माझी पहिली 100 km सायकल स्वारी!
~ अमित कालेकर, 1 एप्रिल 2023 (Do comment! तुमची टिप्पणी पोस्ट करा!)
सायकल चालवायची आवड तशी माझी अगदी बालपणापासूनची. आजवर अनेक सायकली चालवल्या. जुनी अवजड हर्क्युलस, सडपातळ BSA SLR, स्पीडकिंग, फायरफॉक्स बॅड ऍटिट्यूड, हर्क्युलसचीच ऍक्ट 110S ते आत्ताची मॉंट्रा टिम्बा. शाळेत, ज्युनिअर कॉलेजात, अगदी इंजिनिअरिंग कॉलेजातही जायला-यायला सायकलच. सोलापुरात शाळेत असताना जवळची गावे उदा. अक्कलकोटला सायकलने (40 किमी) गेलेलोय. काही मित्रांची सोलापूरच्या जवळपास शेती होती तिकडेही सायकलच. नन्तर मात्र सायकल कमी कमी होऊन दुचाकी-चारचाकीचीच रपेट झाली, सायकल क्वचित.
गेल्या 3 वर्षांत मात्र जरा सातत्याने सायकलिंग व्यायाम म्हणून घडू लागलं. KDR सायकलिंग आणि पेडलवाली असे 2 उत्साही लोक खच्चून भरलेले ग्रुप्स जॉईनही केले. पण सोलो राईड्सही सुरूच होत्या. 2022 मध्ये 26 जानेवारीला 73 व्या गणतंत्र दिनानिमित्त 73 किमी सायकल फेरी (कोथरुड ते नसरापूर आणि परत) घडली. कोथरूड ते सिंहगड पायथा आणि परत, किंवा कोथरूड ते हिंजवडी आणि परत अश्या 50 किमी अंतराच्या स्वाऱ्या होऊ लागल्या. पण अजूनही 3 आकडी संख्या, म्हणजे शंभरी गाठलेली नव्हती! वर सांगितलेल्या ग्रुपच्या सदस्यांच्या शंभरी गाठल्याच्या नित्यनेमाच्या बातम्या ऐकून उत्साह यायचा, की एक दिवस आपणही ह्या क्लबचा सदस्य नक्कीच होणार!
शनिवार, 1 एप्रिल 2023 ला KDR ग्रुपची सातारा रस्त्याकडची शंभरीची मोहीम ठरली. 6 जण जाणार होतो, त्यात 2 मुलीही. संदीप, केदार, वसुधा, मोनाली आणि ग्रुप लीडर गिरीश. 5:20 AM ला घरून (MIT कॉलेज परिसर) निघालो आणि करिष्मा सोसायटीसमोर ग्रुप जमला. गार पाण्याची बाटली सॅकमध्ये टाकून सॅक पाठीवर घेतली. प्रवासात मध्ये खायला काही घेतलं नाही. जुजबी हातापायाचे व्यायाम करून 5:40 AM ला कूच केलं. वारजे नाका, मग हायवे, वडगाव धायरी, आंबेगाव, कात्रज नवा बोगदा, हरिश्चंद्री, नसरापूर, शिरवळ असा प्रवास होणार होता. सकाळची मस्त गार, प्रसन्न हवा असल्यामुळे खूप उत्साहाने सुटलो! 15 km वरती कात्रज बोगद्याआधी पहिला थांबा घेतला. मागून येणाऱ्या सदस्यांसाठी आणि मग अर्थात क्लिकक्लिकाटासाठी! हा थोडा चढाचा रस्ता, त्यामुळं जास्त वेळ गेला, जवळपास 1 तास.
बोगदा पार केला, आणि एकदम गारवा वाढला! शिवाय रस्त्याचा उतारही. मक्काय, सुसाट निघालो! खेड-शिवापूर टोलनाकाही पार झाला. बरोबर संदीपही वेगात. माझे सायकल चालवता चालवता फोटोज व्हिडीओज शूटिंगही सुरूच होते.
मध्येच एखादा घोट पाणीही पीत होतो. एखाददुसरा थांबा वगळता शिरवळपर्यन्त तसा पटकन पोचलो. अन झाले न 50 किमी! आता यू-टर्न!!
जाताना हवा, ऊन आणि उतार आमच्या बाजूने होते. पण आता जसा परत फिरलो, तो तेच हे तिघे शत्रू बनून अंगावर येऊ लागले! संदीप आता बराच पुढं गेला. मोनाली बरोबर होती. एका ठिकाणी लिमलेटच्या नारिंगी गोळ्या डब्यात भरून ठेवलेल्या दिसल्या, त्या दुकानापाशी क्षणभर थांबून गोळ्या विकत घेऊन तोंडात टाकत पुढं निघालो. वारा खूप वेगात मागे ढकलत होता! त्यामुळे माझा स्पीड कमी झाला. कितीही दामटा, सावकाशच प्रवास होत होता! वाटेत अनेक फ्लायओव्हर्स लागतात, आणि जाताना ते उत्साहात घेऊन गेलो, पण आता मात्र ते वगळले! अगदी, नदी असेल तिथलाच फ्लायओव्हर / पूल घ्यावाच लागला म्हणून घेतला.
सुमारे 70 किमी अंतर पार झाल्यावर पायांत (विशेषतः गुडघ्याच्या वाटीच्या थोडं वर आणि आतली मांडी) थोडे क्रँप्स यायला लागले! पेडलिंग थाम्बलं, की दुखायचं. हे लक्षात आल्यावर ठरवलं की थांबायचंच नाही! दर 5 किमी नन्तर क्रँप्स यायचे-जायचे.
एका ठिकाणी उसाचा सुमधुर रस दिसला, आणि वाळवंटातल्या मरुस्थळाचीच आठवण झाली! १ पेला (कागदी!) रस प्यायलो, काही सेल्फीज घेतले, तोवर गिरीश-वसुधा-केदारही आलेच. अजून एक पेला रस पिऊन थोडे ताजेतवाने होऊन ग्रुप सेल्फीज घेऊन परतीच्या प्रवासाला लागलो. आता मात्र थेट घरीच थांबायचं हा निश्चय केला.
80 किमीच्या टप्प्यावर एका मोठया फ्लायओव्हरपाशी दमलो. तो फ्लायओव्हर सायकल हाती घेऊन चालत पार करावा असा विचार करून सायकलवरून पायउतार झालो. पण सरळ केलेले पाय दुमडेचनात! गुडग्यात प्रचंड दुखायला लागले! मक्काय, परत स्वार झालो, 'कमॉन अमित, येस्ससस' असं स्वतःला अक्षरशः ओरडून बजावत प्रसंगी सायकलवरती उभा राहून सायकल दामटली! हातावरचं स्मार्ट घड्याळ एकेक किमी अंतर कमी कमी दाखवत होतं. पाच तास होऊन गेलेले. डोळ्यांवरच्या UV गॉगलने ह्या पूर्ण प्रवासात काय मदत केलीय! कडक उन्हाचा वणवा त्याने झेलला आणि डोळ्यांना त्रास जाणवू दिला नाही. सेम डोक्यावरच्या हेल्मेटचंही. अखेर परत कात्रज बोगदा आला! आता ह्यानंतर पुढं सुसाट उतार आहे, नुसतं सीटवर बसून जायचं आहे ही भावना खूप सुखी करून गेली!!
शहरात आल्यावर सिंहगड रोडवरून पुढं जाताना हे एक सुंदरश्या गुलाबी फुलांनी गच्च भरलेलं झाड दृष्टीस पडलं! पूर्ण शहरात ही बरीच झाडे आहेत. (Pink Trumpet Tree) ह्याचाच, पिवळा भाऊ ही पुण्यात मुबलक आढळतो.
98 किमी पार झाले. बालशिक्षण शाळेसमोरच्या नेहमीच्या नीरावाल्याकडे नीरा आणि लिंबू सरबत ब्रेक घेतला. घरापाशी 99 किमी झाले, बिल्डिंगभोवती 3-4 चकरा मारत 100 पार झाले, स्मार्ट वॉचला थांबवलं, लिफ्टचं बटन दाबलं, आणि हुश्श जाहलो!
Relive नावाच्या ऍपमध्ये व्हिडीओ बनवून मिळतो आपल्या राईड्सचा. हा पहा.
हा एक बकेट-लिस्ट आयटम माझा, आज अखेर झाला क्लिअर😆
सुंदर सछायाचित्र सायकल सफरवृत्तांत !!
उत्तर द्याहटवाधन्यवाद, हिमांशू!
उत्तर द्याहटवाव्वा.. मस्त रे..
उत्तर द्याहटवाराजीव काका. ☺️