रविवार, १७ डिसेंबर, २०१७

ऑफिस आऊटिंग! ड्रीमलँड रिसॉर्ट

ऑफिस आऊटिंग!
~अमित, 17 डिसेंबर 2017


शुक्रवारी फुल-डे ऑफिस आऊटिंग होतं ड्रीमलँड रिसॉर्ट (मुळशी)त. छान स्पॉट आहे. 3 बाजुंनी डोंगरांनी वेढलेला.



भरपूर मोकळी आणि डोंगरांत असूनही सपाट जागा, खालच्या बाजूस मस्त मोठ्ठा आणि स्वच्छ स्विमिंग पूल, टेस्टी फूड, पार्किंगला ample जागा. सकाळी 10 च्या सुमारास आम्ही काही जण बसने तर काही कारने तिथं ( फोटोज काढत काढत!) पोचलो. गेल्यागेल्या मस्त न्याहरी! मग मैदानी खेळ.



आम्ही किती वर्षांनी खोखो खेळलो! सांधे आणि हाडं किती वाईट खिळखिळी झालीयेत हे तिथं समजलं 😫😫 डिसेंबर असूनही दुपारी ऊन बरंच होतं. आपल्याला सवय राहिलेली नाहीय उन्हाची अजिबातच, AC त बसून बसून. दुपारी फुल-टू स्विमिंगही केलं.



रात्री चांदण्यात गप्पाटप्पा. तारकांच्या समूहांवर पण थोडी (गहन) चर्चा 😀 टेंट्स मध्ये निन्नी केली!



थंडी बरीच होती. 👌👌 मस्त एक्सपिरिएंस! 
काल सकाळी 8 ला एकटाच कारने परत निघालो.



सगळं दाट जंगलच आहे तिथं जवळपास. त्या सकाळच्या जंगलाचा आवाज आणि वास अफाट भारी! (समुद्राची जशी 'गाज' तसा ह्या जंगलाच्या आवाजाला पण शब्द असला पाहिजे.) पक्ष्यांची किलबिल, संपत चाललेल्या वाहत्या पाण्याचा आवाज, वाऱ्यामुळे होणारी पानांची सळसळ!👌 एका मोठ्या ओहोळावरच्या पुलापाशी हे झाड वरती आलेलं दिसलं म्हणून थांबून हा फोटो DSLR ने काढला. काटेसावर झाड आहे हे. लाल आणि पांढरा रंग कसला मस्त काँट्रास्टिंग!



त्याआधी एक स्पॉटेड डव्ह (गळ्यावर / मानेवर काळे ठिपके असणारा हलका तपकिरी होला, किंवा छोटं कबुतर. पुण्यात मी कॉलर्ड डव्ह पाहिलेत, पण स्पॉटेड पहिल्यांदाच), आणि Jungle Fowl (रानकोंबडा) विथ फॅमिली पण दिसले होते (5 - 6 पिल्लं (म्हणजे चिक्स!) कसली छोटी, मस्त!), पण कॅम्येरा जवळ न ठेवल्यामुळं फोटोज हुकले. (डिकीत ठेवला होता 'सांभाळून' 😫) खरंतर रस्ता सोडून जंगलाच्या आत शिरून अनुभवलं पाहिजे जंगल. पण त्यासाठी हिंमत हवी 😀 जंगली श्वापदांच्या भुकेच्या वेळा ठाऊक हव्यात, नाहीतर त्यांची न्याहरी आपणच व्हायचे!

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

भुलेश्वर!



भुलेश्वर शिवमंदिर
21 ऑक्टोबर 2017 (Do like and comment!)

आज आम्ही सहकुटुंब भुलेश्वर मंदिराला भेट दिली. शिवमंदिर आहे हे. ते सोलापूर रोडवर पुण्यापासून सुमारे 40 km वर उजवीकडे एक फाटा फुटतो, (चक्कचक्क पाटी आहे!) तिथून पुढं भुलेश्वर घाट पार करून अजून 15-18 km जावं लागतं. रस्ता ओके टाईप्स आहे.


अप्रतिम कोरीवकाम!!


बरीचशी शिल्पं भंगलेली, पण जी आहेत ती खूपच रेखीव.


कासवाचं एक लांबलचक आयताकृती शिल्प वेगळंच.


नंदीचं शिल्प खूपच मोठ्ठं आणि रेखीव!👍


खांबांची शिल्पं 👌



नर्तिकांची शिल्पं केवळ लाजवाब, पण बहुधा सगळीच्या सगळी कुणा कंटकांनी (की मुघलांनी??) वेळोवेळी केवळ विघ्नसंतोषापायी नष्ट केलेली 😡


बहुधा हेमाडपंती असावं मंदिराचं ओरिजिनल बांधकाम.


आधीमधी जीर्णोद्धार झाल्यासारखं वाटलं मला. कारण काही बांधकामे कमी दर्जाची वाटली.




पुरातत्व खात्याची पाटी काही आढळली नाही, त्यामुळे मंदिराबद्दलची माहिती मिळू शकली नाही. इंटरनेटवर मिळेल बहुतेक. अजूनही दगडकाम सुरुय तिथं. सगळा परिसर खूपच रम्य आहे, थोडाफार हिरवीगारही. घाट रस्ता ड्रायव्हिंगसाठी चॅलेंजिंग! मला आवडला. शेवटीशेवटी खूप झाडी लागते, आणि खूपश्या पशुपक्ष्यांची छानछान चित्रे त्यांच्या सामान्य आणि शास्त्रीय नावांसकट दिसत जातात. तिथं हे पक्षीप्राणी आढळत असावेत. पुण्याहून जाताना एक टोल लागतो, रिटर्न Rs. 37.5/-. (पन्नास पैसे आपण मागत नाही, आणि तेही देत नाहीत! सरळ Rs. 38/- का नाही करून टाकत?? किंवा 40?) रस्त्यातली हॉटेल्स जेवणासाठी अगदीच पथेटिक. सगळी नॉनव्हेज. प्युअर व्हेज अगदीच नगण्य. आणि सर्व्हिस अगदी उपकार केल्यासारखी, अतिशय संथ. तुम्ही आपापलं जेवण सरळ बरोबर न्या, आणि भुलेश्वर मंदिरातच मस्त झाडांखाली सावलीत कोरीव दगडांवर बसून जेवा!
मागल्या वर्षी याच दिवशी दिवाळीत आम्ही सगळेजण औरंगाबादजवळ घृष्णेश्वर शिवमंदिरात होतो, आज इथं! त्याच्या मागच्या वर्षी भोरजवळ बनेश्वर शिवमंदिर! मात्र हा केवळ योगायोग!

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

बाहुबली 2

बाहुबली 2

~अमित कालेकर, 2 ऑक्टोबर 2017
 (Do like and comment!)


काल टीव्हीवर 'बाहुबली 2' चा वर्ल्ड प्रीमियर लागला म्हणून बघायला घेतला, मुलगी नको म्हणत असताना 😃 मुव्ही आला तेंव्हा "कशाला? तेलुगू चित्रपट अतिरंजित असतात, उगा पैसे वाया का घालवा?" म्हणून पाहिला नव्हता. (पहिला भागही अजून नाही बघितला.)
आणि तेंव्हाचा माझा निर्णय सार्थ ठरवत काल पैसे नाहीत तरी वेळ मात्र वाया घालवला आम्ही 😫
एकतर आम्ही जवळपास अर्धा सिनेमा झाल्यावर टीव्ही ऑन केला. त्यात पहिल्या भागाचा रेफरन्स नाही. बाहुबली देवसेनेला एकाच वेळी 3 बाण कसे मारावेत त्याचं प्रात्यक्षिक देत असताना आम्ही टीव्ही ऑन केला. हा चित्रपट 'काहीही' ह्या कॅटेगरीतच मोडतो. हिरोने काय काय करावं?? कश्याही अतर्क्य उड्या, 3-3 बाण असंख्य वेळा मारूनही भाता भरलेलाच, लार्जर दॅन लाईफ असे डायलॉग, रामापेक्षा जास्त सत्यवचनीपणा, 'दिवार'च्या शशीकपूरपेक्षा जास्त कर्तव्यदक्षपणा, वचनबद्धता वगैरे वगैरे. ड्रॉइंग बोर्डवर इंजिनीअरिंग चित्र काढताना, त्रिकोनी गुन्या वापरताना दाखवलाय बाहुबली! भन्नाट वेगात धावणाऱ्या 2 बैलांच्यामध्ये उभा असलेल्या बाहुबलीला बघून अजय देवगणचीच आठवण (बघा: फूल और कांटे) आली.
सिनेमा कसला पळवलाय! आधी अमरेंद्र, मग महेंद्र, किती पिढ्या बघायच्या?? कटप्पा तर मठ्ठप्पा वाटला. अत्युच्च दर्जाचं ग्राफिक्स हाच फक्त उजवा भाग वाटला ह्या मुव्हीचा. खूपच भारी दाखवलीय माहिष्मती नगरी. अतिभव्य. असं वाटावं की इतकं विस्तीर्ण बांधकाम करायला किती शतकं, पैसा आणि कामगार लागले असतील 😃 आणि त्याच्या डेली मेंटेनन्स वर किती वेळ, पैसा ओतावा लागत असेल! आणि ती दुर्बीण तर फारच म्हणजे! भल्लालदेवाची गाडी आणि त्यावरची ती फिरती शस्त्रं, आणि सटासट सुटणारे असंख्य बाण, सारंच अतर्क्य. बाहुबलीला माहिष्मती नगरीत प्रोजेक्टाईल केलेला सीन तर केवळ अफाट! माडाच्या झाडांना वाकवून 7-8 लोकांना कॅटापुल्ट करता येतं? तेही ढाली गुंडाळून?? अक्षरशः काहीही. माहिष्मती साम्राज्याचे रुल्स आणि व्हॅल्यूज म्हणत म्हणत काहीही पाणचटपणा बघावा लागतो. बापाला सख्ख्या 2 मुलांमध्ये एकाबद्दल इतका द्वेष असू शकतो?? बाहुबली सावत्र मुलगा आहे काय राजघराण्याचा? पहिला भाग पाहिला नसल्यामुळे मला रेफरन्स नसेल, त्यामुळं पण हा प्रश्न चुकीचा असू शकेल. भल्लालदेवाला फक्त दुष्टपणा, खलनायकी हे एकच काम आहे. (महाराजा म्हणून काहीच करत नसेल का तो??) आणि त्याच्या वडिलांना शकुनीपणा! देवसेनेला पण नुसते पोकळ आणि आढ्य डायलॉग मारायला दिलेत.
असो. ह्या असल्या टुकार चित्रपटाने हजार कोटींचा व्यवसाय केला असेल हे मला अजिबात पटलं नाही.
जाऊद्या, 'बाहुबली 3' आला तर बघायचा नाही हे मात्र 100% नक्की!