शनिवार, २८ जानेवारी, २०१७

रॉजर फेडरर!

रॉजर फेडरर

अमित कालेकर, 29 जानेवारी 2017
 (Do like and comment!)

टेनिसमध्ये 2012 चं प्रतिष्ठेचं विंबल्डन जिंकल्यानंतर 'ओपन एरा'मधल्या 17 एकेरी ग्रँड स्लॅम्स जिंकून "ऑल टाईम ग्रेट" बिरुद मिळवलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या आयुष्यात पुढचं 18वं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणं जवळपास अशक्य बनलं होतं. ह्या सतरामध्ये 4 ऑस्ट्रेलियन, 7 विम्बल्डन, 1 फ्रेंच आणि 5 अमेरिकन जेतेपदं आहेत.
2013-14-15-16 अशी तब्बल साडेचार वर्षं (2012 चे अमेरिकन ग्रँड स्लॅम पकडून) तो कित्येक फायनल्समध्ये पोचला. तेही त्या त्या स्पर्धांमध्ये सर्वोच्च दर्जाची कामगिरी करून. पण दर वेळी त्याचा आत्मविश्वास डळमळीत होत होता आणि तो जिंकू शकत नव्हता. दरम्यानच्या काळात इंग्लंडचा अँडी मरे आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे दोन तारे उदयाला आले आणि त्यांनी स्पर्धा गाजवायला सुरुवात केली. मरे तर 2013 मध्ये विम्बल्डन जिंकणारा 76 वर्षातला पहिलाच इंग्लिश खेळाडू ठरला! जोकोविचचा कोच महान खेळाडू जर्मनीचा बोरिस बेकरने तर रॉजरला 'तू कशासाठी खेळत आहेस, निवृत्त का होत नाहीस?' असं सरळ सरळ विचारूनही टाकलं!
2003 मध्ये त्या वेळच्या अव्वल आणि विक्रमी सात वेळा विम्बल्डन जिंकलेल्या पीट सँप्रासला विम्बल्डनमध्येच हरवून आपल्या पहिल्या विजेतेपदाची नोंद करणाऱ्या रॉजरने नंतर दरवर्षी चारपैकी तीन ह्या दराने ग्रँड स्लॅम्स जिंकण्याचा धडाकाच लावला. त्याच्या वाटेत जे जे आले त्यांचा सपशेल पराभव होत गेला. फक्त स्पॅनिश डावखुरा रफाएल नदाल त्याला पुरून उरला. ह्या दोघांनी 17 आणि 14 अशी विक्रमी ग्रँड स्लॅम्स जिंकलीत आजवर! 2008 ची ऐतिहासिक विम्बल्डन फायनल जिंकून क्ले चॅम्पियन नदालने आपला वरचष्मा ग्रासकोर्टवरदेखील सिद्ध केला. पण 2009 मध्ये जिद्दी रॉजरने त्याला आजवर हुलकावणी देणाऱ्या लाल मातीवरच्या जिंकायला सर्वात अवघड अश्या फ्रेंच ओपनचं विजेतेपद मिळवून 'करीअर स्लॅम'सुद्धा मिळवून दाखवलं!
2016 च्या विम्बल्डनमध्ये सेमीफायनलमध्ये पोचला असताना 4थ्या सेटमध्ये रॉजरला गुडघ्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. पुढचे 6 महिने त्याला स्पर्धात्मक टेनिसपासून दूर व्हावं लागलं. हा काळ रॉजरसारख्या टेनिसप्रेमी आणि अव्वल खेळाडूसाठी अतिशय मानसिक तणावाचा आणि वेदनेचा ठरला.
2017 साल उजाडलं आणि नेहमीप्रमाणेच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेने टेनिस मोसमाची सुरुवात झाली. आता पस्तीस वर्षांचा झालेल्या (टेनिससाठी 'वयोवृद्ध!') फेडररने त्यात खेळून आपली क्षमता सिद्ध करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा जवळपास सर्व टेनिसप्रेमी चकित झाले. पण तो क्वार्टर/सेमी फायनलच्या पुढे जाऊ शकेल हे कुणीही गृहीत धरलं नाही. 
शेवटी तो अफलातून खेळ करत आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या खेळाडूंना नेहमीच्याच सहजपणे हरवत फायनल मध्ये पोचला तेंव्हासुद्धा समोर परत एकदा तीस वर्षीय नदालरूपी भिंत होती. पण शेवटी ही स्पर्धा जिगरबाजपणे 5 सेट्समध्ये जिंकून 18वं ग्रँड स्लॅम दिमाखात जिंकत रॉजरने स्वतःला परत एकदा सिद्ध केलं! रॉजर नुसता खेळाडू म्हणूनच नाही, तर एक जंटलमन म्हणूनही तितकाच प्रसिद्ध आहे. "आज नदालकडून हरलो असतो, तरी वाईट नसतं वाटलं, मी फक्त खेळाचा आनंद घेण्यासाठी स्पर्धा खेळत आहे.... मला आणि नदालला आजची ट्रॉफी विभागून द्या' असे उद्गार फक्त जगज्जेता रॉजर फेडररच काढू शकतो!

असाच खेळत रहा! You are my true champion forever!!

~तुझ्या जगभरातल्या असंख्य चाहत्यांमधलाच एक 
अमित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा