मंगळवार, ३१ जुलै, २०१८

पासपोर्ट!

पासपोर्ट डिपार्टमेंटच्या कार्यक्षमतेची कमाल!

~ अमित कालेकर, 1 ऑगस्ट 2018, पुणे (Do like and comment!)

शुक्रवारी, 27 जुलैला आईच्या पासपोर्ट रिन्युअलची अपॉईंटमेंट घेतली. (अगदी, कार्यालयीन मराठीतच लिहायचं, तर 'पारपत्राच्या नूतनीकरणाची आगाऊ वेळ'! पण असं लिहिलं तर हल्ली किती जणांना कळेल?? 😀 जाऊद्या, इंग्रजाळलेल्या भाषेतच लिहितो!) ऑनलाइन फॉर्म भरला, तोही फक्त 15 मिनिटांत. पासपोर्ट अजून काही दिवस व्हॅलीड असल्याने फक्त आधार कार्ड आणि पासपोर्ट नंबर टाईप करावा लागला. (आधार व्हॅलीडेशन पण अक्षरशः एका मिनिटात ऑनलाईन होतं! UIDAI साईटची त्वरित संलग्नता!) इतर कुठलेही डॉक्युमेंट्स नाही लागले.
अपॉइंटमेंट नॉर्मल घेतली, तात्काळ नाही. पण, सोमवारची, म्हणजे 30 जुलै, 3:30 PM ची मिळाली. एकच दिवसानंतरची! (शनिवार-रविवार नका हो लगेच मोजून '3 दिवस की हो', असे म्हणू! पासपोर्ट ऑफिसलाही 5 वर्किंग डेज आहेत!) अपॉईंटमेंट घेतानाही, आपण आपल्याला हवी ती तारीख निवडू शकतो. आणि एकदा घेतलेली अपॉईंटमेंट आपल्याला जमत नसल्यास अजून एकदा पोस्टपोन करून मिळू शकते.
आई-पप्पा सोमवारी जरा लवकरच, म्हणजे पावणेतीनलाच मुंढवा ऑफिसात पोचले. MSEB बिल, 2-3 फोटोज वगैरे घेऊन. तर, त्यांना लगेचच आत घेतले. सव्वातीनला प्रोसिजर पूर्ण होऊन ते बाहेरही पडले! आतमध्ये 4-5 टेबलांवर जाऊन काही कागदपत्रे, फोटोज काढणे, डॉक्युमेंट स्कॅनिंग वगैरे अशी काहीशी ती प्रोसेस असते. बरोबर आणलेली इतर कागदपत्रे, फोटोसुद्धा लागले नाहीत, फक्त पासपोर्ट आणि आधार कार्ड बास.
आणि, आश्चर्याचा शेवटचा धक्का म्हणजे आज, बुधवार 1 ऑगस्टला पासपोर्ट घरपोच आलाही!!!

जबरदस्त काम! 👌🏼👌🏼👌🏼 कशाला हवंय तात्काळ! किंबहुना, आता असं म्हणावंसं वाटतंय, की तात्काळ केलं असतं, तर पासपोर्ट तिथेच सोमवारी आईच्या हातातच दिला असता!!

प्रायव्हेटायझेशनचा हा एक अतिशय उत्कृष्ट नमुना! थँक्स गव्हर्नमेंट आणि TCS कंपनी, अतिशय कार्यक्षम गव्हर्नन्स! 👌👌👌👌आणि, ह्या सगळ्या कामाची फी फक्त ₹ 1,500/-. इतक्या जलदगतीने जर आपलं काम होत असेल तर ते खरंच वर्थ!

ता.क.: जर का व्हॅलीड पासपोर्ट नंबर मी ऑनलाइन फॉर्म भरताना  दिला, तर .... तो अर्ज भरायला मला 15 मिनिटं तरी का लागावीत! 😀😀😀 आमची सगळी माहिती तर आहेच की पारपत्र कार्यालयाकडे! (आता, ह्याला म्हणतात, मूर्तिमंत हावरटपणा! आणि म्हटलं, की माझ्या ह्या लेखाचा शेवटही मायम्हराटीतच करावा! रेडिओ fm 95 वर हल्ली म्हणे सलग 30 सेकंद मराठीत, एकही इंग्रजी शब्द न उच्चारता बोललं, तर चांगलं बक्षीस मिळतं! इच्छुकांनी / जाणकारांनी 'अख्ख्या पुण्यात वर्ल्ड फेमस' असलेल्या त्या 'RJ बंड्याला' फोन ... चुकलं ... दूरभाष / भ्रमणध्वनी लावावा!)