फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा
~ अमित कालेकर, 26 मे 2019 (Do like and comment!)
हे क्रीडाप्रेमी लोकहो, त्यातही टेनिसप्रेमी!
आजपासून वर्षातली दुसरी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, म्हणजेच फ्रेंच ओपन सुरू होतीय. होतीय म्हणजे काय, झालीय! आणि अँजेलिक कर्बरसारखी जर्मन दिग्गज खेळाडू पहिल्याच फेरीत बाहेरही पडलीय! लांबलचक चालणाऱ्या सामन्यांमुळं ही स्पर्धा इतर स्लॅम्सच्या तुलनेत एक दिवस आधीच, म्हणजे रविवारीच सुरू होते. मातीवरची ही एकमेव ग्रँडलॅम. इतर ग्रँड स्लॅम्स भलेही जिंको, पण ही स्पर्धा जिंकणं भल्याभल्यांना जमत नाही. अमेरिकन पीट सँप्राससारखा जगज्जेता खेळाडूही ह्या स्पर्धेच्या विजेतेपदापासून वंचित राहिलाय. आपला आवडता स्वित्झर्लंडचा देखणा रॉजर फेडररही, ज्याने 20 ग्रँड स्लॅम्स पटकावून ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट होण्याचा मान मिळवलाय, तोही केवळ एकदा म्हणजे 2009 मध्ये ही स्पर्धा जिंकू शकला आहे. तेही त्यात नदाल फायनलपर्यंत पोचू शकला नाही म्हणून! फ्रेंच ओपनचा लेख रफाएल नदालशिवाय पूर्ण होऊच कसा शकेल! तर ह्या स्पेनच्या जिगरबाज डावखुऱ्या आक्रमक खेळाडूने त्याच्या 17 ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या यादीत फ्रेंच ओपन स्पर्धा तब्बल 11 वेळा जिंकलीय!! इतक्या वेळा एखादी ग्रँड स्लॅम आजवर कुणीही जिंकलेलं नाहीय. (फेडररने विम्बल्डन स्पर्धा 8 वेळा जिंकलीय.) त्यातही, नदालने 11 वं विजेतेपद तर प्रत्येक मॅच सरळ सेट्समध्ये जिंकून पटकावलंय! अशी कामगिरीही आजवर कुणीही केलेली नाहीय!
गतकाळचे फ्रेंच ओपन विजेते खेळाडू मायकेल चँग (अमेरिका), सर्जी ब्रुगुएरा (स्पेन) हेही आज आठवत आहेत. जर्मनीची महान खेळाडू स्टेफी ग्राफ, जिने 22 ग्रँड स्लॅम्स जिंकण्याचा पराक्रम केलाय, तिनेही ही स्पर्धा अनेकदा जिंकलीय.
ज्याने फ्रान्समध्ये विमानयुगाची मुहूर्तमेढ रोवली, अश्या रोलँड गॅरोस नावाच्या एका फ्रेंच वैमानिकाचं नाव दिलं गेलेलं हे स्टेडियम फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आहे. हा पहिल्या वर्ल्ड वॉरचा हिरोही मानला जातो. तांबड्या मातीवर ही स्पर्धा खेळवली जाते. खरंतर, काँक्रीटवर अग्निजन्य खडकांचा थर आणि त्यावर पांढऱ्या लाईमस्टोनची भुकटी असते, आणि त्यावर काही मिलिमीटरचा लाल विटांच्या भुकटीचा थर असतो, जो त्या मैदानाला तांबडा रंग प्राप्त करून देतो. त्यावर अर्थात रोलर अनेकदा फिरवला जातो. ह्या मातीमुळे पाण्याचा निचरा होण्यास चांगली मदत होते, आणि पाऊस पडला तरी कमीतकमी वेळात मैदान परत खेळासाठी योग्य होतं. तब्बल एकवीस एकरात 20 टेनिस कोर्ट्स असलेलं हे एक भव्य क्रीडा संकुल सीन नदीकिनारी पसरलेलं आहे. ह्यातच टेनिसचं एक म्युझियम, टेनिसियम, ही आहे. इथलं सेंटर कोर्ट फिलिप चॅट्रिअर ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्यावर पाऊस पडल्यास सामना सुरू राहावा ह्यासाठी आच्छादित केलेलं आणि मागे घेता येण्याजोगं छप्परही बसविलेलं आहे. त्याची आसनक्षमता साडेपंधरा हजार इतकी आहे. इथं जिंकण्यासाठी फारच वेगळे डावपेच लागतात. सर्वात महत्वाचं म्हणजे, शारीरिक (आणि मानसिकही!) तंदुरुस्तीची परमोच्च कसोटी. इथं सर्व्ह-अँड-व्हॉली, तुफानी सर्व्हिसेस, नेटजवळचा नजाकतभरा खेळ असलं काही फारसं चालत नाही! इथं, आला चेंडू की तडकव, हीच भाषा चालते.
ही स्पर्धा 1928 मध्ये सुरू झाली. फ्रान्सने त्यांच्या देशात डेव्हिस कप स्पर्धा खेळवण्यासाठी ह्या स्टेडियमची निर्मिती केली होती. मे महिन्याचा शेवटचा आणि जूनचा पहिला आठवडा ह्या कालावधीत, जो फ्रेंच वसंत ऋतू असतो, त्यात ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते. कमाल 27 अंश ते किमान 8 अंश सेल्सिअस अश्या सुरेख तापमानात जगभरातले 128 खेळाडू आपलं कसब इथं पणाला लावतात! जगातली सर्वात लाडकी आणि जुनी (1889 साली सुरू) विम्बल्डन हिरवळ स्पर्धा फ्रेंच ओपननंतर केवळ महिन्याभराच्या आतच सुरू होत असल्यामुळे बहुतांश खेळाडू दमलेले असतात! त्यात विम्बल्डनच्या तयारीसाठी एक स्पर्धा अनेकजण खेळतात. जो फ्रेंच ओपन जिंकून, ही क्वीन्स ओपन खेळून (कदाचित जिंकूनही!) लगेचच विम्बल्डनही जिंकून दाखवतो, तो खेळाडू केवळ ग्रेट! केवळ 4 पुरुष खेळाडूनी आजवर हे साध्य केलंय. स्वीडनचा बियों बोर्ग, ऑस्ट्रेलियन रॉड लेव्हर, नदाल आणि फेडरर. म्हणूनच हे लोक ग्रेट आहेत!! अनेकांच्या करिअर स्लॅमच्या (चारही ग्रँड स्लॅम्स किमान एकदातरी जिंकणे) स्वप्नात फ्रेंच ओपन हाच एक मुख्य अडसर असतो, उदा. तीन वेळचा विम्बल्डन विजेता आणि एकंदर 6 ग्रँड स्लॅम विजेता जर्मन बोरिस बेकर, 14 ग्रँड स्लॅम जिंकणारा पीट सँप्रास.
यंदाही नदाल विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पण तो फ्रेंच ओपनची तयारी समजल्या जाणाऱ्या 3 स्पर्धांमध्ये (माँटेकार्लो, बार्सिलोना आणि माद्रिद ओपन) मध्ये सेमीफायनल्समध्येच गारद झालाय. मात्र त्यानंतरची रोममध्ये अगदी मागच्या आठवड्यात खेळली गेलेली इटालियन ओपन स्पर्धा जोकोविचला बेस्ट-ऑफ-थ्री सेट्सच्या लढतीत हरवून जिंकत नदाल फॉर्मात आलाय! जोकोने आधीच्या तीनही ग्रँडस्लॅम्स सलग जिंकल्या आहेत (विम्बल्डन-अमेरिकन 2018 आणि ऑस्ट्रेलियन 2019). त्यामुळं फ्रेंच ओपनमध्ये जोकोच पहिला मानांकित खेळाडू आहे. नदाल दुसरा, तर फेडरर तिसरा मानांकित आहे.
आज काही वेळातच, म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:55 pm ला फेडरर आपली पहिली मॅच खेळेल. नदाल आणि जोको आपल्या मॅचेस उद्या खेळतील. आज आपल्या देशाचा एक खेळाडूही, P गुणेश्वरन, आपली पहिली मॅच कोर्ट नंबर 13 वर खेळणार आहे!
1975 मध्ये जन्मलेला मी आजवर अनेक विजेत्यांचा खेळ पाहत लहानाचा मोठा झालोय. बोरिस बूम-बूम बेकर, पिस्टोल पीट सँप्रास, रिटर्न स्पेशालिस्ट आंद्रे आगासी, ग्रेसफुल पॉवरफुल स्टेफी ग्राफ हे माझे अतिशय आवडते खेळाडू. ह्यांचा आपापला एक ऑरा आणि एरा होता. तो संपल्यानंतर दुसऱ्या खेळाडूंनी त्यांची जागा घेत आपली मक्तेदारी निर्माण केली. पण 2003 पासून आपलं अढळ स्थान निर्माण केलेल्या सदतीस वर्षीय बुजुर्ग फेडरर, बत्तीस वर्षांचा नदाल आणि 2007-8 पासून अवतरलेला बत्तीस वर्षांचाच जोकोविच ह्यांना पुरून उरेल असा एकही खेळाडू अजूनही निर्माण होत नाही हेच एक दुःख आहे! ब्रिटनचा अँडी मरे थोडा काळ ह्यांच्या पंक्तीत गणला गेला, पण तोही अंतर्धान पावला. हे तिघे ग्रेटच आहेत, पण नवीन रक्तात त्यांच्याइतकी धमक दिसत नाही. थोडीफार आशा जर्मन झ्वेरेव बंधू, त्सित्सिपास, डॉमिनिक थिएम, मरियन चिलीच ह्यांत दिसते, पाहू.
चला तर मग, औत्सुक्याने भरलेली फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पाहायला आता टीव्हीकडे वळू या!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा