शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

कांडेसर (Woolly Necked Stork)



कांडेसर (Woolly Necked Stork)
~ अमित कालेकर, 27 फेब्रुवारी 2022 (Do like and comment!)

शनिवार दुपारी साडेतीनची टळटळीत दुपार. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील माझ्या गावातल्या शेतातला मुक्काम संपवून पुण्याच्या म्हणजेच कर्मभूमीच्या वाटेला लागतच होतो (अर्थात, जड अंत:करणाने!). अजून कार ओढ्यातून वरती घेतच होतो. ओढ्यात अजूनही थोडं पाणी शिल्लक होतं. अर्थात, वाहतं नव्हतं. पात्रातले दगडगोटे चुकवत वाट काढत गाडीच्या क्लच-ब्रेकची आणि माझ्या ड्रायव्हिंग स्किलची (सारथ्यकुशलता! आज मराठी भाषा दिन आहे म्हटलं, मंडळी!) सत्त्वपरीक्षा घेत वरती येत होतो. तेवढ्यात डावीकडच्या बाजूला ओढ्यातच वूली नेक्ड स्टॉर्कची एक जोडी दिसली! तिथंच गाडी थांबवली. शेजारच्या सीटवर बसलेल्या आईचा ओरडा खात! ('झाsssलं ... गेली आता 15-20 मिनिटं वाया', असं कायसं ऐकू आलं, पण मी नेहमीप्रमाणेच कानाडोळा केला.) इतक्या उन्हाचं कुठल्यातरी डेरेदार झाडावर जाऊन 1 ते 4 मस्त झोपायचं, वामकुक्षी वगैरे घ्यायची, की उगं मासे, किडे खात हिंडायचं?? पण हे लोकरमानेचे करकोचे मात्र मजेत नदीतळ, त्यातलं गवत उपसत खाद्य धुंडाळत होते.

गडद काळसर चॉकलेटी पंख आणि पाठ. गडद हिरव्या निळ्या जांभळ्या रंगांच्या काही पिसांमुळे चमचमणारा भास. लाल डाळिंबी डोळे. उंची सुमारे अडीच ते 3 फूट. डोक्यावरही त्याच काळसर चॉकलेटी रंगाची टोपी घालावी, असा एक पॅच. लांब, टोकदार, लाकडी वाटावी अशी राखाडी जाड, अगदी सरळ, निमुळती होत जाणारी चोच, आणि टोकापाशी थोडीशी लालसर रंगाची झाक. मानेभोवती पांढरीशुभ्र लोकर गुंडाळली आहे असं वाटण्याजोगी पांढरी बारीक पिसे. उडत जाताना दिसणारी रुबाबदार फ्लाईट. माझी चाहूल लागली, अन दोघांतला एक करकोचा उडून थोडा लांबवर जाऊन स्थिरावला, आणि परत त्याने नदीपात्रात चोच खुपसली. बहुधा त्याला माझं तिथलं अस्तित्व आवडलं नसावं.
मायमराठीत ह्याला कांडेसर, कौरव, पांढर्‍या मानेचा करकोचा अशी नावे आहेत. (कौरव का, ते मात्र समजलं नाही.)

मला फोटोला पोझ द्यायला उभे असलेले हे महाशय (की महाशया?) मात्र तिथून हलले नाहीत. माझी दया आली असावी त्यांना! गवतातच इकडे तिकडे चालत राहिले. सावध नजर मात्र माझ्यावरच रोखलेली होती. उंच गवतामुळे मला त्याचे पाय नीटसे दिसले नाहीत. (मक्काय, गूगल बाबा!) सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे मोठ्या संख्येने आढळतात. मी त्यांना अनेक पाणवठ्यांवर, शेतांत पाहिलेले आहे. मासे, साप, बेडूक, सरडे, जंगली पाली (Gecko), मोठे कीटक हे ह्यांचे प्रमुख भक्ष्य. नर आणि मादी जवळजवळ सारखेच दिसतात, फरक असा ओळखू येत नाही. (नर थोडा मोठा, आणि जास्त रंगीत असतो, असंही वाचनात आलं.) विणीच्या हंगामात (म्हणजे डिसेम्बर ते मार्च) वाळक्या काटक्या एकत्र करून एखाद्या वीसेक मीटर उंच झाडावर घरटं बांधून त्यात 2 ते 5 अंडी दिली जातात. घरटं नर की मादी बांधते हा मात्र एक अनुत्तरित प्रश्न. तेच घरटं वर्षानुवर्षे वापरलं जातं. हा पक्षी फिलिपिन्ससारख्या आशियायी देशामधून आता जवळपास नामशेष झालेला आहे.

ह्यावेळी फक्त 4-5 मिनिटांत फोटोग्राफी उरकून पुढे गेलो. भूभागाच्या चमत्कारिकपणामुळं आणि वेळेअभावी मी जास्त फोटोज नाही काढू शकलो. शिवाय गावच्या जत्रेमुळं त्या ओबडधोबड वाटेवरही वर्दळ होतीच. त्यामुळं तिथं थांबणं अशक्य होतं. पण गावाकडच्या पुढच्या फेरीत जास्त वेळ देऊन निरीक्षण करणारे मी ह्याचं. 
घरी आल्यावर, हे फोटोज जेंव्हा आईला दाखवले, तेंव्हा ती म्हणते, 'अजून 10 मिनिटं थांबून नीट फोटो काढायला हवे होतेस!'

कांडेसराबरोबरच, सराटी, म्हणजे काळ्या डोक्याचा पांढरा बगळा (Black Headed White Ibis) ही त्याच ओढ्यात जोडीने फिरताना दिसला. पण त्याविषयी थोडं नन्तर, चांगलं निरीक्षण केल्यावर लिहीन. तोवर, रामराम!

ता. क. : 1. आज जरी मराठी भाषा दिन असला, तरी इंग्रजी सुद्धा नीटच लिहावं. उदा. Necked असंच लिहावं, naked असं करू नये ☺️☺️आणि उच्चारही, नेक्ड असा हवा, नेकेड नाही!
2. Woolly, की Wooly???

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मल्हारगड

 मल्हारगड ट्रेक

6 फेब्रुवारी 2022

~ अमित कालेकर (विनीत जतकर आणि डॉ अमित थत्तेंसोबत)

 (Do like and comment!)

सिंहगड सोडून इतरही किल्ले करण्याचं ठरवून त्यानुसार आज मल्हारगडाची भ्रमंती प्लॅन केली. सासवड/जेजुरीच्याजवळ असलेला हा एक छोटासा किल्ला, झेंडेवाडी आणि काळेवाडी ह्या 2 छोट्याश्या गावांच्यामध्ये. पुण्यापासून जेमतेम 37 किमी वर. मराठ्यांनी बांधलेला हा अगदी शेवटचा किल्ला. पुण्याहून सासवडला जाताना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती इ. स. १७५७ ते १७६० या काळात केली गेली. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ’सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते. सासवड म्हटलं, की गप्पांच्या ओघात उत्तुंग व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे आणि कऱ्हा नदी आठवणारच! 

रात्रीच बॅग भरून ठेवलेली. झोपायला 10:30 चे 12 वाजलेच तरी! मोबाईलवर फुकाचा टाईमपास कोण करणार! पहाटे 5 ला उठून आवरून 6 च्या ठोक्याला घराबाहेर पडलो, कार घेऊन वाटेत इतर 2 मित्रांना उचलून कर्वेनगरमार्गे मार्गस्थ झालो. मल्हारगड हे ह्यातल्याच एका अनुभवी मित्राचं सजेशन.

सुमारे 7:30 ला पायथ्याशी कार पार्क करून चढाई सुरू केली. रस्ता केलाय, तो बराच वरपर्यंत जातो. शिवाय एक छोट्या पायवाटेच्या शॉर्टकटनेही वरती जाता येते. थंडी होती, पण साडे आठनन्तर ऊन लागायला लागलं. ब्राईट लाईट! डोळ्यांना त्रास देणारा. किल्ल्यावर आज बरीच गर्दीही होती. बरेच जण पिकनिक मूडवाले.

किल्ल्याचं आणि तटबंदीचं बांधकाम इतर मोठ्या किल्ल्यांच्या तुलनेत जुजबी वाटलं. उंची काही फार नाही, छोट्या डोंगरावर बांधलेला हा किल्ला. किल्ल्याची पडझडही खूप. थोडाफार जीर्णोद्धार केला गेलाय. किल्ला संपूर्ण फिरून पाहायला पाऊण तास पुरेसा आहे. वरती 2 छोटीशी पण छान मंदिरे आहेत, एक खंडोबा आणि दुसरं शिवमंदिर.

किल्ल्याभोवतालचा परिसर बराच सपाट आहे, पण पाणी आहे, अनेक शेततळी अलीकडच्या काळात सरकारी अनुदानावर तयार झालेली आहेत. त्यामुळं हिरवळ आणि मग चांगली शेती दिसते. परिसरात मुख्यतः अंजीर लागवड आहे. आम्ही एका शेताशेजारी गाडी थांबवून थोडी अंजिरे गाडीतच खायला आणि काही घरी न्यायला घेतली. अतिशय ताजी आणि गोड. इतरही काही पालेभाज्या त्यांच्या टवटवीतपणामुळे घ्याव्याश्या वाटणे स्वाभाविकच होते! ह्या कुटुंबवत्सलपणाचे घरी थोडे कौतुकही होते!

अंजिरे घेऊन / खाऊन गाडी पुढं सरकली, आणि रस्त्याच्या डावीकडे असलेल्या एका पाणथळीशेजारी थांबवली, कारण तिथं Little Egret (बगळा), Red Wattled Lapwing (टिटवी), Pond Heron (बगळा) ह्या कॉमन पक्ष्यांबरोबरच Common Moorhen (पाणकोंबडी) आणि Spot Billed Duck (हळदीकुंकू) जोडी ही दिसले. आणि तारेवरती White Breasted Kingfisher (खंड्या) होताच! पण उतरून डिकीतून कॅमेरा बॅग काढून DSLR बाहेर काढून नेम धरेपर्यंत टिटवी सोडून सगळेजण उडाले! पण मग थोडंसं पुढं गेल्यावर डोळ्यांच्या कोपऱ्यात एक ओझरती हालचाल जाणवली अन गाडी परत थोडी मागे घेऊन उजवीकडच्या कंपाऊंडच्या सिमेंट खांबावर नजर गेली, तर त्यावर बसलेला Ashy Crowned Sparrow Lark Male (डोंबारी चंडोल नर) दिसला! जड अशी कॅमेरा बॅग आणि अजून एक छोटी सॅक (पाणी, टोपी, खाणं इत्यादीसाठीची) अंगावर वागवत ट्रेक करण्याचा प्लॅन अगदीच काही वाया गेला नाही! पण, ती टोपी मात्र मी जन्मजात वेंधळेपणामुळं कुठंतरी विसरलो 😢

घरून येताना आणलेले काही खाद्यपदार्थ वरतीच संपवले. पण आता खाली उतरल्यानन्तर मिसळ खायचा प्लॅन होता. इथल्या रस्त्यांवर मिसळीची य दुकाने आहेत. इतकी दुकाने लगोलग का, आणि ती किती चालत असतील हा एक प्रश्नच. आम्ही आपले शकुंतला मिसळीकडे वळलो. चव बरी होती. भरीस थंडगार चविष्ट मठ्ठाही होता. ही झाली रेग्युलर मिसळ. स्पेशल मिसळीच्या प्लेटमध्ये गुलाबजामही देतात! आम्ही लांबूनच हात जोडले!


आता सासवडमध्ये संगमेश्वर मंदिर पहावे म्हणून गाडी तिकडं वळवली. गावातून छोट्या रस्त्याने पेठेतून नदीकाठी जावे लागते. आधी पुरंदरे वाडा लागतो, मग भैरवनाथ मंदिर अन मग पुढं संगमेश्वर.  पुरंदरे वाड्याची भिंत किती भव्य आहे! पण वाडा बंद होता, बहुधा जीर्णोद्धार सुरू असावा. 



संगमेश्वर मंदिर छान आहे, त्याचंही दुरुस्तीचं काम सुरू आहे. पण नदी अतिशय गलिच्छ. पाणवनस्पती आणि सांडपाणी. बरीच दुर्गंधी. बिचाऱ्या संगमेश्वराने ही मास्क घालावा का आता?? अजून एक निरीक्षण म्हणजे इलेक्ट्रिक वायर्सनी मंदिरांची शोभा अक्षरशः घालवली आहे आपल्याकडे. दीपमाळ, कळस किती वाईट दिसतात त्या वायर्समुळं 😢 आणि हे बऱ्याच देवस्थानांच्या बाबतीत आहे.




मोनोलिथिक नंदी काय छान दिसतो! बरीच मोठी कोरीव मूर्ती ती. पण इथं 2 नंदी आहेत, मोठा मंदिरात आणि छोटा बाहेर. ह्याचं कोडं काही उलगडलं नाही. मंदिराचे बांधकाम आवडले, टीपीकल कोरीवकाम, नक्षीकाम आहे.

आता परतीची वाट धरली. येताना बरंच ट्रॅफिक लागलं.

एका छोट्याशा पण छान ट्रेकच्या आठवणी घेऊन दुपारी 12 च्या सुमारास घर गाठलं! (तसं पाहिलं तर आज आमच्यापेक्षा गाडीचाच व्यायाम जास्त झाला!) पुढचा किल्ला वाई परिसरातला करायचा असं ठरवून. बहुधा केंजळगड / पांडवगड. आणि तोही एक महिन्याच्या आत!