वीकएंड सकाळची धमाल!
~ अमित कालेकर, २८ सप्टेंबर २०२४
आज सकाळी प्लॅंक्सचा, गरवारे मेट्रो स्टेशन ते डेक्कन जिमखाना जिम आणि उलट चालण्याचा, पेट्रोल-की-प्यासी स्कुटी सुमारे 1 किलोमीटर ढकलत पेट्रोल पंपापर्यंत नेण्याचा आणि घराच्या बिल्डिंगचे 4 मजले चढण्याचा असे अनेक छोटेमोठे व्यायाम करून सुमारे पावणेनऊच्या सुमारास घरी परतलो. मेट्रो स्टेशनवर 1 मिनिटापूर्वी काढलेले ऑनलाइन तिकीट स्वागत यंत्राने नाकारून प्रवेश रोखला, त्यामुळे तिथल्या कर्मचाऱ्याशी अत्यंत सौम्य शब्दात बाचाबाची करत प्रश्न मिटवला. पण पुणे मेट्रो जगात भारीय. 7 अन 7 अशी 14 रुपयांत कोथरूड ते गरवारे रिटर्न AC जर्नी ह्या युगात कोण देते?? रिक्षाने 70 रुपये पडले असते. पण मला इस्त्राईलचं औषध नकोच होतं!
घरी आल्याआल्या बायकोने, "चल, तुला आज चिकन सूप कसं करायचं शिकवते" म्हटलं. चला हेही करू, म्हणत एक कांदा उभाउभा चिरून आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून कढईत थोडंसं तेल टाकून फोडणी करायला घेतली. मग त्यात थोडं थोडं लाल तिखट-हळद-मीठ टाकलं अन स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो चिकन ओतलं, ते छान घोळवत फोडणी चहूबाजूंनी लागली हे पाहत saute केलं. मग त्यात चिकन बुडेल इतपत गरम पाणी टाकलं अन वरती काचेचं झाकण ठेवून फुल गॅसवर 20 मिनिटे ठेवलं. अजून दुप्पट मीठ टाकून ढवळून चव घेतली. "तू मीठ जास्त टाकलं आहेस, सूप खूप खारट होणार" ह्या आरोपास ठार इग्नोअर करत, त्यावर कसलीही प्रतिक्रिया न देता शिताफीने भांडण टाळत ह्या 20 मिनिटात बायकोने सांगितलेली अनेक सटरफटर कामे उरकली. कडकडून लागलेल्या भुकेला शमवण्यासाठी दही-दूध-भात सोलापुरी शेंगाची चटणी टाकून कालवून खाल्ला, थोडे कालचे ढोकळेही फस्त केले. चिकन पीसेस मऊ आणि पांढरे व्हाईट्ट होईपर्यंत शिजले आहेत ह्याची खात्री झाल्यानंतर गॅस बंद केला.
बायकोला कफमुळं बरं नसल्याने केलेली ही सगळी पर्यायी व्यवस्था! तिला एक वाटी सूप पाजलं, आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अन घश्यास मिळालेला आराम बघून आपण चिकन सूप उत्तम शिकलोय ह्याचं समाधान बाळगत श्रमपरिहार करण्यासाठी गादीवर आडवा झालो अन हा लेख लिहिता झालो!☺️
(लेख आवडल्यास कंमेंट, लाईक, शेअर करा!)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा