मतदानाचा हक्क, की कर्तव्य!
~ अमित कालेकर
२० नोव्हेंबर २०२४
माझ्या शेजारच्या एका हाऊसिंग सोसायटीत आज 86% लोकांनी मतदान केलं. तिथं जवळपास सगळेजण सिनिअर सिटीझन असले, तरी त्या सर्वांचा उत्साह दांडगा. माझी आई सध्या तिथंच भाड्याने राहते. सकाळी लौकर उठून, आवरून व्होटिंग कार्ड्स आणि स्लिपा घेऊन बूथ्सवरती रांगेत शिस्तबद्धतेने उभे राहून मतदान करून आली मंडळी. परत घरी आल्यावर सोसायटीच्याच बागेत उभं केलेल्या 'मी मतदान केलं, तुम्ही केलं का?' ह्या आशयाच्या फलकापुढं / शेजारी उभं राहून फोटो काढून तो सोसायटीच्या व्हाट्सप ग्रुपवर पोस्ट केलेत! दर घरातून किती जणांनी मतदान केलं त्याचे आकडेही टाकले. त्यानुसार संध्याकाळी 6 च्या आत आकडेमोड करून ते 86% भरलं!
इव्हन कालपर्यन्त त्यांची तयारी सुरू होती, मतदान पावत्या आणि मतदार ओळखपत्र शोधून ठेवण्याची, आणि आपापल्या मतदान केंद्राची माहिती घेण्याची.
आणि या उलट पुणे किंवा पूर्ण महाराष्ट्र, जिथं 55% ही मतदान झालेलं नाहीय. हा उत्साह प्रत्येक हाऊसिंग सोसायटीतले नागरिक का नाही दाखवू शकत? काय अवघड आहे? सरकार आणि खाजगी कंपन्या मतदानाची सुट्टी जाहीर करतात. मतदार ओळखपत्रे घरी पोहोच होतात. सगळ्या गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळं त्रास असा काहीच नाही. ECI च्या वेबसाईटवर जाऊन, किंवा ऍप डाउनलोड करून रजिस्टर करायचं! आपलं आपलं EPIC कार्ड डाउनलोड करून ठेवायचं. आणि मतदानादिवशी 7 AM ते 5 PM ह्या तब्बल 10 तासांत फक्त 15 ते 30 मिनिटे काढून, आपापल्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावायला काय हरकत असते?? हा, तुमचं केंद्र जर राहत्या घराच्या खूपच दूर, किंवा दुसऱ्याच गावी असेल, तरच थोडीशी अडचण उद्भवू शकते. परंतु तीही, आधी प्लॅन केलं तर टाळता येते! जायचं आपापल्या गावी आणि टाकून यायचं आपलं बहुमूल्य मत! सर्वसामान्यपणे दर 5 वर्षांनी एकदा येणारा हा मतदानमेळा योग, का चुकवावा?
नुसतं, हे आत्ताचं सरकार कुचकामी आहे, काहीही करत नाही, असं गळे काढत बसण्याऐवजी, किंवा विद्यमान सरकारने चांगली कामे केली असल्यास त्यांना परत सत्तेत बसवण्यासाठी आपल्या मताची किती नितांत आवश्यकता आहे! सुजाण नागरिक म्हणवतो न आपण स्वतःला, मग हे कर्तव्य का पार पाडू शकत नाही बरं? आणि हे टाळून आपण आपल्या पुढच्या पिढीवरही किती वाईट, चुकीचा संस्कार करतोय??
(लेख आवडल्यास कंमेंट, शेअर करा! गूगल लॉगिन असल्याने अजून वेगळं लॉगिन करायची गरज नाही.)