गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

हॅम्लेट!


हॅम्लेट

~ अमित कालेकर, 2 नोव्हेंबर 2018 (तुमची टिप्पणी जरूर पोस्ट करा!)

20 ऑक्टोबरला दसऱ्याच्या सुट्टीदरम्यान पुण्यात दुपारी 12 वाजता हॅम्लेट नाटक पाहिलं, बालगंधर्वला. हाऊसफुल्ल हो!
खूप छान केलंय हे मराठीतील हॅम्लेट. चंद्रकांत कुलकर्णींचं उत्कृष्ट दिद्गर्शन, अष्टविनायक आणि जिगिशाचं प्रेझेंटेशन आणि झी मराठीची निर्मिती.

तुषार दळवी क्लॉडियस (हॅम्लेटच्या बापाचा लहान भाऊ, जो नंतर कपटाने राजा बनतो), मुग्धा गोडबोले गरट्रुड (राणी), सुनील तावडे पोलोनीयस, मनवा नाईक ऑफिलिया (पोलोनियसची मुलगी आणि हॅम्लेटची प्रेयसी), मराठीतला उगवता हँडसम नायक भूषण प्रधान लियाटस (ऑफिलियाचा भाऊ) ह्यांनी मुख्य भूमिका छान केल्यात!  इतर भूमिका करणारे नटही छान वावरलेत, उदा आशिष कुलकर्णी (हॅम्लेटच्या बापाचं भूत किल्ल्याच्या तटबंदीवर पहिल्यांदा पाहणारा हॅम्लेटचा मित्र, होरॅशिओ). नेपथ्य, प्रकाशयोजना आणि ध्वनी केवळ लाजवाब.

आणि, हॅम्लेटच्या भूमिकेत सुमित राघवन अक्षरशः घुसलाय!अप्रतिम काम, हॅट्स ऑफ!

आणि हे सगळं थेटरात पहिल्या रांगेत बसून पाहायला मिळणं हा किती भाग्याचा अवसर! (अर्थात, हजार रुपये तिकिटं थोडं दडपण आणतंच म्हणा! पण, वर्थ इट) महिनाभर आधी आईने तिकिटं बुक करून ठेवली होती, शेजारच्या काकूंना सांगून.

शेक्सपिअरच्या ओरिजिनल जडजम्बाळ इंग्रजीतल्या वाक्यांचं मराठीत, आणि तेही अर्थ न बदलता भाषांतर करणं किती अवघड काम, पण नाना जोगांनी खूप छान केले आहे ते. राहुल रानडेंचं म्युझिक मस्तच! किती वर्षांनी 3 अंकी नाटक मराठीत पाहायला मिळालं! नाहीतर हल्ली 1 किंवा 2 अंकीच असतात बहुधा. आणि ह्या भल्या मोठ्या लांबलचक वाक्यांचे संवाद बिनचूक, भाव पकडून, बेअरिंग मध्ये राहून सादर करायला सर्वच पात्रानी, विशेषतः सुमितने काय मेहनत घेतली असेल,
सही!!!

लहानपणापासूनच शेक्सपिअर माहीत असतो आपल्याला. पण त्याची नाटकं आवर्जून वाचावीत हे कधी सुचलं नव्हतं मला. त्यात ती जुनी अवघड इंग्रजी, आणि खेळण्यातून वेळ कुठला मिळायला! त्यामुळं फक्त "टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन" हेच वाक्य फक्त ठाऊक. बाकी काही माहीत नव्हतं. आणि हो, ते हॅम्लेटच्या बापाचं भूत! पण काहीही काँटेक्स्ट नाही. म्ह्णून मग असं मायमराठीतलं नाटक आवर्जून बघावंस वाटलं. आणि असला कलाकार वर्ग! मक्काय हो!
नाटकातले म्युझिक पीसेस बरेचसे बीथोवन - मोझार्ट च्या सिंफनीतले आहेत ... आता युट्यूबवर बघणार / ऐकणार मी त्या सिंफनीज!
त्या प्राचीन काळच्या चालीरीती, संगीत, कपडे यांचं खूप छान असं सादरीकरण आहे हे नाटक. शेवटी एक छोटंसं द्वंद्वयुद्ध (तलवारबाजी)ही आहे नाटकात. हॅम्लेट आणि लियाटसमधलं. ते पाहताना त्यामागचे कष्ट समजून येतात. आणि शेवटी सगळेच जण या ना त्या कारणाने एकामागोमाग एक मरतात. शोकांतिकाच आहे ही.
हॅम्लेटचे पुढचे प्रयोग 12 ते 14 नोव्हेंबरला मुंबईत आहेत हो sssssss!

मंगळवार, ३१ जुलै, २०१८

पासपोर्ट!

पासपोर्ट डिपार्टमेंटच्या कार्यक्षमतेची कमाल!

~ अमित कालेकर, 1 ऑगस्ट 2018, पुणे (Do like and comment!)

शुक्रवारी, 27 जुलैला आईच्या पासपोर्ट रिन्युअलची अपॉईंटमेंट घेतली. (अगदी, कार्यालयीन मराठीतच लिहायचं, तर 'पारपत्राच्या नूतनीकरणाची आगाऊ वेळ'! पण असं लिहिलं तर हल्ली किती जणांना कळेल?? 😀 जाऊद्या, इंग्रजाळलेल्या भाषेतच लिहितो!) ऑनलाइन फॉर्म भरला, तोही फक्त 15 मिनिटांत. पासपोर्ट अजून काही दिवस व्हॅलीड असल्याने फक्त आधार कार्ड आणि पासपोर्ट नंबर टाईप करावा लागला. (आधार व्हॅलीडेशन पण अक्षरशः एका मिनिटात ऑनलाईन होतं! UIDAI साईटची त्वरित संलग्नता!) इतर कुठलेही डॉक्युमेंट्स नाही लागले.
अपॉइंटमेंट नॉर्मल घेतली, तात्काळ नाही. पण, सोमवारची, म्हणजे 30 जुलै, 3:30 PM ची मिळाली. एकच दिवसानंतरची! (शनिवार-रविवार नका हो लगेच मोजून '3 दिवस की हो', असे म्हणू! पासपोर्ट ऑफिसलाही 5 वर्किंग डेज आहेत!) अपॉईंटमेंट घेतानाही, आपण आपल्याला हवी ती तारीख निवडू शकतो. आणि एकदा घेतलेली अपॉईंटमेंट आपल्याला जमत नसल्यास अजून एकदा पोस्टपोन करून मिळू शकते.
आई-पप्पा सोमवारी जरा लवकरच, म्हणजे पावणेतीनलाच मुंढवा ऑफिसात पोचले. MSEB बिल, 2-3 फोटोज वगैरे घेऊन. तर, त्यांना लगेचच आत घेतले. सव्वातीनला प्रोसिजर पूर्ण होऊन ते बाहेरही पडले! आतमध्ये 4-5 टेबलांवर जाऊन काही कागदपत्रे, फोटोज काढणे, डॉक्युमेंट स्कॅनिंग वगैरे अशी काहीशी ती प्रोसेस असते. बरोबर आणलेली इतर कागदपत्रे, फोटोसुद्धा लागले नाहीत, फक्त पासपोर्ट आणि आधार कार्ड बास.
आणि, आश्चर्याचा शेवटचा धक्का म्हणजे आज, बुधवार 1 ऑगस्टला पासपोर्ट घरपोच आलाही!!!

जबरदस्त काम! 👌🏼👌🏼👌🏼 कशाला हवंय तात्काळ! किंबहुना, आता असं म्हणावंसं वाटतंय, की तात्काळ केलं असतं, तर पासपोर्ट तिथेच सोमवारी आईच्या हातातच दिला असता!!

प्रायव्हेटायझेशनचा हा एक अतिशय उत्कृष्ट नमुना! थँक्स गव्हर्नमेंट आणि TCS कंपनी, अतिशय कार्यक्षम गव्हर्नन्स! 👌👌👌👌आणि, ह्या सगळ्या कामाची फी फक्त ₹ 1,500/-. इतक्या जलदगतीने जर आपलं काम होत असेल तर ते खरंच वर्थ!

ता.क.: जर का व्हॅलीड पासपोर्ट नंबर मी ऑनलाइन फॉर्म भरताना  दिला, तर .... तो अर्ज भरायला मला 15 मिनिटं तरी का लागावीत! 😀😀😀 आमची सगळी माहिती तर आहेच की पारपत्र कार्यालयाकडे! (आता, ह्याला म्हणतात, मूर्तिमंत हावरटपणा! आणि म्हटलं, की माझ्या ह्या लेखाचा शेवटही मायम्हराटीतच करावा! रेडिओ fm 95 वर हल्ली म्हणे सलग 30 सेकंद मराठीत, एकही इंग्रजी शब्द न उच्चारता बोललं, तर चांगलं बक्षीस मिळतं! इच्छुकांनी / जाणकारांनी 'अख्ख्या पुण्यात वर्ल्ड फेमस' असलेल्या त्या 'RJ बंड्याला' फोन ... चुकलं ... दूरभाष / भ्रमणध्वनी लावावा!)




शनिवार, २६ मे, २०१८

डॉ. लागूंची भेट!


डॉ. लागूंची भेट!

अमित कालेकर, 26 मे 2018, वेताळ टेकडी, कोथरूड पुणे
(Do like and comment!)


ARAI टेकडीवर मी तसा नेहमीच जातो. तिथं अतिशय नित्यनेमाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व नटसम्राट डॉ. श्रीराम लागू संध्याकाळी येऊन एका ठरलेल्या बाकावर बसतात. आणि मला दिसतातही, पण मी त्यांना कधी डिस्टर्ब करायला जात नाही. पण काल वाटलं. मग त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या पायाशी बसलो. त्यांच्या शेजारी दीपा लागूही बसल्या होत्या ... दोघांनी माझी आस्थेने चौकशी केली. नावगाव विचारलं. कुठले तुम्ही? काय करता? वगैरे वगैरे.

'तुमच्याबरोबर एक फोटो काढू का' असं विचारल्यावर लगेच हो म्हणाले! दीपा लागूंनी लगेच केस सारखे करत छान पोझ दिली!

दीपा लागू म्हणाल्या, 
तुम्ही रेग्युलर व्यायामाला येत नाही 😄 यायला पाहिजे तुम्ही. इतक्या जवळ राहता टेकडीच्या!

आपले सोनारानेच का कान टोचले पाहिजेत नेहमी?? 😟