गुरुवार, १ नोव्हेंबर, २०१८

हॅम्लेट!


हॅम्लेट

~ अमित कालेकर, 2 नोव्हेंबर 2018 (तुमची टिप्पणी जरूर पोस्ट करा!)

20 ऑक्टोबरला दसऱ्याच्या सुट्टीदरम्यान पुण्यात दुपारी 12 वाजता हॅम्लेट नाटक पाहिलं, बालगंधर्वला. हाऊसफुल्ल हो!
खूप छान केलंय हे मराठीतील हॅम्लेट. चंद्रकांत कुलकर्णींचं उत्कृष्ट दिद्गर्शन, अष्टविनायक आणि जिगिशाचं प्रेझेंटेशन आणि झी मराठीची निर्मिती.

तुषार दळवी क्लॉडियस (हॅम्लेटच्या बापाचा लहान भाऊ, जो नंतर कपटाने राजा बनतो), मुग्धा गोडबोले गरट्रुड (राणी), सुनील तावडे पोलोनीयस, मनवा नाईक ऑफिलिया (पोलोनियसची मुलगी आणि हॅम्लेटची प्रेयसी), मराठीतला उगवता हँडसम नायक भूषण प्रधान लियाटस (ऑफिलियाचा भाऊ) ह्यांनी मुख्य भूमिका छान केल्यात!  इतर भूमिका करणारे नटही छान वावरलेत, उदा आशिष कुलकर्णी (हॅम्लेटच्या बापाचं भूत किल्ल्याच्या तटबंदीवर पहिल्यांदा पाहणारा हॅम्लेटचा मित्र, होरॅशिओ). नेपथ्य, प्रकाशयोजना आणि ध्वनी केवळ लाजवाब.

आणि, हॅम्लेटच्या भूमिकेत सुमित राघवन अक्षरशः घुसलाय!अप्रतिम काम, हॅट्स ऑफ!

आणि हे सगळं थेटरात पहिल्या रांगेत बसून पाहायला मिळणं हा किती भाग्याचा अवसर! (अर्थात, हजार रुपये तिकिटं थोडं दडपण आणतंच म्हणा! पण, वर्थ इट) महिनाभर आधी आईने तिकिटं बुक करून ठेवली होती, शेजारच्या काकूंना सांगून.

शेक्सपिअरच्या ओरिजिनल जडजम्बाळ इंग्रजीतल्या वाक्यांचं मराठीत, आणि तेही अर्थ न बदलता भाषांतर करणं किती अवघड काम, पण नाना जोगांनी खूप छान केले आहे ते. राहुल रानडेंचं म्युझिक मस्तच! किती वर्षांनी 3 अंकी नाटक मराठीत पाहायला मिळालं! नाहीतर हल्ली 1 किंवा 2 अंकीच असतात बहुधा. आणि ह्या भल्या मोठ्या लांबलचक वाक्यांचे संवाद बिनचूक, भाव पकडून, बेअरिंग मध्ये राहून सादर करायला सर्वच पात्रानी, विशेषतः सुमितने काय मेहनत घेतली असेल,
सही!!!

लहानपणापासूनच शेक्सपिअर माहीत असतो आपल्याला. पण त्याची नाटकं आवर्जून वाचावीत हे कधी सुचलं नव्हतं मला. त्यात ती जुनी अवघड इंग्रजी, आणि खेळण्यातून वेळ कुठला मिळायला! त्यामुळं फक्त "टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन" हेच वाक्य फक्त ठाऊक. बाकी काही माहीत नव्हतं. आणि हो, ते हॅम्लेटच्या बापाचं भूत! पण काहीही काँटेक्स्ट नाही. म्ह्णून मग असं मायमराठीतलं नाटक आवर्जून बघावंस वाटलं. आणि असला कलाकार वर्ग! मक्काय हो!
नाटकातले म्युझिक पीसेस बरेचसे बीथोवन - मोझार्ट च्या सिंफनीतले आहेत ... आता युट्यूबवर बघणार / ऐकणार मी त्या सिंफनीज!
त्या प्राचीन काळच्या चालीरीती, संगीत, कपडे यांचं खूप छान असं सादरीकरण आहे हे नाटक. शेवटी एक छोटंसं द्वंद्वयुद्ध (तलवारबाजी)ही आहे नाटकात. हॅम्लेट आणि लियाटसमधलं. ते पाहताना त्यामागचे कष्ट समजून येतात. आणि शेवटी सगळेच जण या ना त्या कारणाने एकामागोमाग एक मरतात. शोकांतिकाच आहे ही.
हॅम्लेटचे पुढचे प्रयोग 12 ते 14 नोव्हेंबरला मुंबईत आहेत हो sssssss!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा