दातेगड ट्रेक
27 ऑक्टोबर 2024
~ अमित कालेकर
गुरुवारचा सिंहगड सोडून आपल्या सह्याद्रीतले इतरही वेगवेगळे किल्ले करायच्या इच्छेला शनिवारी परत पालवी फुटली. कोयना परिसरात होतो, जवळपास काय काय आहे ते पाहूया म्हणून गूगलबाबाला साकडे घातले, आणि दातेगड हे नाव झळकले. (तसा भैरवगडही आला, पण तो नन्तर करणार). नवखा परिसर आणि त्या भागात एअरटेलला अजिबात रेंज नै, त्यामुळे स्थानिक वाटाड्या घेऊन जायचं ठरवलं.
रविवारी 27 ऑक्टोबरला रवी सकाळी बरोब्बर 6 ला ठरलेल्या ठिकाणी येऊन हजर झाला. माझ्या राहण्याच्या ठिकाणापासून दातेगड पायथा सुमारे 1 तासाच्या अंतरावर होता, आणि मला 9 वाजता परत येण्याचं बंधन होतं, त्यामुळे माझ्या कारने आम्ही तडक मार्गस्थ होते झालो. पाटणमधला सुरुवातीचा थोडा रस्ता फारच खराब, अगदी मुद्दाम नांगर फिरवावा तसा झालेला आहे. रवीशी गप्पा सुरु झाल्या. स्थानिक माहितीवर बोलून झाल्यावर तुला पक्षीनिरीक्षणात कितपत रस आहे ह्या प्रश्नावर त्याची कळी एकदम खुलली! ती का, ते त्याने पुढच्या दीड दोन तासात उत्तमरित्या सिद्धही केलं!
प्रचंड दाट असं धुकं होतं आज. इतकं, की रस्त्यावरून जाताना 5 फुटापलीकडचं काहीही दिसत नव्हतं. पुढं वळणावळणाच्या रस्त्यावर एका ठिकाणी अनेक पवनचक्क्याच्या मागून सूर्यनारायण प्रकटले! अगदी नयनमनोहर सूर्योदय! गाडी चालवत असल्याने फोटो जमला नाही😢
साधारणपणे 7 च्या सुमारास पायथ्याशी गाडी पार्क केली. आम्हीच आजचे पहिले ट्रेककरी, असं म्हणेपर्यंत एका बाईकवरून 3 जण आले देखील! अतिशय सुंदर हवा होती आजची.
20-25 मिनिटांत चढण चढून आम्ही किल्ल्यावर पोचलो देखील.
वरून भोवतालचे दृश्य एकदम हिरवंगार दिसत होतं. असंख्य रंगीबेरंगी फुलं! मुख्यतः पिवळीधम्म सोनकी आणि 7 वर्षानी उमललेली जांभळी कारवी. इथं टोपली कारवीही खूप आहे. दातपाडी तर ठायीठायी असतेच! रानकेळीही तुरळक. अन फुलं म्हटली की फुलपाखरं ही ओघानेच आली. खूप जातींची दिसली.
किल्ल्यावर पडझड झालेल्या कमानीतून प्रवेश केला. समोरच भिंतीवर कोरलेली मारुतरायाची शेंदूरने रंगवलेली, आणि डाव्या भिंतीवर वेगळेच कान असलेली गणरायाचीही सुमारे 10 12 फुटी कोरीव मूर्त्या! दर्शन घेऊन उजवीकडे पाहिलं तर जांभ्याच्या कातळात (Laterite) कोरून बनवलेल्या पायऱ्या. त्या घेऊन वरती पोचलो.
किल्ल्यावर काहीच शिल्लक नाही, ना महाल, ना सदर, ना बुरुज. एका वाड्याचे अवशेष मात्र वाडा बांधला आणि वापरलाही गेला असावा ह्याची साक्ष देणारे. सुमारे 3 एकर परिसरात किल्ला पसरला आहे. पाण्याची 2 टाकीही कोरली आहेत वरती.
किल्ल्याविषयी थोडंसं ...
१५७२ पासून गडाची जबाबदारी (देशमुखी) साळुंखे नावाच्या सरदाराला मिळाली होती. पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. ह्या गडास फारसा इतिहास नाही. हा शिवपूर्वकालीन गड आहे, कारण इथं खडकात खोदलेली विहीर व टाकी आहेत. दातेगडास शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असेही नाव होते.
मुख्य आकर्षण म्हणजे कातळात कोरलेली विहीर! सरळ रेषेत न कोरता वक्राकार, किंवा तलवारीच्या पात्याच्या कोरलीय तिला. आणि किमान 80-90 पायऱ्या तरी आहेत, पूर्णपणे 100 फूट खालपर्यंत पाण्याच्या पातळीपर्यन्त पोचायला.
खायलाप्यायला काहीही मिळत नाही किल्ल्यावर आणि आजूबाजूला. पण तशी गरजही नाही. येताना गाडीतही नुसत्या पक्षांच्याच गप्पा होत्या आमच्या. कोयना जंगलात कुठकुठले पक्षी आढळतात, ह्याची भरपूर माहिती रवीला आहे. साधारणपणे 9 च्या सुमारास आम्ही परतलो, ते परत भेटायचे आणि कोयना जंगल फिरायचे एकमेकांना आश्वासन देऊनच!
(लेख आवडल्यास कंमेंट, शेअर करा! गूगल लॉगिन असल्याने अजून वेगळं लॉगिन करायची गरज नाही.)
अरे अमित खूप छान माहिती.. आणि फोटो ही ..मारुती आणि गणपतीचे फोटो..खूप छान आले आहे, आणि तेअप्रतिम आहे...भावाला रे मित्रा... वर्णन जसा केला की मला वाटलं मी तिथेच आहे आणि मी या जागेचा आनंद घेत आहे
उत्तर द्याहटवा...मस्तच रे ..
धन्यवाद जयानंद!
हटवाMast trek aani informative writing ✍️ 👍
उत्तर द्याहटवाथँक्यू वैभव!
हटवासुंदर वर्णन..
उत्तर द्याहटवाधन्यवाद, अपर्णा!
हटवा