गुरुवार, ७ ऑक्टोबर, २०२१

कोरफड!

कोरफड


फिरुनि फुलला घरात माझ्या दांडा कोरफडीचा
उमलोत्सव मग सुरू होऊदे त्याच्या सोनकळींचा।।१।।

नारिंगी अन लांबसडक ती फुले लगडतीं त्यास
कुठूनि येई गंध तयांचा छोट्या पक्ष्यांस।।२।।

रोज उमलती फुले तयाची खालोनि वर वर
विविधरंगी ते सूर्यपक्षी मग धरती अविरत फेर।।३।।

बाकदार ती चोच कशी मग शोषी मकरंदास
उलटे होऊनि कसरती करती नाना प्रयास।।४।।

मला पर्वणी उभा घेऊनि हाती कॅमेऱ्यास
पक्ष्यांना परि न दिसे मी तो राही आडोश्यास।।५।।

खेळ सुरू हा उन्हात रोजचि अर्धा श्रावण मास
अखेर संपति फुले सगळि ती आला तो दिवस।।६।।

उदास भलते वाटू लागे माझीया मनास
पुढच्या श्रावणमासाचि मग लागे डोळ्यां आस।।७।।

~ अमित कालेकर, 7 ऑक्टोबर 2021
 (Do like and comment!)

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

ब्राह्मणी घार!

ब्राह्मणी घार!
~ अमित कालेकर
जानेवारी २०२१

साधारण तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्याहून मी आणि माझी आई माझ्या शेताकडे निघालो होतो. अकलूज रस्त्यावर सराटी नावाच्या एका गावाला पार करून थोडंसं पुढे जात असताना अचानकपणे माझी नजर कार ड्रायव्हिंग करता करता थोडीशी वर एका झाडावरती गेली. झाड तसं निष्पर्ण म्हणण्याच्या कॅटेगरीतलं होतं. पण जमिनीपासून सुमारे ३० ते ४० फुटावरती झाडाच्या एका बेचक्यात मला एक घरटं दिसलं. त्याच्यात एक गरुड सदृश पक्षी बसला होता. आणि दुसरा सिमिलर पक्षी आकाशात उडत होता, त्या घरट्यावरती घिरट्या घालत. दिसायला दोघेही सेमच त्याच्यामुळे नर आणि मादी कोण ते ओळखू येत नव्हते. मी तातडीने गाडी साईडला घेतली आणि कॅमेरा बाहेर काढला. (नशिबाने कॅमेरा बरोबर होता, त्याच्यात मेमरी कार्ड होतं आणि कॅमेऱ्याची बॅटरी फुल चार्ज्डही होती!! हे सर्व गुण जुळून येणे माझ्यासारख्या आळशी, धांदरट माणसाच्या आयुष्यात खूप अवघड असते!) पटकन हवी तशी सेटिंग्ज केली आणि काही फोटोज काढले. स्थिर असतानाचे सेटिंग्ज वेगळे आणि उडतानाचे वेगळे, शटर स्पीडमुळे. बऱ्यापैकी चांगले फोटोज मिळाले होते, लाईट चांगला असल्यामुळे. फोटोज झूम करून पाहिल्यानंतर लक्षात आलं की ही ब्राह्मणी घार (Brahminy  Kite) आहे. शास्त्रीय नाव: Haliastur indus. हिलाच समुद्री घार असेही म्हणतात. मोठा आणि डौलदार, रुबाबदार असा पक्षी. मस्त बाकदार, तीक्ष्ण, पिवळी चोच. पांढरी शुभ्र मान आणि तपकिरी रंगाचे पंख.


या सराटी गावानंतर लगेचच नीरा नदी लागते आणि या ब्राह्मणी घारीला नदीतले मासे, मृत खेकडे आणि इतर छोटे छोटे कीटक खाण्यासाठी हे घरटं खूप सोयीचं पडत असावं. कधी कधी हे ससे आणि वटवाघळेही मारून खातात. यांचा विणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिल हा असतो. निळसर छटेची पांढरी दोन अंडी घातली जातात. त्यातून साधारणपणे एक महिन्याच्या आत पिलांचा जन्म होतो.
एकदा आता मला हे घरटं माहित झालं होतं, त्यामुळे पुढच्या ट्रिपच्या वेळी मी मुद्दाम येथे गाडी थांबवली. पण यावेळी त्या पक्ष्यांना माझं तिथं नुसतं थांबणंसुद्धा पसंत पडलं नाही. दोघेही माझ्या डोक्यावरती घिरट्या घालू लागले. थोडे थोडे खाली येऊ लागले. त्यांना अधिक त्रास देण्यात अर्थ नाही असं मानून मी पटकन गाडीत बसून पुढे निघालो.

(लेख आवडल्यास कंमेंट, शेअर करा! गूगल लॉगिन असल्याने अजून वेगळं लॉगिन करायची गरज नाही.)