शनिवार, २३ डिसेंबर, २०१७

बाबासाहेब पुरंदरे

बाबासाहेब पुरंदरे

~अमित कालेकर, 24 डिसेंबर 2017 (Do like and comment!)

21 आणि 23 डिसेंबरला 'अफझलखान' या विषयावर इतिहासकार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांची व्याख्यानं आयोजित केली होती त्यामुळं ऑफिसातून लवकर (6 ला) येऊन ती ऐकायची होती. ते नेहमीप्रमाणेच वेळेपूर्वी स्थानापन्न झालेले! मला मात्र 5 मिनिटे उशीर. माझ्याआधी थोडा उशीर झालेल्या एका लहानग्याला त्यांनी धारेवर धरलं होतं (त्यामुळे मी वाचलो!). दिलेलं वचन आणि दिलेली वेळ पाळणं सर्वात महत्त्वाचं हे ते सांगतात. नेताजी पालकरसारख्या आपल्या सर्वात शूर, विश्वासू सहकाऱ्याला, सरसेनापतीला शिवाजी महाराजांनी महत्वाची वेळ पाळली नाही आणि त्यामुळे एका मोठ्या लढाईत सपशेल अपयश आलं म्हणून बडतर्फ केलं हेही बाबासाहेब आवर्जून सांगतात. अफझलखान हा विषय आपल्याला नवा नाही. शिवचरित्रातल्या असंख्य रोमहर्षक प्रसंगांपैकी तो वरच्या काही प्रसंगांत मोडेल. शालेय चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातही तो होताच. आमचे नूमवी सोलापूरचे तडसरे सर काय पोटतिडिकीने शिकवत इतिहास! 👌 मला त्या प्रसंगातले आणखी काही बारकावे ऐकण्याची इच्छा होती. आणि बाबासाहेबांनी निराश नाहीच केले! अफझलखान स्वराज्यावर स्वारीस आला, तो पुण्याच्या ऐवजी सोलापूर-हैदराबाद-नळदुर्ग भागाकडे आधी गेला, हे माहीत आहेच. पण तिकडं तो नक्की कुठं कुठं आणि कसा गेला, त्याचं नेमकं पर्पज काय होतं आणि महाराजांनी ते कसं आधीच हेरलं होतं ते बाबासाहेबांनी सविस्तर सांगितले. कसे? तर आपल्या थरथरत्या हातात मॉडर्न स्टाईलचा व्हाईटबोर्ड मार्कर घेऊन नकाशा काढत! अगदी छोट्या गावांच्या आणि तिथल्या देवळांच्या नाव आणि महात्म्यासह. काय अचाट स्मरणशक्ती! पुराव्याशिवाय एक शब्दही ते बाहेरचा बोलत नाहीत. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागाचा उल्लेख नुसता मोठ्या गावाने न करता त्याच्या आजूबाजूस असलेल्या छोट्या गावांची नावे, तिथले शिवरायांचे शिलेदार, त्यांची त्या त्या प्रसंगाच्या वेळची वयं, त्यांचे व्यवसाय, त्यांचं सामान्यत्व, त्यांची मनस्थिती, त्यांचे भाऊबंद, त्यांचा स्वराज्याला वेळोवेळी झालेला उपयोग ... किती किती डिटेल्स! शिवाय अस्सल पुरावे. आणि ते कुणी कधी दिले ह्याचेही तारीखवार वर्णन! शिवाजी राजाने ह्या सामान्य जनतेकडून किती असामान्य दर्जाची कामगिरी केवळ आपल्या शब्दाने आणि प्रभावाने करवून घेतली! हा संदेश बाबासाहेब सतत आपल्यापर्यंत पोचवतच राहतात. त्यांचं कळकळीचं म्हणणं असतं, की शिवचरित्र हे फक्त मनोरंजन नाही. फक्त तोडलेली बोटे, बिचव्याने काढलेला कोथळा, पेटाऱ्यातून पलायन ह्या रोमांचक प्रसंगापुरते मर्यादित नाही. वेळेचा, परिस्थितीचा, माणसांचा, साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर कसा करावा, शिवचरित्राचा बोध घेऊन सर्वांनी वागले पाहिजे, राष्ट्रवाद सर्वात महत्वाचा, स्वयंशिस्त अतिशय महत्त्वाची हे विचार बाबासाहेब आपल्यात रुजवू इच्छितात. त्यासाठी ते शिवचरित्रापलीकडेही जाऊन नेपोलियन, महायुद्धं, असंख्य पौराणिक दाखलेही देतात. पुराणातली वांगी असं म्हणून सोडून न देता ते कृष्ण आणि शिवाजी ह्यांची तुलना करतात. शिवाजी हा कृष्णाचा सच्चा अनुयायी होता, असे ते आपल्याला अनेक प्रसंगांतून पटवून देतात. राष्ट्रधर्म दोघांच्यात ठासून भरला होता हे सांगतात. त्यासाठी नीती-अनीतीच्या पलीकडे जाण्यासही दोघे कसे कचरले नाहीत हेही उदाहरणे देऊन सांगतात. कृष्णाने अर्जुनाला चाक रुतलेल्या स्थितीत असलेल्या कर्णाला 'हीच ती वेळ, तू त्याला आत्ताच मार' असं सांगत नीती अनितीचा विचार करण्याची ही वेळ नाही, ते नंतर बघू असं सांगितलं, आणि शिवाजींनीसुद्धा ह्याचा अवलंब करून शत्रूला नामोहरम केलं हेही सांगितलं. कमीतकमी साधनसामुग्री, माणसं, युद्धसाहित्य असूनही केवळ परफेक्ट युद्धनीतीच्या जोरावर शिवाजी कसा सर्वांपेक्षा वरचढ, विजयी कसा होत गेला ह्याची असंख्य उदाहरणे ते देतात. त्याचवेळी इतर अनेक शूरवीरांना, राजांना त्यांच्या महत्वाकांक्षी मोहिमांमध्ये का अपयश आलं (ते योग्य ती स्ट्रॅटेजी नसल्याने) त्याचा अभ्यास ते आपल्यापुढे मांडतात. संख्याबळ कधीच शिवाजीच्या बाजूला नव्हते. होती ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मावळ्यांमध्ये जागवलेली स्वामी आणि राष्ट्रनिष्ठा. दर वेळी वेगळा आणि अधिक प्रबळ, मातब्बर शत्रू असूनही शिवरायांची नीती सतत वेगळी असल्यामुळे ते सतत अन्प्रेडिक्टेबल होत राहिले. अफझलखान विजयाची खात्री करून घेऊन नंतर पुढं काय, कसं, कुणी, कधी, कुठं करायचं ह्याची तपशीलवार योजना तयार असल्यामुळे फक्त 10-15 दिवसात शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा प्रचंड मुलुख काबीज केला आणि आदिलशाही मोडकळीस आणली. त्या प्रसंगात महाराजांचं काही बरेवाईट झालं असतं, तरीही ही योजना 100% सफल झालीच असती ह्या लेव्हलचं हे प्लॅनिंग होतं.
ह्या वयातही बाबासाहेबांच्या आवाजातल्या तेजाला तोड नाही. शिवाजी म्हटलं की ते विशीपंचविशीचेच होऊन जातात! शिवरायांचं हेरखातं हा तर त्यांचा एक अतिशय आवडीचा आणि अभिमानाचा विषय आहे. बहिर्जी नाईक आणि इतर सर्वांबद्दल ते अतिशय औत्सुख्याने बोलतात, त्यांचे डिटेल्स आणि महानता ते आपल्याला भरभरून सांगतात. बहिर्जी हा गागाभट्टाच्या बुद्धिमत्तेचा होता, त्याचा जातधर्म कुठला होता हे गौण आहे असेच त्यांचे म्हणणे आहे आणि ते सर्वार्थाने खरेही आहे.
बाबासाहेब त्यांच्या शारीरिक उमेदीच्या वर्षांत सगळा मुलूख स्वतः पायी / सायकल / ST / गाडी असा हिंडलेत. रायगड राजगड सिंहगड आणि इतरही असंख्य किल्ल्यांच्या त्यांनी अगणितवेळा वाऱ्या केलेल्यात! त्यांचं वाचन अफाट आहे. शिवकालीन पुरावा सापडलाय असं कुणी म्हटलं तर आजही वयाच्या 95 व्या वर्षी ते धावत जाऊन तो आपल्याकडे खेचून आणू शकतील! त्यांचा शिवाजीबरोबरच त्यावेळच्या इतर सर्व इतिहासावर तितकाच दांडगा अभ्यास आहे. त्यांना पेशवेकालीन इतिहासही अवगत आहे. तसाच विजयनगर, बहामनी राज्य ह्यावरही ते खूप लिहू बोलू शकतात, किंबहुना त्यांनी लिहिलंही असेल! त्यांनी 'शिवाजीची वाघनखं' ह्यावर स्वतः एक लेख सुमारे 40 वर्षांपूर्वी लिहिला होता हेही आम्हाला सांगितले! (ती वाघनखं आता लंडनमध्ये म्युझियममध्ये आहेत.) शिवाजी महाराजांच्या 'भवानी तलवारी'बद्दलही, ती कुठं बनवली (स्पेनमध्ये), काय मटेरियलची (पोलाद) होती हेही ते सांगतात.
बाबासाहेबांची मराठीसारखीच इंग्लिशवरही खूप पकड आहे. अफझलखानाने लपवून आणलेली 'कृपाणिका' उजव्या हाताने उगारून महाराजांवर त्यांच्या उजव्या बगलेत पहिला वार केला असे सांगताना त्यांनी कृपाण म्हणजे मोठी तलवार आणि कृपाणिका हे त्याचं 'diminutive' असून त्याचा अर्थ छोटी तलवार आहे असं, ती किती असू शकेल हे तळहाताच्या मापाने दाखवत सांगितलं! किती बारीक वर्णन! तो वार महाराजांच्या चिलखतामुळे निष्प्रभ ठरला हे समजल्यानंतर त्याने दुसरा घाव घालण्यासाठी हात उगारला, तेंव्हा तो वार कुठं घालावा ह्याच्याबद्दल त्याच्या मनात काय होतं हेही बाबासाहेबांनी सांगितलं! भेटीची वेळ (म्हणजे दुपारचे 2) काय ठरली होती आणि नक्की कितीला घडली त्याविषयीसुद्धा त्यांनी एक अस्सल दाखला (बखरीतलं वाक्य) जसाच्या तसा सांगून टाकला. 
(हा लेख बायकोला व्हाट्सअपवर पाठवला तेंव्हा तिला 'Read more' लिंक दिसली! गमतीने मी तिला म्हणालो की आज मला पहिल्यांदा पुरवणी घ्यावी लागलीय!)
ह्या विषयावर कितीही लिहिलं तरी ते अपुरं ठरेल. म्हणून इथंच थांबतो, आणि बाबासाहेबांना असंच पुढं अनेक वर्षं ऐकत राहण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य आणि स्वास्थ्य चिंततो!