राजगड 2.0!
अमित कालेकर,
5 नोव्हेंबर 2022 (Do like and comment!)
ऑफिसतर्फे 5 नोव्हेंबरला राजगडला आम्हाला घेऊन जाणारी बस पहाटे 5:30 ला निघाली. मी घराजवळ म्हणजे वारजे फ्लायओव्हरनजिक बसमध्ये सुमारे 6 वाजता स्थानापन्न झालो. जाईने (मुलगी) मला तिथं कारने इतक्या पहाटे अजिबात कुरकुर न करता सोडलं. आपल्या मुलांना गाडी चालवायला शिकवण्याचा फायदा! लौकर, म्हणजे 4:30 ला उठल्याने आणि गुंजवणे गावात पोचायला अजून किमान एक तास तरी मिळणार असल्याने मी झोप काढण्याचा निर्णय घेऊन तो अमलातही आणला. वारज्याच्या पुढच्या थांब्यावरती वैभवही बसमध्ये शिरला आणि माझ्या शेजारी येऊन बसला. थोड्या वेळाने मला जाग आली आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. खरंतर ही आमची पहिलीच भेट, पण बोलता बोलता आवडीनिवडी सारख्या निघत गेल्या आणि गप्पा रंगत गेल्या. मुरूमदेव, बिरमदेव आणि अजून काही नावे आहेत अशी त्याची माहिती.
गुंजवणे स्टॉपवर बसमधून आम्ही 50+ जण उतरलो, आणि ब्रेकफास्ट घेतला. चविष्ट पोहे, वडापाव, कॉफी! पण त्यात एक तास निघून गेला. तिथेच एका घरात शिवकालीन मुद्रा, तलवारी वगैरे ठेवल्या आहेत असं वैभवने सांगितले आणि येताना ते पाहू असंही ठरवलं.
सुमारे एक तास चढण चढून आम्ही पद्मावती माचीखाली पोचलो. भरपूर पाऊस पडून गेल्याने फार सुंदर हिरवाई सर्वत्र पसरली होती. फोटोज काढणे सतत सुरू होते. आज बऱ्यापैकी ऊन होतं, पण भाजणारं नव्हतं!
काही अवघड चढणींवर पूर्वी ट्रेक करणाऱ्या काही चांगल्या मनाच्या महाभागांनी लोखंडी रेलिंग्ज आणि तारा लावून अखिल हौशी ट्रेकर्स जमातीवर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत! (हे इथंच नाही, तर अनेक गडकिल्ल्यांवर केलं गेलं आहे.) चोरदरवाजामधून वरती आलो आणि पद्मावती देवीसमोर नतमस्तक झालो. सईबाई समाधीचंही दर्शन. मंदिराच्या बाजूला पाण्याचं एक टाकं आहे. अतिशय मधुर अन थंडगार असं त्याचं पाणी. तरतरी आली!
आज आधी बालेकिल्ला करायचा होता. साडेनऊच वाजलेले, भरपूर वेळ हाताशी होता. पद्मावती माचीपासून हा बालेकिल्ला बराच उंचावर आहे. वाटेत आम्हाला मधाची पोळी वरती लागलेली, आणि खाली रिकामी पडलेली ही सापडली. सुंदर षट्कोनी रचना अन पिवळ्याधम्मक रंगाचे मेण! इथं मधमाश्यांचा बराच प्रादुर्भाव आहे आणि काही दुर्दैवी जणांना त्यांचा जहरी प्रसादही मिळालाय.
आज खूपच गर्दी पण गडावर. त्यामुळे एका अवघड जागेवर (गडावरील!) तर ट्रॅफिक जॅम! वरचे लोक खाली उतरेपर्यन्त थांबून राहावं लागलं. इथंही त्या लोखंडी रेलिंग्ज आणि त्यांशिवाय चढणे उतरणे केवळ अशक्य. आणि एकदाचा तो महादरवाजा दृष्टीपथात आला! दणकट आणि सुंदर रचना. कमान आणि कोरीवकाम अजूनही सुस्थितीत! नन्तरची डागडुजी दिसते, अन ओरिजिनल कामाची क्वालिटी काय उच्च दर्जाची होती तो फरकही दिसून येतो!
बालेकिल्ला सुदधा सपाट नाही, उंचसखलच आहे. पायऱ्या चढून वरती गेलो आणि समोर चंद्रकोर तळे इतके सुंदर दिसले! वारा बराच वाहत असल्याने त्या पाण्यावर लाटा येत होत्या. आपल्याकडे स्थानमहात्म्य, किमानपक्षी नावाच्या पाट्या लावण्याचा इतका दुष्काळ का आहे? पुरातत्वखाते अगदी उदासीन कसे? तळ्याच्या थोड्या वरच्या अंगाला बरंच नन्तर बांधलेलं ब्रह्मेश्वर मंदिर आहे.
तळ्याच्या दुसऱ्या बाजूने पायऱ्या घेऊन वरती गेलो आणि माथ्यावर पोचलो. खाली भाटघर धरणाच्या पाण्याने अजगरासारखा विळखा घातलाय संपूर्ण परिसरास! शेजारीच उभ्या असलेल्या प्रचंडगड उर्फ तोरण्याकडे जाणाऱ्या वाटेवर संजीवनी माची बांधली आहे. अतिशय सुरेख दृश्य. 8 तरी बुरुज असावेत. माथ्यावर काही भग्नावशेष आहेत, जे बघवत नाहीत. इथंच शिवरायांनी उणीपुरी 26 वर्षं राज्य केलं! पण त्यांची खूण असं काहीही तिथं शिल्लक नसावं ..... 😢 त्यामुळे त्या परिसराचे फोटो नाही काढले. आज हवेत क्लॅरीटी नव्हती, त्यामुळे सिंहगड, तोरणा वगैरे किल्ले सुस्पष्ट दिसत नव्हते. योग्य व्हिजिबिलिटी असल्यास रायगडही दिसू शकतो. बालेकिल्ल्यावरून आम्ही काळेश्वरी बुरुजही पाहिला.
बालेकिल्ला उतरून मग संजीवनी माचीचा चिंचोळा रस्ता धरला. जाताना डावीकडे वरती बालेकिल्ल्याच्या डोंगराचे सुळके भन्नाट दिसत होते. एकाचा फोटो ही काढला, त्यामागे सूर्यनारायण आपलं अस्तित्व दाखवू इच्छित होते.
वाटेत अनेक जातींची असंख्य फुलपाखरे इतस्ततः उडत होती. संजीवनी माचीकडे खाली उतरलो नाही, कारण त्यात बराच वेळ गेला असता. नेक्स्ट टाइम करेन! परत फिरलो, अन ग्रुप लीडर विकास च्या सांगण्यानुसार पाली दरवाजाकडे निघालो. आमची बस गुंजवणेऐवजी आता पाली गावात आम्हाला पिकअप करणार होती. पाली दरवाजाही बराच सुस्थितीत आहे. अगदी लोहगडासारख्याच ह्याच्याही पायऱ्या छान आहेत.
खाली येत असताना एक आज्जीबाई दही ताक घेऊन विकायला बसलेल्या दिसल्या. मग तिथंही थोडी तृष्णाशांती झाली. आज्जीना त्रास नको, म्हणून वैभव आणि मी एकाच पेल्यात ते मधुर ताक वरून (पेला उष्टा न करता) प्यायलो, अन वैभवने आज्जीना पेला धुवूनही दिला.
सुमारे 2 वाजता खाली उतरलो, आणि तिथं असलेल्या एका टपरीवजा हॉटेलात पिठलं भाकरीची ऑर्डर दिली. इतकी रद्दड भाकरी (पापडच तो) आणि पिठलं मी कुठंही खाल्लं नव्हतं. ताक मात्र अप्रतिम! आमचं जेवण सुरू असताना आमच्या टीम्स घोळक्याघोळक्याने खाली येत होत्या. इथं एअरटेलला झिरो रेंज! त्यामुळे अडीच तास भरपूर बोअर झालो 😢 सुमारे 4:30 ला पूर्ण ग्रुपचे फोटोसेशन करून आम्ही बसमध्ये बसलो. हायवेवरती एका हॉटेलात परत पाऊण एक तास थांबून मग बस पुढं निघाली. वारज्याच्या पहाटे च्या स्टॉपवर 7 वाजता उतरलो. आणि PMPML बस घेऊन घराजवळ उतरलो. आणि तिथून थोडं पायी चालत 7:30 ला घरी!
आता नेक्स्ट ट्रेकपूर्वी मला काही उपयोगी गोष्टी विकत घ्याव्या लागतील जसे की 2 लिटरचं हायड्रेशन ब्लॅडर, कान आणि मान झाकू शकेल अशी गोल टोपी, हातांचं उन्हापासून आणि झाडाझुडपांपासून संरक्षण करणाऱ्या ब्लॅक स्लीव्ह्ज.
खूप सुंदर असा ट्रेक आणि छान दिवस गेला आमचा! आता कम्पनीच्या नेक्स्ट ट्रेकची आस. पाहू कुठं प्लॅन होतोय. बाय द वे, ह्या आठवड्यात माझा दर गुरुवारचा सिंहगडही झाला होता!