आजची सकाळ!
~अमित कालेकर, पुणे, 17 मे 2017 (Do like and comment!)
नेहमीप्रमाणे 5 च्या आसपास जाग आली. 7 ला मुलीला लॉ कॉलेज रोडवर क्लासला सोडून आज ARAI टेकडी एका जवळच्या मित्राबरोबर कांचन गल्लीमधून चढून जायचा बेत केला. टेकडी चढायला सुरुवात करतानाच मित्र 'इकडे फारसे पक्षी दिसत नाहीत' असं म्हणायला आणि मला एक भलामोठ्ठा पक्षी (ब्लॅक काईट/घार, किंवा सर्पंट ईगलपैकी एक) दिसायला एकच गाठ पडली! मोठ्या डौलात तो (का ती?) एका फांदीवर मला क्लिअर दिसेल असा सूर्याकडे तोंड करून (बहुधा फोटोच्या अपेक्षेने!) बसला होता. पण माझं आज फोटोग्राफीचं इंटेन्शन नव्हतं. (का? का?? का???) थोडं वर गेल्यावर टेकडी माथा आलाच. ARAI च्या मुख्य पार्किंगपाशी जाते ही वाट.
वाटेत आम्हाला दोघांनी 'तुम्ही कांचन गल्लीतून आलात का, आम्हाला प्रस्तावित बालभारती-ARAI रस्त्याबद्दल कृपया तुमची प्रतिक्रिया द्या' असा विनंतीवजा आग्रह केला आणि तत्परतेने क्यामेराही उपसून (की परजून?!) माईक घेऊन तयार की! मग मी हळूच त्या माईकवर चॅनेलचं नाव पाहून घेतलं आणि आज आपलं पहिलंवहिलं टीव्ही फुटेज झळकणार ह्या आनंदात चांगली (!) पर्यावरणवादी प्रतिक्रिया (केसांतून हात फिरवून, थोडं नीटनेटकं दिसायचा प्रयत्न करत) दिली. हा रस्ता तर व्हायला हवा, पण तो 'टनेल' असावा, टेकडीवरून झाडे तोडून अजिबात नको, असा खर्चिक (पण टेकडी आणि तिच्यावरची झाडी, असंख्य पक्षी वाचावेत ह्या सद्हेतूने) विचार मांडून पुढे पळत निघालो. थोड्याच अंतरावर ह्या माझ्या सद्विचाराला बळकटी मिळाल्यासारखा उजवीकडून एक 'म्याsssओ' सदृश दबका आवाज आला आणि त्याचा मागोवा घेत गेल्यावर लगेच पूर्ण पिसारा (पण मिटलेला) प्राप्त झालेल्या पक्षीराजाचं, म्हणजेच मोराचं मनोहारी दर्शन घडलं! बघत राहिलो आम्ही एकमेकांना. थोड्या वेळाने त्याला माझा कंटाळा आला आणि तो झाडीत गुडूप झाला. मी नेमकं आजच क्यामयेरा विसरायला काय धाड भरली असं पुन्हा एकदा स्वतःलाच रागावलो. मोबाईलचा कॅमेरा फक्त सेल्फी काढण्यापुरताच असतो, अश्यावेळी तो अगदी 'यूसलेस' (माझ्या मामीचा अगदी लाडका शब्द!) असतो. मग तो कितीही मेगापिक्सेलचा असो.
8 च्या 2 मिनिटं आधी खाली उतरून परत मुलीच्या क्लासकडे आलो. तिथं मित्राने एका तरुणाची ओळख करून दिली, 'आनंद हातवळणे'. हे नाव ऐकल्याऐकल्या माझं मन एकदम शाळेत, 1989-90 मध्ये गेलं. आम्हाला मराठीत (9वी की 10वीत ते मात्र आठवत नाहीय) एक धडा होता, तो आनंदच्या बाबांनी लिहिलेल्या पुस्तकातला ('यशवंत व्हा') होता! ह्या भावंडांना 10वीत चांगले मार्क्स मिळण्यासाठी त्यांनी कायकाय केलं ते खूप सुरेखरित्या वर्णन केलं होतं. आनंद आणि त्याची मोठी बहीण विनया दोघेही त्यावेळी बोर्डात झळकलेले! अचानक आणि सुखद भेट घडल्यामुळे फार मस्त वाटलं! पुस्तकात वाचलेले कॅरॅक्टर्स समक्ष भेटल्यावर फिल्मस्टार्स भेटल्यासारखा आनंद होतो! आनंदचं स्वतःचंही एक पुस्तक ('अक्षरशिल्पे', 2 भाग) 'राजहंस' तर्फे प्रकाशित झालंय तेही समजलं, आणि ते वाचायची ओढ लागलीय आता!
एका तासात काय काय घडू शकतं!
कडक उन्हाळ्यातली आजची सकाळ अशी एकदम गार, इव्हेंटफुल आणि तरतरीत गेल्यामुळे लै भारी वाटलं राव!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा