रविवार, १५ ऑक्टोबर, २०२३

माझी पहिली हाफ मॅरेथॉन!

माझी पहिली हाफ मॅरेथॉन!

15 ऑक्टोबर 2023, NDA पुणे

~ अमित कालेकर



राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, अर्थात NDA ने त्यांच्या 75 व्या स्थापनावर्षानिमित्त आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन अर्धमॅरेथॉन श्रेणीचा श्रीगणेशा करावा, अशी उर्मी दाटून येऊन 17 जूनला 1300 रुपये भरून नाव नोंदवलंच. आजवर, म्हणजे वयाच्या 48व्या वर्षापर्यन्त 10 km च्या वरती मॅरेथॉन रनिंग केलेलं नव्हतं. नाही म्हणायला ह्याच वर्षी 30 एप्रिलला LSoM मध्ये 15 km मध्ये भाग घेऊन स्वतःची कसोटी पाहिली होती. तीच NDA ची माझी पूर्वतयारी म्हणायला हवी. त्या जोरावरच मी हे 21 km चं धाडस करू धजलो.

पण गुरुवारचा सिंहगड सोडता इतर कसलीही तयारी होत नव्हती. अधूनमधून एखादी 20-30 km ची सायकल राईड व्हायची. दर बुध / शुक्र चे कोअर स्ट्रेंथ ट्रेनिंग सेशन्सही रेग्युलर करत नव्हतो. 

करता करता 8 ऑक्टोबर उजाडला! एकच आठवडा शिल्लक होता NDA साठी. लाजेकाजेस्तो का होईना, थोडं तरी रनिंग करावं म्हणून 6 AM ला घराबाहेर पडून धावायला सुरुवात केली. घराजवळच्या एका सरळसोट शांत सुंदर मार्गावर येऊन जितकं जमेल तितकं करायचं ठरवलं. हवा मस्त होती, थोडीशी गार! पुण्यातल्या दिवाळीची चाहूल लागावी इतकी नसली, तरी बरीच बरी. 4-5 बदाम/काजू/खजूर खाऊन आणि 2 पेले पाणी पिऊन निघालो. रात्री साधारण साडेपाच तास झोप झालेली होती. एका तासानन्तर सुमारे साडेआठ किलोमीटर अंतर पार केलं! एका बाजूने सुमारे दीड किलोमीटर रस्ता, अश्या 5-6 फेऱ्या करून झालेल्या. मग अजूनच उत्साह आला, आणि मग 2 तासात 17 km करून स्वारी घरी परतली! कसलाही त्रास नाही.

मॅरेथॉनचे बिब आणि टी-शर्ट 13 आणि 14 ऑक्टोबरला बिबवेवाडीत नाजूश्री हॉलमध्ये मिळणार होते, ते 14 तारखेला घेतले. तिथला एक्स्पो खूप छान होता. ह्या बिब मध्ये सेन्सर चिप असते, जी स्पीड गनद्वारे आपलं रनिंग ट्रॅक करते.

NDA ने पहाटे 2 ते 5 ह्याच वेळेत एन्ट्री देऊ, नन्तर गडाचे दरवाजे बंद करण्यात येतील अशी धमकी दिल्याने आम्ही चौघे मित्र 3 AM लाच घरून निघून कोंढवे-धावडे गेट ने NDA त दाखल झालो. आता इतक्या पहाटे उठायचं, ही सवयच नव्हती, झोपेचं खोबरं झालेलं, टॉयलेटलाही साहजिकच इश्यू... पण इतक्या लौकर आल्याने अजिबात ट्रॅफिक जॅम न होता आत येऊ शकलो. सोबतचा मित्र महेश तर 8 ऑक्टोबरला शिकागो फुल मॅरेथॉन करून परत विमानप्रवास करून NDA ला आलेला!

21 KM स्पर्धा 6:30 AM ला सुरू होणार होती. तत्पूर्वी काही नाचगाणी, स्ट्रेचिंग व्यायाम तिथल्या मैदानात सुरु होते. अर्थातच ते केले नाहीत! बरोब्बर 6:30 ला फ्लॅग ऑफ झाले आणि आम्ही घोळक्याने धावायला सुरुवात केली. केवळ NDA बघायला मिळणारे म्हणूनही अनेक जणांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं होतं! अतिशय रमणीय परिसर आहे NDA. हवाही तशी ओके होती. NDA असूनही मोबाईल्सना बंदी न घातल्यामुळं स्वारी खुश होती! उत्साहात बरेच फोटो काढत धावत होतो. पहिल्या तासात मी 8.5 KM अंतर पार केलं! ठिकठिकाणी पाणी/इलेक्ट्राल/केळी/मीठ/गूळ/संत्र्याच्या फोडी इत्यादी जिन्नस ठेवलेले. खूप व्हॉलंटिअर्स होते, वैद्यकीय सुविधाही तैनात होत्या. खूप सुंदर आयोजन होतं ब्ल्यू ब्रिगेडचं! शिवाय काही स्पर्धकांनी ब्ल्यूटूथ स्पीकर्सही आणलेले. अन छान गाणी सुरू होती! NDA चे बंदूकधारी सगळीकडे तैनात होतेच. त्यातल्या अनेकांच्या टिपिकल मिलिटरी मिश्या! 

पण आता सूर्यनारायण आपला इंगा दाखवू लागले! आणि त्यात चढाचा रस्ता सुरू झाला! मीच काय, पण बरोबरचे अलमोस्ट सगळेजण चालतच जात होते. 

NDA चा एअरपोर्ट एरिया फार सुंदर आहे. विस्तीर्ण सपाट परिसर, सगळीकडे हिरवंगार गवत वाढलेलं! जुन्या काळातील लढाऊ विमाने बऱ्याच ठिकाणी ठेवलेली होती. नॅट्स, जॅग्वार्स, मिग्ज. K-52 नावाची नौकाही दिसली. ती युध्दसामुग्री पाहून स्फुरण चढत होतं! संपूर्ण NDA तर सुमारे हजार ते पंधराशे एकर असावं! (नन्तर विकिपीडियाने 7,000 एकर (28 स्क्वे. किमी असं सांगितलं!)

आता माझा स्पीड हळूहळू कमी होऊ लागला. पहाटे सोबत आणलेली टोपी मी कारमध्येच विसरलो होतो! काहीही झालं तरी 21 KM शिवाय थांबायचं नाही, हे स्वतःला टिच्चून सांगून धावत, चालत राहिलो. NDA हे आतून खरंतर जंगलच आहे. भरपूर झाडे, अनेक जातींची फुलं, त्यावर उडणारी फुलपाखरे, काही दिसणारे पक्षी तर अनेक न दिसणाऱ्या पक्ष्यांचे आवाज... विशेषतः मोर, ग्रे हॉर्नबिल (धनेश), किंगफिशर (खंड्या), कॉपरस्मिथ बार्बेट (तांबट) ...

आता काही स्पर्धकांना पायात क्रँप्स यायला लागले होते. मग आयोजकांकडून अश्या धावकांसाठी मसल रिलॅक्संट्सचे फवारे सुरू झाले. तरी ते धावत होते. ठिकठिकाणी फोटोग्राफर्स आमचे फोटोज काढत होते. ते दिसले, की चालत जाणारे आम्ही थोडंसं धावत जाण्याची ऍक्टिंग करत होतो! बुटाची लेस बांधण्याच्या बहाण्याने एखादं मिनिट विश्रांतीही घेतली जात होती!

अखेर 'शेवटचा किलोमीटर शिल्लक आहे sss' अशी पेसरने आरोळी दिली, आणि परत उत्साह संचारला. 9 वाजून 19 मिनिटांनी मी फिनिश लाईन ओलांडली! त्या क्षणाचं वर्णन मी करू शकत नाही. 'बकेट लिस्ट'मधला एक मोठा आयटम मी आज टिक केला. मला खूप जास्त वेळ लागला, 2 तास 49 मिनिटे.

प्रचंड दमलो होतो, आणि घाम तर अतोनात! आधी स्टेडियममध्ये जाऊन ब्रेकफास्ट घेतला. भुकेचीही शुद्ध नव्हती, फक्त पाणी प्यावंसं वाटत होतं! मग मेडल हस्तगत केलं! इतकं सुंदर मेडल ते. अभिमान वाटला गळ्यात पडल्यावर! थोडेफार फोटोज (सोशल मीडियावर नाचायला हवं न!) काढून पार्किंगकडे चालत निघालो. आता हेच अंतर फार जास्त भासत होतं! आणि आता फुल्ल ट्रॅफिक लागलं आम्हाला.

टेक-अवेजच मांडायचे झाले, तर पुरेशी शांत अन सलग झोप, पोट साफ होणे आणि टोपी-गॉगल बरोबर असणे हे आहेत. शिवाय, थोडं थोडं पाणी पिणे, आणि स्पीड नीट मेंटेन ठेवणे. आणि, पाऊल वाकडं पडू न देणे हेही! हे पाळलं असतं, तर मी 20 ते 25 मिनिटे लौकरही पूर्ण करू शकलो असतो.

तर अशी ही माझी पहिल्यावाहिल्या हाफ मॅरेथॉनची कहाणी, साठा उत्तरी सुफळ संपूर्ण!

व्हिडिओ

शनिवार, १ एप्रिल, २०२३

माझी पहिली 100 km सायकल स्वारी!


माझी पहिली 100 km सायकल स्वारी!
~ अमित कालेकर, 1 एप्रिल 2023 (Do comment! तुमची टिप्पणी पोस्ट करा!)


सायकल चालवायची आवड तशी माझी अगदी बालपणापासूनची. आजवर अनेक सायकली चालवल्या. जुनी अवजड हर्क्युलस, सडपातळ BSA SLR, स्पीडकिंग, फायरफॉक्स बॅड ऍटिट्यूड, हर्क्युलसचीच ऍक्ट 110S ते आत्ताची मॉंट्रा टिम्बा. शाळेत, ज्युनिअर कॉलेजात, अगदी इंजिनिअरिंग कॉलेजातही जायला-यायला सायकलच. सोलापुरात शाळेत असताना जवळची गावे उदा. अक्कलकोटला सायकलने (40 किमी) गेलेलोय. काही मित्रांची सोलापूरच्या जवळपास शेती होती तिकडेही सायकलच. नन्तर मात्र सायकल कमी कमी होऊन दुचाकी-चारचाकीचीच रपेट झाली, सायकल क्वचित.

गेल्या 3 वर्षांत मात्र जरा सातत्याने सायकलिंग व्यायाम म्हणून घडू लागलं. KDR सायकलिंग आणि पेडलवाली असे 2 उत्साही लोक खच्चून भरलेले ग्रुप्स जॉईनही केले. पण सोलो राईड्सही सुरूच होत्या. 2022 मध्ये 26 जानेवारीला 73 व्या गणतंत्र दिनानिमित्त 73 किमी सायकल फेरी (कोथरुड ते नसरापूर आणि परत) घडली. कोथरूड ते सिंहगड पायथा आणि परत, किंवा कोथरूड ते हिंजवडी आणि परत अश्या 50 किमी अंतराच्या स्वाऱ्या होऊ लागल्या. पण अजूनही 3 आकडी संख्या, म्हणजे शंभरी गाठलेली नव्हती! वर सांगितलेल्या ग्रुपच्या सदस्यांच्या शंभरी गाठल्याच्या नित्यनेमाच्या बातम्या ऐकून उत्साह यायचा, की एक दिवस आपणही ह्या क्लबचा सदस्य नक्कीच होणार!

शनिवार, 1 एप्रिल 2023 ला KDR ग्रुपची सातारा रस्त्याकडची शंभरीची मोहीम ठरली. 6 जण जाणार होतो, त्यात 2 मुलीही. संदीप, केदार, वसुधा, मोनाली आणि ग्रुप लीडर गिरीश. 5:20 AM ला घरून (MIT कॉलेज परिसर) निघालो आणि करिष्मा सोसायटीसमोर ग्रुप जमला. गार पाण्याची बाटली सॅकमध्ये टाकून सॅक पाठीवर घेतली. प्रवासात मध्ये खायला काही घेतलं नाही. जुजबी हातापायाचे व्यायाम करून 5:40 AM ला कूच केलं. वारजे नाका, मग हायवे, वडगाव धायरी, आंबेगाव, कात्रज नवा बोगदा, हरिश्चंद्री, नसरापूर, शिरवळ असा प्रवास होणार होता. सकाळची मस्त गार, प्रसन्न हवा असल्यामुळे खूप उत्साहाने सुटलो! 15 km वरती कात्रज बोगद्याआधी पहिला थांबा घेतला. मागून येणाऱ्या सदस्यांसाठी आणि मग अर्थात क्लिकक्लिकाटासाठी! हा थोडा चढाचा रस्ता, त्यामुळं जास्त वेळ गेला, जवळपास 1 तास.




बोगदा पार केला, आणि एकदम गारवा वाढला! शिवाय रस्त्याचा उतारही. मक्काय, सुसाट निघालो! खेड-शिवापूर टोलनाकाही पार झाला. बरोबर संदीपही वेगात. माझे सायकल चालवता चालवता फोटोज व्हिडीओज शूटिंगही सुरूच होते.





मध्येच एखादा घोट पाणीही पीत होतो. एखाददुसरा थांबा वगळता शिरवळपर्यन्त तसा पटकन पोचलो. अन झाले न 50 किमी! आता यू-टर्न!!


जाताना हवा, ऊन आणि उतार आमच्या बाजूने होते. पण आता जसा परत फिरलो, तो तेच हे तिघे शत्रू बनून अंगावर येऊ लागले! संदीप आता बराच पुढं गेला. मोनाली बरोबर होती. एका ठिकाणी लिमलेटच्या नारिंगी गोळ्या डब्यात भरून ठेवलेल्या दिसल्या, त्या दुकानापाशी क्षणभर थांबून गोळ्या विकत घेऊन तोंडात टाकत पुढं निघालो. वारा खूप वेगात मागे ढकलत होता! त्यामुळे माझा स्पीड कमी झाला. कितीही दामटा, सावकाशच प्रवास होत होता! वाटेत अनेक फ्लायओव्हर्स लागतात, आणि जाताना ते उत्साहात घेऊन गेलो, पण आता मात्र ते वगळले! अगदी, नदी असेल तिथलाच फ्लायओव्हर / पूल घ्यावाच लागला म्हणून घेतला. 

सुमारे 70 किमी अंतर पार झाल्यावर पायांत (विशेषतः गुडघ्याच्या वाटीच्या थोडं वर आणि आतली मांडी) थोडे क्रँप्स यायला लागले! पेडलिंग थाम्बलं, की दुखायचं. हे लक्षात आल्यावर ठरवलं की थांबायचंच नाही! दर 5 किमी नन्तर क्रँप्स यायचे-जायचे.

एका ठिकाणी उसाचा सुमधुर रस दिसला, आणि वाळवंटातल्या मरुस्थळाचीच आठवण झाली! १ पेला (कागदी!) रस प्यायलो, काही सेल्फीज घेतले, तोवर गिरीश-वसुधा-केदारही आलेच. अजून एक पेला रस पिऊन थोडे ताजेतवाने होऊन ग्रुप सेल्फीज घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. आता मात्र थेट घरीच थांबायचं हा निश्चय केला.






80 किमीच्या टप्प्यावर एका मोठया फ्लायओव्हरपाशी दमलो. तो फ्लायओव्हर सायकल हाती घेऊन चालत पार करावा असा विचार करून सायकलवरून पायउतार झालो. पण सरळ केलेले पाय दुमडेचनात! गुडग्यात प्रचंड दुखायला लागले! मक्काय, परत स्वार झालो, 'कमॉन अमित, येस्ससस' असं स्वतःला अक्षरशः ओरडून बजावत प्रसंगी सायकलवरती उभा राहून सायकल दामटली! हातावरचं स्मार्ट घड्याळ एकेक किमी अंतर कमी कमी दाखवत होतं. पाच तास होऊन गेलेले. डोळ्यांवरच्या UV गॉगलने ह्या पूर्ण प्रवासात काय मदत केलीय! कडक उन्हाचा वणवा त्याने झेलला आणि डोळ्यांना त्रास जाणवू दिला नाही. सेम डोक्यावरच्या हेल्मेटचंही. अखेर परत कात्रज बोगदा आला! आता ह्यानंतर पुढं सुसाट उतार आहे, नुसतं सीटवर बसून जायचं आहे ही भावना खूप सुखी करून गेली!!

शहरात आल्यावर सिंहगड रोडवरून पुढं जाताना हे एक सुंदरश्या गुलाबी फुलांनी गच्च भरलेलं झाड दृष्टीस पडलं! पूर्ण शहरात ही बरीच झाडे आहेत.  (Pink Trumpet Tree) ह्याचाच, पिवळा भाऊ ही पुण्यात मुबलक आढळतो.
98 किमी पार झाले. बालशिक्षण शाळेसमोरच्या नेहमीच्या नीरावाल्याकडे नीरा आणि लिंबू सरबत ब्रेक घेतला. घरापाशी 99 किमी झाले, बिल्डिंगभोवती 3-4 चकरा मारत 100 पार झाले, स्मार्ट वॉचला थांबवलं, लिफ्टचं बटन दाबलं, आणि हुश्श जाहलो!
Relive नावाच्या ऍपमध्ये व्हिडीओ बनवून मिळतो आपल्या राईड्सचा. हा पहा.

हा एक बकेट-लिस्ट आयटम माझा, आज अखेर झाला क्लिअर😆