रविवार, २३ एप्रिल, २०१७

S-P आणि बॅडमिंटन!

S-P!

~अमित कालेकर
23 एप्रिल 2017 (Do like and comment!)

भारताच्या बॅडमिंटनसाठी 2 आद्याक्षरं लकी आहेत. P आणि S. कसं? चला बघूया कसं.

प्रकाश पदुकोण यांनी पहिल्यांदा जागतिक प्रतिष्ठेची 'ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप' (1980) जिंकली. त्यांना 1982 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. आद्याक्षर P.
नंतर ती स्पर्धा पुलेल्ला गोपीचंद याने (2001) जिंकून बॅडमिंटनविश्वात आपलं एक अढळस्थान निर्माण केलं. गोपीचंद इतकंच करून थांबला नाही. 6 कोटी रुपये खर्चून (त्यासाठी स्वतःचं राहतं घर गहाण ठेवून) त्याने हैद्राबादला बॅडमिंटन अकॅडमी स्थापली आणि आणि अनेक प्रतिभावान मुलामुलींना बॅडमिंटन शिकवलं, त्याची माहिती खाली येईलच. खरा 'द्रोणाचार्य' पुरस्कार विजेता (2009), आणि 2014मध्ये पद्मभूषण! आद्याक्षर P.
मधल्या काळात महाराष्ट्राची कन्या अपर्णा पोपट ही राष्ट्रीय स्तरावर खूप नावाजली गेली होती, अनेक वर्षे. तिने सलग 9 वेळा (1997 - 2006) राष्ट्रीय स्पर्धा जिंकून विक्रम केलाय (पुरुषांमध्ये प्रकाश पदुकोण यांच्या नावावरही हा विक्रम आहे). आद्याक्षर P.

हल्ली पारूपल्ली कश्यप हा गोपीचंद यांचा पट्टशिष्य बहरात आहे. त्याने 2014 ची ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धा जिंकली. आद्याक्षर P.
अश्विनी पोनाप्पा ही 2007 पासून वूमन्स आणि मिक्स्ड डबल्स स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. तिने 2011 च्या लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वूमन्स डबल्स मध्ये कांस्यपदक मिळवून पदकांची मालिका सुरू केली. 2010 (दिल्ली) आणि 2018 (गोल्ड कोस्ट) च्या कॉमनववेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण मिळवलं. आद्याक्षर P.



हे झालं P बद्दल. आता S बद्दल.

सैद मोदी हे नाव नव्वदीच्या दशकात भारतीयांसाठी बॅडमिंटनमधलं एक आशास्थान होतं. त्यांच्या नावे आता भारतात सर्वोच्च प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा दरवर्षी भरवली जाते. आद्याक्षर S.
साईना नेहवाल ही गोपीचंद यांचीच एक आघाडीची शिष्या. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकेरीत ब्रॉन्झपदक पटकावून भारताची शान बनली साईना. तिच्यामुळे बॅडमिंटन या खेळाला भारतात एक वलय प्राप्त झालं, नव्या पिढीची मुलं या खेळात करिअर करता येऊ शकतं या विश्वासावर राहू लागलीत. बॅडमिंटनमधल्या अनेक वर्षांच्या चायनीज वर्चस्वाला समर्थ टक्कर देऊन काही अव्वल दर्जाच्या सुपर सिरीज स्पर्धा जिंकून जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेणारी साईना! तिला 2016 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं! आद्याक्षर S.
B साईप्रणीत हा भारताचा उगवता तारा, ज्याने कालपरवाच (2017) सिंगापूर ओपन ही खास स्पर्धा आपला सहकारी आणि जवळचा मित्र किडांबि श्रीकांत याला हरवून जिंकली. आद्याक्षर S.


श्रीकांत किडांबिने BWF सुपरसिरीज 6 वेळा जिंकलीय! शिवाय, BWF ग्रँड प्रिक्स 3 वेळा! 2022 च्या थॉमस कप मध्ये भारताने जिंकून इतिहास घडवला, त्यात श्रीकांत होता! हे दोघेही पूर्ण भरात आहेत, आणि वय या दोघांच्या बाजूने असल्यामुळं आपल्याला पुढची काही वर्षं अनेक चांगल्या लढती बघायला मिळणार आहेत! दोघांचीही आद्याक्षरं S. हे दोघेही पुन्हा एकदा द ग्रेट गोपीचंद यांचेच शिष्य!



लक्ष्य सेन: 2022 च्या थॉमस कप मध्ये भारताने जिंकून इतिहास घडवला, त्यात लक्ष्य होता! शिवाय 2022 मध्ये त्याने कॉमनवेल्थ मध्येही सुवर्ण पदक जिंकलं. तो आत्ता फक्त 22 वर्षांचा आहे, आणि पुढे चमकते करिअर करण्याची क्षमता बाळगून आहे! आद्याक्षर S.

आणि आता आपली रौप्यकन्या ... ओळखा कोण? तीच ती, अनेक वर्षं साईना नेहवालच्या छायेत राहून आता मात्र स्वतः च्या दैदिप्यमान यशाने आपणा सर्व भारतीयांची आन बान शान बनलेली ... पुसारला वेंकटा, किंवा PV सिंधू! 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत बेधडक धडक मारून सिंधूनं रौप्यपदक निश्चित केलं, आणि मग अंतिम फेरीत पहिला गेम जिंकून सुवर्णपदकाकडे वाटचाल सुरू केली. पण शेवटी खेळात हारजीत चालतेच, या न्यायाने तिला सिल्व्हर मेडल मिळालं. आणि ती आता साईनानंतर भारताचं प्रमुख आशास्थान बनलीय! परवाच तिनं सैद मोदी स्पर्धेत साईनाला सहज हरवलं. शिवाय 'इंडियन बॅडमिंटन लीग' मध्ये तिने स्पेनच्या अव्वल मानांकित कॅरोलिना मारीनला 2 सरळ गेम्समध्ये हरवत रिओ ऑलिम्पिकमधल्या पराभवाचा वचपा काढला! तिला 2020 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं!  आद्याक्षरं P आणि S!

तर मंडळी, सांगायचा मुख्य मुद्दा हा, की जे भारतीय S-P आहेत त्यांनी आता आत्मविश्वासाने तयारीला लागावं, यश त्यांच्या नक्कीच पाठीशी आहे! (मी मात्र A-K असल्याने असल्या भानगडीत पडत नाही!😊😊😊)