सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

बाहुबली 2

बाहुबली 2

~अमित कालेकर, 2 ऑक्टोबर 2017
 (Do like and comment!)


काल टीव्हीवर 'बाहुबली 2' चा वर्ल्ड प्रीमियर लागला म्हणून बघायला घेतला, मुलगी नको म्हणत असताना 😃 मुव्ही आला तेंव्हा "कशाला? तेलुगू चित्रपट अतिरंजित असतात, उगा पैसे वाया का घालवा?" म्हणून पाहिला नव्हता. (पहिला भागही अजून नाही बघितला.)
आणि तेंव्हाचा माझा निर्णय सार्थ ठरवत काल पैसे नाहीत तरी वेळ मात्र वाया घालवला आम्ही 😫
एकतर आम्ही जवळपास अर्धा सिनेमा झाल्यावर टीव्ही ऑन केला. त्यात पहिल्या भागाचा रेफरन्स नाही. बाहुबली देवसेनेला एकाच वेळी 3 बाण कसे मारावेत त्याचं प्रात्यक्षिक देत असताना आम्ही टीव्ही ऑन केला. हा चित्रपट 'काहीही' ह्या कॅटेगरीतच मोडतो. हिरोने काय काय करावं?? कश्याही अतर्क्य उड्या, 3-3 बाण असंख्य वेळा मारूनही भाता भरलेलाच, लार्जर दॅन लाईफ असे डायलॉग, रामापेक्षा जास्त सत्यवचनीपणा, 'दिवार'च्या शशीकपूरपेक्षा जास्त कर्तव्यदक्षपणा, वचनबद्धता वगैरे वगैरे. ड्रॉइंग बोर्डवर इंजिनीअरिंग चित्र काढताना, त्रिकोनी गुन्या वापरताना दाखवलाय बाहुबली! भन्नाट वेगात धावणाऱ्या 2 बैलांच्यामध्ये उभा असलेल्या बाहुबलीला बघून अजय देवगणचीच आठवण (बघा: फूल और कांटे) आली.
सिनेमा कसला पळवलाय! आधी अमरेंद्र, मग महेंद्र, किती पिढ्या बघायच्या?? कटप्पा तर मठ्ठप्पा वाटला. अत्युच्च दर्जाचं ग्राफिक्स हाच फक्त उजवा भाग वाटला ह्या मुव्हीचा. खूपच भारी दाखवलीय माहिष्मती नगरी. अतिभव्य. असं वाटावं की इतकं विस्तीर्ण बांधकाम करायला किती शतकं, पैसा आणि कामगार लागले असतील 😃 आणि त्याच्या डेली मेंटेनन्स वर किती वेळ, पैसा ओतावा लागत असेल! आणि ती दुर्बीण तर फारच म्हणजे! भल्लालदेवाची गाडी आणि त्यावरची ती फिरती शस्त्रं, आणि सटासट सुटणारे असंख्य बाण, सारंच अतर्क्य. बाहुबलीला माहिष्मती नगरीत प्रोजेक्टाईल केलेला सीन तर केवळ अफाट! माडाच्या झाडांना वाकवून 7-8 लोकांना कॅटापुल्ट करता येतं? तेही ढाली गुंडाळून?? अक्षरशः काहीही. माहिष्मती साम्राज्याचे रुल्स आणि व्हॅल्यूज म्हणत म्हणत काहीही पाणचटपणा बघावा लागतो. बापाला सख्ख्या 2 मुलांमध्ये एकाबद्दल इतका द्वेष असू शकतो?? बाहुबली सावत्र मुलगा आहे काय राजघराण्याचा? पहिला भाग पाहिला नसल्यामुळे मला रेफरन्स नसेल, त्यामुळं पण हा प्रश्न चुकीचा असू शकेल. भल्लालदेवाला फक्त दुष्टपणा, खलनायकी हे एकच काम आहे. (महाराजा म्हणून काहीच करत नसेल का तो??) आणि त्याच्या वडिलांना शकुनीपणा! देवसेनेला पण नुसते पोकळ आणि आढ्य डायलॉग मारायला दिलेत.
असो. ह्या असल्या टुकार चित्रपटाने हजार कोटींचा व्यवसाय केला असेल हे मला अजिबात पटलं नाही.
जाऊद्या, 'बाहुबली 3' आला तर बघायचा नाही हे मात्र 100% नक्की!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा