डिसेम्बर 2020 मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या माझ्या शेतातून एक इवलंसं कागदी लिंबाचं रोपटं आणलं, आणि पुण्यात घरात एका मध्यम आकाराच्या कुंडीत लावलं. नियमितपणे त्याला पाणी, शेणखत दिलं. फार ऊन नसलेल्या एका कोपऱ्यात ही कुंडी ठेवली होती, कारण केवळ 11x8 च असलेल्या गच्चीत इतर ठिकाणी जागा शिल्लक नव्हती. आणताना साधारण 8-10 इंच इतकं असलेलं हे रोप गेल्या तीन-सव्वातीन वर्षांत बरंच वाढलं, 9 फुटांपर्यंत उंच झालं! तरी मी त्याची अधूनमधून छाटणी केलेली होती. एक-दोनदा त्याचे टोकावर आलेले सगळे कोंबही कापले, जेणेकरून इतर ठिकाणांहूनही फांद्या वाढाव्या आणि झाड डेरेदार व्हावं. एक मित्र जीवामृत (सेंद्रीय, गुळाच्या स्लरीपासून बनवलेलं द्रवरूप खत) घरी आणून देतो. त्याचाही नियमित खुराक ह्या लिंबाला द्यायचो, इतर सगळ्या झाडांबरोबरच. इन्स्टाग्रामवर लिंबाला प्रचंड फळे येतील, आमचं खत वापरून पहा अशी पोस्ट पाहण्यात आली, म्हणून तेही एकदा मागवून मूठ-दोन मूठभर खत तळाशी टाकलेलं. बागेतल्या इतर फुलझाडांचा पालापाचोळा फेकून न देता लिंबाच्या कुंडीतच टाकायचो. केमिकल मात्र कुठलंही वापरलं नाही आणि फवारलंही नाही.
केळीची साले एका बरणीत घालून त्यात बरणीभर पाणी घालून 2 दिवस ठेवायचं आणि मग ते पाणी झाडांना घालायचो. सेम कांद्याच्या वाळलेल्या सालींचे पाणीही.
साधारण एक-दीड वर्षापूर्वी पिठ्या ढेकणाने (mealybug) माझ्या बागेला पूर्णपणे ग्रासून टाकलं 😢 आधी जास्वंदावर आलेल्या ह्या रोगाने हाहा म्हणता बागेत आपले पांढरे पाय पसरले! लिंबाचे पाननपान खालून पांढरे व्हाईट्ट. बारीक पांढरे ढेकणासारखे किडे. बरीचशी पाने कात्रीने कापून फेकून दिली. पण जसा आला, तसा तो रोग हळूहळू नाहीसाही झाला. हुश्श झालं!
लिंबाचा बुंधा आता खूप छान दणकट दिसायला लागला. फुटवे, नवी पाने एकदम तुकतुकीत होत होती. पण 8/9 फुटी झाड होऊनही एकही फूल लागेना. अस्वस्थता यायला लागली. बायकोने हे नर झाड असावं, ह्याला काही फळधारणा होणारच नाही, तू हे काढूनच टाक असा सल्लाही दिला. मी मात्र वाट पहायची, असाच निश्चय केला.
फेसबुकवर गच्चीवरच्या बागेविषयीचे काही ग्रुप्स जॉईन केले. त्यावरच्या आणि इंटरनेटवरच्या इतर पोस्ट्स, सल्ल्यांनुसार निदान 5 ते 6 वर्षं तरी थांबावं लागेल, झाड कलम करून का नाही लावलंय अश्या गोष्टी दिसल्या. माझ्यातल्या शेतकऱ्याला नाउमेद व्हायला खतपाणी मिळू लागलं!
आज, 16 मार्च 2024. सकाळी बागेला पाणी देता देता लिंबाचं निरीक्षण करत होतो. मागल्या सप्टेंबरमधलं ह्याच लिंबावर शिपाई बुलबुलांनी (Red-whiskered bulbul) अपार मेहनत करून त्यांच्या 3 सुन्दरश्या राखाडी गुलाबी अंड्यांकरता व नन्तर त्यातून जन्मलेल्या पिल्लांच्या संगोपनाकरता बनवलेलं सुबक घरटं आता ओस पडलं होतं.
त्याच्या नाजूक काटक्या एकेक करून गळून पडायला लागल्या होत्या. थोडीशी बाजूला नजर सरकली, अन काय आश्चर्य! माझ्या लिंबाला चक्क चक्क फुलोरा आलेला!☺️ 3-4 ठिकाणी छोटीशी पांढरी, मध्यभागी पिवळसर केसर असलेली अशी फुलं! अन एका ठिकाणी तर अगदी छोटीशी 4-5 फळंही! तो गुच्छ अतिशय सुखावणारा होता.
झाडावर विश्वास ठेवला, ते फार बरं काम केलं असं वाटून गेलं. आता ही फळे मोठी कधी होतील, ह्याचीच प्रतीक्षा करत बसायचं, अन दरम्यानच्या काळात फळ / फूलगळती होऊ नये, अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करायची!
(लेख आवडल्यास कंमेंट, लाईक, शेअर करा!)