रदेश समक्ष बघावा असे स्वप्न उराशी बाळगले होते! अचानक एका close family friends group मधल्या एका मैत्रिणीचा 2 मार्चला रविवारी दुपारी फोन येतो काय, मुलाच्या IIM शिलॉंगमधल्या कॉन्व्होकेशन सोहळ्यास जातोय, त्याला जोडून आपल्या ग्रुपची ट्रिप करूया का, असं विचारण्यात येतं काय, आम्ही 1 तासात होकार कळवतो काय! लग्गेच आम्हा 6 जणांच्या म्हणजे 3 कपल्सच्या व्हॉट्सप ग्रुपची स्थापनाही झाली.
नीताच्या बहिणीच्या ओळखीने पुण्यातल्याच एका प्रवासी कंपनीकडून एक चांगलं डील मिळालं, पुणे-गुवाहाटी विमानखर्च वगळून. त्यात गुवाहाटी ते गुवाहाटी अशी रोजच्या प्रवासासाठी एक आरामदायी 9 सीटर महाराजा ट्रॅव्हलर मिनीबस पण मिळाली.
मग ट्रिपच्या योजनेस पूर्णविराम देण्यासाठीची एक तातडीची कॉफी बैठकही पार पडली.
पूर्वेकडे जायची पूर्वतयारी:
तारखा ठरल्या, अन लगोलग 28 मार्च ते 3 एप्रिल ह्या तारखांदरम्यानचं विमानप्रवास बुकिंगही करून टाकलं. पुण्याहून डायरेक्ट एकच फ्लाईट आहे इंडिगोची. पुणे विमानतळ लष्कराचा असल्यानं सगळ्या फ्लाईट्स रात्रीच्या.
6 नाईट्सची मोठी ट्रिप, त्यामुळे बरीच तयारी केली. रोजचे बाहेर जातानाचे, आणि हॉटेल्सवर परतल्यानन्तरचे कपडे, swimwear, ऊन असणार म्हणून टोपी गॉगल्स, चाळीशीनन्तरचे प्रेम म्हणजे चष्मा आणि गोळ्या-औषधे, मोबाईल आणि इअरफोन्स चार्जर्स, पॉवरबँक, पर्सनल ट्रॅव्हल किट पाऊच, तहानलाडू भूकलाडू ... आणि हे सगळं चेकिन बॅगेत काय आणि केबिन बॅगेत काय, बॅगांची वजनं, थोडीशी कॅश, बरंच सव्यापसव्य! शिवाय महिन्याची सगळी बिलं 26-27 मार्चलाच भरली, तिकडं मोबाईलला रेंज नाही मिळाली तर करा काय! ट्रिपच्या निमित्ताने काही नवे कपडे खरेदी ही अटळ असते. पण सगळं अमेझॉन झिंदाबाद! अन साईझमुळं त्याची iterations होतातच, त्यामुळे तो कालावधी लक्षात घेऊन बायकोचे टोमणे मिळण्याआधीच ऑर्डरी देऊन टाकल्या. विमानप्रवासासाठी चेकिन बॅगेचे 15 किलो अन केबिन बॅगेचे 7 किलो वजन असणे जरुरीचे, मग त्यासाठी एक छोटासा वजनकाटा आणून ठेवलाय, फक्त दीडशे ग्रॅम वजनाचा, आणि 200 रुपयांचा! रोजच्या लोकल प्रवासासाठी एक बॅकपॅक पण बरोबर ठेवली. हवामानाचा अंदाज घेऊन पावसासाठी एक पोंचो जवळ ठेवला. छत्री घेऊन हिंडणे बरंच जिकिरीचे होते. त्या 7 दिवसांसाठी वर्तमानपत्र, दूध, कामवाली बंद केली. आसाम-मेघालयात पॅनकार्ड स्वीकारत नाहीत, त्यामुळे ओळखपत्र म्हणून आधारकार्ड जवळ ठेवावं लागतं.
प्रयाणाचा दिवस: 27 मार्च, गुरुवार
आजही ऑफिसला जावं लागणार होतं. थोडा लौकर म्हणजे 3 पर्यन्त घरी येऊ असं ठरवलं, पण यायला 6 झाले. सकाळीच बायकोने वेब-चेकिन करून टाकलेलं. संध्याकाळी बोर्डिंग पासेस आल्याआल्या डिजियात्रेत आमचं घोडं न्हाऊन निघालं. रात्री दोन पन्नासची फ्लाईट, त्यामुळे त्यानुसार 12 वाजताची उबर टॅक्सी बुक करून ठेवली. तसेच, आणि खूप महत्वाचे म्हणजे, ट्रिपचा कॉमन खर्च लिहून ठेवायला Splitwise हे अतिशय उपयोगी ऍप डाउनलोड करून ठेवलं आणि एकेक representative त्यात टाकून ठेवला.
दिवस पहिला: 28 मार्च, शुक्रवार, गुवाहाटी
सकाळी सुमारे 5:40 ला आमचं विमान गुवाहाटीच्या 'लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई' विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं.
बऱ्यापैकी झोप झाली होती. विमानतळावरच जुजबी आन्हिकं उरकून बाहेर आलो.
तर आमचा ड्रायव्हर सुरेश आमची वाटच बघत उभा होता. पुढचे 7 दिवस तो आता आमची यथेच्छ भ्रमंती घडवणार होता!! एक बंडल बेचव चहा घेऊन तोंडाची चव घालवत आम्ही तडक मार्गस्थ झालो, ते विख्यात अश्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी. ऑनलाइन बुकिंगचे प्रयत्न प्रचंड भक्तगणसंख्येमुळं असफल झाल्याने आम्ही दुरूनच केवळ मुखदर्शन, कळसदर्शन घेऊ असं ठरवून मंदिरात गेलो. छाने मंदिर. टेकडीवर असल्याने पायऱ्या चढत जावं लागतं. आम्हाला चांगलं दर्शन घडलं.
भारताच्या असंख्य मंदिरांप्रमाणेच ह्याही परिसरात फुलांची खूप दुकानं. पण इथं अलमोस्ट सगळ्या माळा लालभडक जास्वंदीच्या फुलांच्या! इतक्या प्रचंड प्रमाणात ही फुलं येतात तरी कुठून?? आणि बळी द्यायला अनेक बकरेही, मंदिर आवारात.
इथून बाहेर पडलो. जाम भुका लागलेल्या! "सुरेशजी, हमें कहीं अच्छे रेस्ट्रॉं ले चलो" म्हणताक्षणी 'जी साब जी' म्हणत 'सागररत्न' हॉटेलात आम्हाला नेण्यात आलं. उत्कृष्ट ब्रेकफास्ट! त्याच्या बाहेर नेपाळच्या सुप्रसिद्ध अन प्राचीन पशुपतीनाथाची प्रतिकृती असलेलं एक मंदिरही होतं.
इथून आम्ही गेलो शंकराच्या म्हणजे, उमानंद मंदिरात. तिथं नदीकाठावर 'जोलपोरी' (जलपरी!) अशी पाटी बघितली आणि तोंडाचा चंबू करत अनेकदा म्हणून बघत हसत सुटलो!
आसामी आणि बंगाली भाषा वेगवेगळ्या, पण लिपी एकच. जशी देवनागरी, जिच्यात मराठी, हिंदी अश्या अनेक भारतीय भाषा लिहिल्या जातात. ह्या फेरीबोट आपल्याला ब्रम्हपुत्रेत असलेल्या आयलंड (द्वीपकल्प!) वरच्या उमानंद मंदिराच्या पायथ्याशी नेऊन सोडतात.
ह्या उमानंद बेटावर जाता यावं म्हणून आसाम सरकारने रोपवे ही तयार केलाय! इथंच नवग्रह मंदीरसुद्धा आहे. बेटावरती झाडी बहुत!👌
इथून आम्ही मग आमच्या हॉटेलवर गेलो. रत्नमौली हे खूप छान हॉटेल! आंघोळा करून फ्रेश झालो, आणि लंच केलं.
दुपारची थोडीशी वामकुक्षी घेऊन सुमारे सव्वाचारला आम्ही ब्रम्हपुत्रा रिव्हर क्रूझवर आलो.
ह्यासाठी आम्ही 6 जणांनी व्हाइट टॉप आणि ब्ल्यू बॉटम असा ग्रुप युनिफॉर्म निवडला होता!
अत्यंत रमणीय सूर्यास्त, क्रूझवर सुरू असलेला लाईव्ह ऑर्केस्ट्रा, नवीन बांधला जात असणारा केबलस्टेड ब्रिज आणि आमची खादंती ... पुन्हा असंख्य फोटोज! ह्या क्रूझवर मी एक गाणंही गायलं. नीताने रेकॉर्डही केलं. राजेश खन्ना - वहिदाचं, किशोरने गायलेलं, बोटीतलंच ... इतके क्ल्यू दिलेत, आता ओळखा बरं कुठलं!
आता आसाम इम्पोरियमवर आमची धाड! इथं आसामी पारंपरिक साड्या, गमछे, टोप्या (जाप्पी) आणि इतर अनेक वस्तू.
अवचितपणे माझा शाळेतला एक मित्र निलेश भेटला! तो एक टूर घेऊन आला होता इथं.
दिवस दुसरा: 29 मार्च, शनिवार, काझीरंगा
सकाळी लवकर उठून आवरून चेकआउट करून आम्ही सुप्रसिद्ध काझीरंगा अभयारण्याच्या दिशेने कूच करते झालो. 430 Sq-Km च्या विस्तीर्ण प्रदेशात पसरलेल्या ह्या जंगलाला 1985 मध्ये युनेस्कोने 'वर्ल्ड हेरिटेज साईट'चा दर्जाही बहाल केलाय. वाटेत एका ठिकाणी सुरेशने स्नॅक्स आणि बायो ब्रेकसाठी थांबवलं.
इथल्या प्रदेशात लवकरच लोकल निवडणूक होणार होती, त्यामुळे ह्या हॉटेलात बरेच राजकारणी लोक सुरक्षा व्यवस्थेसह आलेले. इथून पुढं रस्ता बराच हिरवागार होता. वाटेत आम्हाला दुतर्फा आसाम चहाचे मळे लागत गेले!
काझीरंगा अजून यायचे होते, पण आमचं स्वागत चक्क गेंड्यानी करायला सुरुवातही केली!
केवढं ते एकशिंगी, अनेक घड्या, घळया पडलेल्या, डॉट्स असणाऱ्या जाडच जाड (2 इंच!) कातडीचं सुमारे 2 टनी धूड! छोटीशी शेपटी (60 cm) सतत हलवत कोवळे गवताचे शेंडे हुडकत सतत कुणी इतकं चरू कसं शकतं?? आसाम ट्रंक रोडवर एका ठिकाणी उतरून आम्ही दुर्बिणीनी भोवतालच्या जंगलाचं दर्शन घेतलं.
काझीरंग्यात आमची 2 नाईट्स राहण्याची व्यवस्था कोहोरा एरियात असलेल्या बोर्गोज नावाच्या रिसॉर्टमध्ये होती. सुमारे 4:30 PM ला आम्ही इथं दाखल झालो. काय अफाट सुंदर हे रिसॉर्ट! आधी आम्हाला पॅकेजमध्ये वेगळं मिळालं होतं, पण मग थोडेसे एक्सट्रा पैसे भरून हे मिळालं. आमची रूम अत्यंत रॉयल होती. खूप मोठा साईझ. बाथटब! मोठ्ठी, जंगलाकडे उघडणारी बाल्कनी.
आल्याआल्या बॅगा यथायोग्य ठिकाणी ठेवून आंघोळीसाठी टबात शिरलो. आवरून आमच्या रूम्सशेजारीच असणाऱ्या लॉबीत सगळेजण जमलो, आणि कुकीज, घरुन आणलेले स्नॅक्स आणि एकेक बिअर घेत जंगलाकडे बघत गार हवेत एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यात मश्गुल झालो! थोड्या वेळाने आसामी पारंपरिक बिहू नाच पाहिला. खुप सुंदर तो!
तिथून डिनरला गेलो. लवकर झोपायचं होतं आज, कारण उद्या पहाटे आणि दुपारी जंगल सफारीज होत्या!
दिवस तिसरा: 30 मार्च, रविवार, काझीरंगा
एलिफंट सफारी: सकाळी बरोब्बर 6 ला हत्ती सफारी, त्यामुळे 5 लाच उठून आवरून 5:15 ला निघालो. एकेका हत्तीवर 4 जण, आणि आम्ही 5 जण, त्यामुळे आमच्यातला एक जण दुसऱ्या हत्तीवर बसणार होता.
विस्तीर्ण गवताळ प्रदेश. इतस्ततः चरणारे शाकाहारी प्राणी, जसे की गेंडा, जंगली हत्ती, हरणे, काळवीट, नीलगाय. हत्तीच्या पाठीवरून जातोय त्यामुळं इतक्या उंचीवरून दिसणारी खालची तांबडी माती वेगळीच भासत होती. शिवाय मोठ्या झाडांच्या फांद्या हाताला लागतील इतक्या जवळून जात होत्या! जंगलातल्या वाटा जमिनीपासून थोड्या उंचीवर म्हणजे मातीचा भराव घालून बनवल्या आहेत.
चालताना हत्ती वाटेच्या इतक्या कडेला जात होते की आमचा कडेलोट होतोय की काय अशी सततची धास्ती! आमची लक्ष्मी नामक षोडशवर्षीय हत्तीण होती. बहुधा सगळ्या हत्तीणीच होत्या, सदतीस वर्षाची सर्वात वयस्कर.
आमच्या माहुताने अचानक हत्ती थांबवला, साईडला पार्क केला. आणि आम्हाला म्हणतोय, खाली बघा .... खाली होतं सुस्तावलेलं, किमान चार फुटी तरी असलेलं अजगराचं पिल्लू (Reticulated python)!! बहुधा भक्ष्य गिळून साहेब निद्राधीन झालेले!
लवकरच आम्हाला एका ठिकाणी थांबवलं गेलं, जिथं 2 छोटे गेंडे बागडत होते. त्यांचं आमच्यातर्फे 'गेंडुकली' असं सुबक नामकरण करण्यात आलं.
45 मिनिटांची सफारी आटोपून आम्ही परत स्टार्ट पॉईंटला आलो, आणि एकेक करून उतरलो. त्या हत्तींना आम्ही खाऊ खाऊ घालावा, म्हणून अनेक केळीचे घड, उसाचे कट केलेले भारे तिथं ठेवलेले. एका हत्तीला मी तो ऊस खाऊ घालत त्याच्या केसाळ सोंडेला विळखा घालून फोटो काढून घेतले. उसाच्या चरकात जसा निर्दयपणे ऊस फोडला जाऊन रस निघतो, तसाच आवाज!
परत रिसॉर्टवरती आलो, आणि आवरून 11 च्या सुमारास फेमस अश्या ऑर्किड्स गार्डनमध्ये गेलो.
तशी इथल्या झाडाझाडांवर ऑर्किड्स आहेत, पण हे पार्क म्हणजे ऑर्किड्सचा एक मॉलच आहे. अतिशय सुंदरसे रंग, आकार, पॅटर्न्स असणारी, घोसचे घोस लगडलेली परंतु अजिबात सुवासिक नसणारी ही जांभळी, पिवळी, पांढरी, केशरी, गुलाबी, लाल, अन काही चक्क काळीही फुलं. एक पिचर प्लँट सुद्धा! पण खरंतर हे पिचर नन्तर मेघालयात विपुल आढळलं आम्हाला. ह्या ऑर्किड्स पार्कच्या अगदी शेजारी कॅक्टस पार्कही आहे. ह्यातले काही निवडुंग मी आजवर अजिबात न पाहिलेले होते!
ऑर्किड्स आणि कॅक्टसच्या मी काढलेल्या फोटोजसाठी
ही लिंक पहा! तिथून पुढं आसामी पारंपरिक नृत्ये सुरू होती. आसामी कपडे, माती आणि लाकडी वस्तूंची दालनेही होती.
ह्या भागात एक प्रकारचं लिंबू मिळतं, काझी लिंबू. एकही बी नसते, खूप जाड साल, अन आंबटपणा कमी. खूप खाल्ली ती, लंच डिनर करताना.
इकडच्या ऑटो रिक्षा ही वेगळ्याच जरा!
रूमवरती परतलो, आणि मग दुपारी 2 च्या सुमारास जीप सफारीने काझीरंगा हिंडलो. ही 2 तासांची राईड अक्षरशः अवर्णनीय अशी! हारून नावाच्या ड्रायव्हरने आम्हाला माहिती सांगत हिंडवलं. ह्या 2 तासात मी तब्बल अडतीस प्रजातीचे पक्षी बघितले. लिहूनही काढले.
ही लिस्ट पहा!! हारून तर आम्हाला सांगत होताच, पण मीही 3 दा जीप थांबवून मागे घ्यायला लावली, अन 3 वेगवेगळे पक्षी आढळले! पाईड किंगफिशरने (मराठीत बंड्या, कवड्या खंड्या!) आमच्या डोळ्यादेखत स्विफ्टली सूर मारत मासा पकडून धूम ठोकली! आणि अजून एक सुख म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या 8 हत्तींचा एक मोठा कळप रस्ता क्रॉस करून जंगलाच्या या बाजूने त्या बाजूला डुलतडुलत निघून गेला! सर्वात पुढं आणि सर्वात मागं मोठे हत्ती, अन मध्ये बाळं, असा तो कळप!
एका झाडावर अस्वलाने नख्यांनी ओढलेल्या रेघा दिसल्या.
काझीरंग्यातल्या रस्त्यांवर खूप धूळ उडते, त्यामुळे एक सफारी जीप गेली, की तिच्या मागच्या जीपमधले पर्यटक धुळीत माखतात. जंगलात बऱ्याच आतपर्यंत लोकवस्ती आहे. काझीरंग्यात येण्याआधी इथं नुकतंच अत्यंत दुर्मिळ अश्या 'गोल्डन टायगर'चं सायटिंग होतंय अश्या बातम्या होत्या, पण आम्ही तितके लकी ठरलो नाही.
ह्या सफारीनन्तर येताना वाटेत आम्ही 5 वाजता लंच केलं. धामधुमीत जेवायचंच विसरलो होतो! संध्याकाळी मग बोर्गोज रिसॉर्टमध्ये मी आणि मिलिंदने भरपूर स्विमिंगही केलं.
दिवस चौथा: 31 मार्च, सोमवार, शिलाँग
परवा उशिरा निघाल्याने बसलेला वेळेचा फटका आज बसू नये म्हणून आम्ही खूपच शहाण्यासारखे वेळेआधी लवकर आवरून बसमध्ये सामानासह स्थानापन्न झालो. आजचा प्रवासही काझीरंगा ते शिलॉंग असा लॉंग होता, 280 km! आम्ही आसाम सोडलं आणि आता मेघालयात प्रवेश करते झालो. वाटेत अजिबात चांगली हॉटेल्स नाहीयेत. एका तद्दन टुकार धाब्यावर कॉफी आणि बायो ब्रेकसाठी थांबलो. तर त्याच्या गेटजवळ एक वेल बहरली होती, तिकडं लक्ष गेलं. असंख्य लाल मुंग्यांनी ती वेल व्यापून गेली होती! वीव्हर अँट्स! त्यांची 3-4 घरटी बांधणं अव्याहतपणे सुरू होतं.
दुपारी आम्ही रस्त्यात जीवा व्हेज नावाच्या एका शाकाहारी हॉटेलात लंच केलं. खूपच छान चव होती जेवणाची. साधारणपणे 5 च्या सुमारास आम्ही शिलॉंगपासून 15 km अंतरावर उमियम नावाच्या विस्तीर्ण जलाशयापाशी सूर्यास्त पाहायला थांबलो. ह्याला बारापानी लेक असंही नाव आहे. 1965 साली इथं उमियम नदीवर 60 मेगावॉट क्षमतेचा एक मोठा जलविद्युत प्रकल्प स्थापला गेला तेंव्हा ह्याची निर्मिती झाली. इथं बोटिंग आणि वॉटर स्पोर्टस करता येतात, पण ते 5 च्या आत बंद होते.
सूर्यास्ताचे अतिशय रमणीय दृश्य कॅम्येऱ्यात अन मनात भरून घेऊन मार्गस्थ झालो. शिलॉंगमधल्या ऍक्रोपोलीस हॉटेलात गाडी येऊन पोचली तेव्हा 7:15 वाजून गेलेले. बरंच ट्रॅफिक लागलं वाटेत. इथं सूट सांगून नेमकी आमच्या वाट्याला खूप छोटी रूम आली! भांडावं लागलं मग. पण त्यांचं डिनर छान होतं. शिलॉंग बरंच थंड होतं. दिवसा 26℃ अन रात्री 15℃. त्यामुळे इथं हॉटेल्समध्ये AC नसतात.
दिवस पाचवा: 1 एप्रिल, मंगळवार, चेरापुंजी
आजचा दिवस परत भरपूर प्रवासाचा होता. आम्ही चेरापुंजी, म्हणजे भारतातल्या सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या गावाकडे निघालो. खूप वळणावळणाचे अन डोंगराळ भागातले रस्ते असूनही रस्त्यांची क्वालिटी खूपच चांगली होती. शिलॉंग हे नॉर्थ ईस्ट भागातले सर्वात मोठे भारतीय हवाईदलाचे केंद्र आहे. इथं एक खूप मोठं म्युझियमही आहे. महेशचा एक खूप जवळचा मित्र इथं मोठ्या पदावर आहे. त्याने आम्हाला ते म्युझियम दाखवलं. अनेक लढाऊ विमानांच्या प्रतिकृती किंवा खरी मॉडेल्स इथं ठेवली आहेत.
ते पाहून आम्ही पुढं निघालो.
आमच्या गाडीत मुव्ही बघायसाठी LCD स्क्रीनची सोय होती, त्यावर आम्ही अमिताभचा दीवार सिनेमा परत एकदा पाहिला.
इथून आम्ही लगोलग elephant falls पहायला गेलो. मार्च-एप्रिलमध्येही इथं धबधब्याला पाणी होतं. बरंच खाली खाली उतरत जावं लागतं. सुंदर जागा ही.
ह्यानंतर आम्ही चेरापुंजीत पोचलो. पोचायच्या आधी थोडासा पाऊस पडून गेल्याने वातावरण ढगाळ अन आल्हाददायक होतं. आता आम्ही Garden of caves मध्ये शिरलो. ही एकूण 13-14 ठिकाणे आहेत, अन खाली खाली उतरत जायचं. सगळीकडे कोसळणारं, झिरपणारं पाणी. इथला बांबू ब्रिज खूपच भारी बांधलाय. खाली गर्द झाडी बघत त्यावरून चालायला जाम मजा आली. मुख्य म्हणजे अनुराधाने हे सगळे चढउतार सहजपणे केले! तिचा गुडघा दुखत असतानाही. ह्या धबधब्यांच्या पाण्यात आम्ही सगळ्यानी भिजून घेतलं.
इथून बाहेर पडून आम्ही Arwah Caves पाहायला गेलो. कॅल्शियम डिपॉझिट्सच्या आणि जीवाश्मांच्या ह्या गुहा. आजूबाजूला अत्यन्त प्रेक्षणीय दरी आणि झाडी, आणि ही पायवाट डोंगराच्या कडेकडेने. आतमध्ये लाईट्सची सोय आहे, पण आपण आत असताना जर ती गेली, तर आदिम काळ्याकुट्ट काळोखात कुठं हरवून जाऊ ह्याची धास्ती!
चेरापुंजीत इतका पाऊस पडतो, पण आम्ही तिथं पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे टँकर्स पाहिले!😢
साधारणपणे 4:30 वाजायच्या सुमारास ऑरेंज रुट्स नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो. 2015 साली उघडलेलं चेरापुंजीतलं हे पहिलं व्हेज रेस्टॉरंट. अपर्णाच्या आईबाबांनी खास आग्रह करून आम्हाला इथं स्नॅक्स खायला थांबायला सांगितलं होतं. चव अर्थात छान होती.
रात्री ऍक्रोपोलीस हॉटेलात परतलो.
दिवस सहावा: 2 एप्रिल, बुधवार, डावकी
आज आम्ही भारत बांगलादेश सरहद्दीवरच्या डावकी गावाला जायला निघालो. ह्या संपूर्ण परिसरात भरपूर पाऊस, त्यामुळे फार गर्द झाडी आहे. डावकी गावातून उमंगोट नावाची नदी वाहते. तिचा तळ स्वच्छ दिसतो, अशी ख्याती आहे ह्या पाण्याची. पण कालच पाऊस पडून गेल्याने आमच्या नशिबी गढुळाचं पाणी! ह्या नदीतून नावाड्याने वल्हवत न्यायच्या अन 3 प्रवासी बसतील अश्या लाकडी नावेने सुमारे 45 मिनिटे प्रवास करता आला. खोल दरीतून ही नदी वाहते, आणि दुतर्फा उंच डोंगररांगा अन झाडी.
डावकी गावातच थोडीशी पेटपूजा उरकली. मोस्टली फलाहारच! इथं त्यांच्या टिपिकल टोप्या घालून फोटोजही काढले!
इथून आम्ही परत फिरलो, आणि वाटेत आम्हाला महाप्रपाती असा मावलीनॉंग धबधबा लागला! गोव्याच्या दूधसागर धबधब्याची आठवण करून देणाऱ्या ह्या दृश्याला डोळ्यांत अन कॅमेऱ्यातही कैद करत सुटलो. इथं बॉर्डर असल्याने आमच्या मोबाईल्सनी एअरटेल बांगला नेटवर्क पकडून आम्हाला अर्धा तास लवकरची प्रमाणवेळ दाखवायला सुरुवात केली!
इथून निघून आम्ही गेलो जगातलं सर्वात स्वच्छ गाव मावलीनॉंग पाहायला. इथं आधी एका टपरीवजा हॉटेलात आमटी भात आणि इथल्या लोकल पापडांचा आस्वाद घेतला.
आता आम्हाला नोहवेट (किंवा nongthymmai) गावातल्या लिव्हिंग रूट ब्रिजची ओढ लागली. कैक हजारो वर्षांपासून नदीच्या प्रवाहामुळे खालच्या मातीची धूप होऊन वडाच्या महाप्रचंड झाडांची एकमेकांत गुंतलेली मुळं उघडी पडून असे अनेक रूट ब्रिजेस ह्या भागात तयार झालेले असावेत. मुळं इतकी भक्कम, की आरामात चालत नदी पार करता येते. खळाळत वाहणारी नदी, गर्द झाडी, नदीतल्या प्रचंड प्राचीन शिळा, त्यात पाण्याच्या प्रवाहाने बनलेले खळगे ह्यामुळं ह्या परिसरात मला सुमारे हजार वर्षे मागे गेल्याचा भास होत होता.
संध्याकाळी ऍक्रोपोलीस हॉटेलात परतलो.
दिवस सातवा: 3 एप्रिल, गुरुवार, शिलाँग-गुवाहाटी
आज आमचं इथून चेकआउट होतं. आज थोडं निवांत उठून आवरून ब्रेकफास्ट केला. बॅगांची वजनं केली. 12:30 ला चेकआउट केलं आणि आम्ही IIM शिलॉंगकडे निघालो. उमसावली भागात सुमारे 120 एकरात हे मोठं कॅम्पस 2007 साली बांधण्यात आलेलं आहे. campus in clouds असं म्हटलं जातं ह्याला. थोडंफार हिंडून, इथलं सुंदर ग्रंथालय पाहून आम्ही बाहेर पडलो.
आता आम्ही चौघेच परतीचा प्रवास करणार होतो. भूक लागलेली, मग एका छानश्या दिसणाऱ्या हॉटेलात शिरलो. जेवण खूपच टेस्टी मिळालं! इथल्या वेटर चं बोलणं मात्र अगदी कानात प्राण आणून ऐकावं लागत होतं☺️
इथून आम्ही सुप्रसिद्ध वॉर्डस लेकला आलो. ह्याला स्थानिक लोक Pollock Lake असेही म्हणतात. 1894 साली ह्या घोड्याच्या आकाराच्या तळ्याची निर्मिती आसामचा चीफ कमिशनर विल्यम वॉर्डने केली. अत्यंत सुंदर बाग खूप जपली आहे. विविध प्रकारची फुलझाडं अन मोठमोठे वृक्ष इथं आहेत.
परतीचा प्रवास!
दुपारीच वेब चेकिन करून टाकलं. सुमारे 5 वाजता वॉर्डस लेकला अलविदा करत आम्ही परत गुवाहाटीकडे निघालो. सुमारे 120 km अंतर आहे हे, आणि 3 तासात पार करू असं वाटल्याने निवांत होतो. पण ... साधारणपणे 6 च्या सुमारास आम्ही जीवा व्हेजमध्ये पोचलो आणि डिनर घेतलं. आणि मग... रस्त्यात आम्हाला महाप्रचंड ट्रॅफिक जॅम लागला! म्हणजे जे आम्ही 8, फारतर 8:30 ला गुवाहाटी विमानतळावर पोचायचे, ते 10 ला पोचलो! सव्वादहाला चेकिन बंद होणार होतं आणि आमचं विमान 11:10 pm ला उडणार होतं. सुरेशने त्याच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत सगळं कसब पणाला लावत गर्दीतून गाडी बाहेर काढत आम्हाला वेळेत पोचवलं.
डिजियात्रा असल्याने 5 मिनिटांत आम्ही आत शिरलो, आणि सिक्युरिटी सोपस्कार पार पाडले. इथंही आमची बॅग उगाचच दुसऱ्यांदा तपासली गेली. कारण काय, तर उगीच. आता थोडा वेळ हाताशी होता, मग पोटपूजा उरकली. एअरपोर्टवर सगळं इतकं महाग असतं, अन क्वालिटी अत्यंत रद्दी. नशीब, विमान वेळेवर सुटलं. 3 वाजता पुणे विमानतळावर सुखरूपपणे उतरलो. नवीन टर्मिनल खूपच मस्त केलंय, पण जी बससेवा दिलीय तीत फक्त माणसांच्या प्रवासाचा विचार केलाय, यांच्यासह असणाऱ्या सामानाचा नाही! शिवाय तो एरोमॉल प्रकार विचित्र आहे. लिफ्टसमध्ये नक्की कुठल्या मजल्यावर उतरून ओला / उबर घ्यायची त्याची माहिती नाही.
उबर इनोव्हा बुक केली, आणि 4 जण परत हसतखिदळत अन आता पुढची ट्रिप कुठं कधी कशी करायची त्याचे मनसुबे डिस्कस करत आपापल्या घरी परतते झालो! 15 ℃ मधून 40 ℃ त आल्याचं शल्य, परन्तु एक अविस्मरणीय आनंदी अशी ट्रिप सुफळ संपूर्ण केल्याचं समाधान बाळगत झोपी गेलो!