शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

कांडेसर (Woolly Necked Stork)



कांडेसर (Woolly Necked Stork)
~ अमित कालेकर, 27 फेब्रुवारी 2022 (Do like and comment!)

शनिवार दुपारी साडेतीनची टळटळीत दुपार. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील माझ्या गावातल्या शेतातला मुक्काम संपवून पुण्याच्या म्हणजेच कर्मभूमीच्या वाटेला लागतच होतो (अर्थात, जड अंत:करणाने!). अजून कार ओढ्यातून वरती घेतच होतो. ओढ्यात अजूनही थोडं पाणी शिल्लक होतं. अर्थात, वाहतं नव्हतं. पात्रातले दगडगोटे चुकवत वाट काढत गाडीच्या क्लच-ब्रेकची आणि माझ्या ड्रायव्हिंग स्किलची (सारथ्यकुशलता! आज मराठी भाषा दिन आहे म्हटलं, मंडळी!) सत्त्वपरीक्षा घेत वरती येत होतो. तेवढ्यात डावीकडच्या बाजूला ओढ्यातच वूली नेक्ड स्टॉर्कची एक जोडी दिसली! तिथंच गाडी थांबवली. शेजारच्या सीटवर बसलेल्या आईचा ओरडा खात! ('झाsssलं ... गेली आता 15-20 मिनिटं वाया', असं कायसं ऐकू आलं, पण मी नेहमीप्रमाणेच कानाडोळा केला.) इतक्या उन्हाचं कुठल्यातरी डेरेदार झाडावर जाऊन 1 ते 4 मस्त झोपायचं, वामकुक्षी वगैरे घ्यायची, की उगं मासे, किडे खात हिंडायचं?? पण हे लोकरमानेचे करकोचे मात्र मजेत नदीतळ, त्यातलं गवत उपसत खाद्य धुंडाळत होते.

गडद काळसर चॉकलेटी पंख आणि पाठ. गडद हिरव्या निळ्या जांभळ्या रंगांच्या काही पिसांमुळे चमचमणारा भास. लाल डाळिंबी डोळे. उंची सुमारे अडीच ते 3 फूट. डोक्यावरही त्याच काळसर चॉकलेटी रंगाची टोपी घालावी, असा एक पॅच. लांब, टोकदार, लाकडी वाटावी अशी राखाडी जाड, अगदी सरळ, निमुळती होत जाणारी चोच, आणि टोकापाशी थोडीशी लालसर रंगाची झाक. मानेभोवती पांढरीशुभ्र लोकर गुंडाळली आहे असं वाटण्याजोगी पांढरी बारीक पिसे. उडत जाताना दिसणारी रुबाबदार फ्लाईट. माझी चाहूल लागली, अन दोघांतला एक करकोचा उडून थोडा लांबवर जाऊन स्थिरावला, आणि परत त्याने नदीपात्रात चोच खुपसली. बहुधा त्याला माझं तिथलं अस्तित्व आवडलं नसावं.
मायमराठीत ह्याला कांडेसर, कौरव, पांढर्‍या मानेचा करकोचा अशी नावे आहेत. (कौरव का, ते मात्र समजलं नाही.)

मला फोटोला पोझ द्यायला उभे असलेले हे महाशय (की महाशया?) मात्र तिथून हलले नाहीत. माझी दया आली असावी त्यांना! गवतातच इकडे तिकडे चालत राहिले. सावध नजर मात्र माझ्यावरच रोखलेली होती. उंच गवतामुळे मला त्याचे पाय नीटसे दिसले नाहीत. (मक्काय, गूगल बाबा!) सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे मोठ्या संख्येने आढळतात. मी त्यांना अनेक पाणवठ्यांवर, शेतांत पाहिलेले आहे. मासे, साप, बेडूक, सरडे, जंगली पाली (Gecko), मोठे कीटक हे ह्यांचे प्रमुख भक्ष्य. नर आणि मादी जवळजवळ सारखेच दिसतात, फरक असा ओळखू येत नाही. (नर थोडा मोठा, आणि जास्त रंगीत असतो, असंही वाचनात आलं.) विणीच्या हंगामात (म्हणजे डिसेम्बर ते मार्च) वाळक्या काटक्या एकत्र करून एखाद्या वीसेक मीटर उंच झाडावर घरटं बांधून त्यात 2 ते 5 अंडी दिली जातात. घरटं नर की मादी बांधते हा मात्र एक अनुत्तरित प्रश्न. तेच घरटं वर्षानुवर्षे वापरलं जातं. हा पक्षी फिलिपिन्ससारख्या आशियायी देशामधून आता जवळपास नामशेष झालेला आहे.

ह्यावेळी फक्त 4-5 मिनिटांत फोटोग्राफी उरकून पुढे गेलो. भूभागाच्या चमत्कारिकपणामुळं आणि वेळेअभावी मी जास्त फोटोज नाही काढू शकलो. शिवाय गावच्या जत्रेमुळं त्या ओबडधोबड वाटेवरही वर्दळ होतीच. त्यामुळं तिथं थांबणं अशक्य होतं. पण गावाकडच्या पुढच्या फेरीत जास्त वेळ देऊन निरीक्षण करणारे मी ह्याचं. 
घरी आल्यावर, हे फोटोज जेंव्हा आईला दाखवले, तेंव्हा ती म्हणते, 'अजून 10 मिनिटं थांबून नीट फोटो काढायला हवे होतेस!'

कांडेसराबरोबरच, सराटी, म्हणजे काळ्या डोक्याचा पांढरा बगळा (Black Headed White Ibis) ही त्याच ओढ्यात जोडीने फिरताना दिसला. पण त्याविषयी थोडं नन्तर, चांगलं निरीक्षण केल्यावर लिहीन. तोवर, रामराम!

ता. क. : 1. आज जरी मराठी भाषा दिन असला, तरी इंग्रजी सुद्धा नीटच लिहावं. उदा. Necked असंच लिहावं, naked असं करू नये ☺️☺️आणि उच्चारही, नेक्ड असा हवा, नेकेड नाही!
2. Woolly, की Wooly???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा