शुक्रवार, २४ जून, २०२२

पुणे-सासवड वारी 24 जून 2022

पुणे -सासवड वारी

~ अमित कालेकर, 24 जून 2022 (Do like and comment!)


आज पुणे सासवड वारीबरोबर चालत जाण्याचा प्लॅन होता. दिवेघाटातून जाणारा हा सर्वात मोठा आणि अवघड टप्पा पार करायचा अशी अनेक वर्षांची इच्छा होती. मुलीने न कुरकुरता घरून स्टार्ट पॉईंटला पहाटे 5:45 ला सोडलं! आमच्या ट्रेक ग्रुपबरोबर 6:15 ला स्वारगेटच्या नटराज हॉटेलपाशी जमून तिथून चालायला सुरुवात केली.

जसजसा वेळ गेला तसतसे ऊन वाढत चालले. आज नेमकं पावसाळी हवामान नसून कडक सूर्य! सुमारे 10 km चालल्यावर माऊली पालखीचं मनोहारी दर्शन घडलं. फुलांच्या हारांनी सजलेला चैतन्यमयी तो रथ पाहून मनात सालाबादप्रमाणेच भक्तीभावाचा संचार झाला. हात आपोआप जुळले, आणि पाऊले त्या रथाकडे वळली. ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुकांचे दर्शन आणि स्पर्श घडला. तुफान गर्दी! तरी माऊलींच्या इच्छेने मार्ग सापडत गेला. 

वारीबरोबर पुढं वाटचाल सुरू ठेवली. उत्साही ग्रुप मेंबर्सबरोबर अंतर झपझप मागे पडत चालले. मध्येच थांबून वडापाव, चहा, फोटोज. लोक किती दानशूर असतात, समाजाला किती देणं देतात हे वारीत समजतं. पाणी, बिस्किटे, खिचडी, केळी, मेडिकल सुविधा, सगळं अव्हेलबेल, आणि फुकट. शिवाय, होणारा कचरा लगेच सावरणाऱ्या सेवाभावी संस्थाही अफाट कार्य करतात. वाटेत ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढल्या जात होत्या, छोट्या मुलांना ऐतिहासिक वेषांत बाजूच्या तात्पुरत्या केलेल्या स्टेजेसवरती उत्साहात नाचताना बघून वेगळंच चैतन्य येत होतं.

पण ऊन वाढत चाललं होतं. मला पुढं जास्त कन्टिन्यू करण्याची इच्छा होईना. फुरसुंगी ब्रिज पार करून उरुळी देवाची पर्यन्त पोचलो, आणि म्हटलं आज इतकं पुरे. आता परत फिरावे. नुकतेच आता ढग दाटत होते, हवा गार व्हायला लागली होती, पण तरी आता इथून पुढे जाण्याची इच्छा नव्हती.

मग एक रिक्षा मिळाली, त्यातून कोंढवा खडी मशीन चौक, आणि तिथून पुढं 2 बाईकस्वारांकडून लिफ्टस घेत स्वारगेटपर्यन्त पोचलो.

मग परत थोडा उत्साह आला, आणि तिथून पायी घरी निघालो. 4 किमी चाललो, आणि मग परत एक ऑटो करून घरी परतलो. आज एकूण 21 किमी चालणं झालं. पुणे सासवड 32 किमी होतं, त्या मानाने हे कमीच, पण तरी ओके. कदाचित कालच केलेल्या सिंहगड ट्रेकचा थकवा ही कारणीभूत असावा...

पण आता ठरवलं, की पुढच्या वर्षी हा टप्पा यशस्वीपणे पार करणारच!

माऊली माऊली ☺️☺️🙏🙏

गुरुवार, १२ मे, २०२२

No Sun-Day सिंहगड Trek!


No Sun-day सिंहगड trek!
~ अमित कालेकर, 12 मे 2022 (Do like and comment!)

टायटल वाचून चक्रावलात? द्वयर्थी का लिहिलंय असं वाटतंय? तसंच आहे ते. ह्या गुरुवारी (12 मे) पहाटे मला माझा आवडता सिंहगड ट्रेक करावासा खूप वाटत होता, आणि ह्या कडक उन्हाळ्यातल्या, मे महिन्यातल्या दिवशी संपूर्ण ट्रेकभर मला सूर्यदर्शन झालंही नाही! म्हणून हे टायटल.

4:20 AM चा गजर लावून उठलो, आणि आज 5:13 AM ची PMPML बस (50K रुट) घेऊन सिंहगड पायथा गाठायचा हे नक्की केलं. आदल्या दिवशी रात्रीच बहुतेक सगळी तयारी केली होती, त्यामुळे पटकन आवरून स्कुटीवरून बाहेर पडलो आणि कर्वे रोडवर मारुती मंदिर बसथांब्यावर 5:10 लाच आलो. पण 5:30 पर्यन्त बसच नाही! मग निराश होऊन परत घरी आलो, कारची किल्ली घेतली आणि निघालो. अर्धा तास इथंच वाया. नन्तर कळलं, की बस 5:05 लाच गेली! Moovit नावाचं (गव्हर्नमेंटचं??) एक टुकार ऍप आहे, त्यावर ही 50 K बस फक्त शनिवारी धावते असं दिसतं. कोण असले ऍप तयार करतं आणि मेंटेन करतं?? GPS लावून कार चालवत निघालो, तो GPS नेही नेमका दगा दिला! पार नव्या कात्रज बोगद्यापर्यन्त नेऊन पोचवलं. मग चरफडत GPS बंद करून यू-टर्न घेऊन नेहमीची वाट घेतली, सुसाट वेगात 6:20 AM ला सिंहगड पायथ्याला पोचलो. ह्या आंबेगाबच्या घाटातल्या रस्त्यावर 60 km ची स्पीड लिमिट आहे. पण माझा वेग बराच जास्त होता! RTO चं प्रेमपत्र येईल अशी धास्ती आहेच. इथंही, घरी जावं आणि सरळ एक छोटीशी एक दीड तासाची 20-30 km सायकल राईड करावी आणि WFH ऑफिस सुरू करावं असा निगेटिव्ह विचार प्रबळ होता होता थांबवला! Determination against all odds!

कात्रज बोगद्यापर्यन्त बरंच ब्राईट होत असलेलं आकाश आता हळूहळू काळवंडायला लागलं. डिसेम्बर 2020 नन्तर आज प्रथमच सिंहगड करत होतो. त्यामुळे आज जमेल का अशीच धास्ती! खडकवासला धरणाच्या थोडं आधीपासून अत्यंत सुमार दर्जाचा रस्ता सुरू होतो, तो थेट सिंहगड पायथ्याशी संपतो. अनेक वर्षं हा रस्ता असाच ill maintained च आहे.

6:25 ला ट्रेक सुरू केला. आणि मोबाईलवरती स्ट्राव्हा / रीलाईव्ह / पेडोमीटर ही ऍप्सही. इअरफोन्स असूनही नाही घातले, कारण आज निसर्गगान ऐकत जायचं ठरवलं. गार, थोडी ओलसर अशी हवा, आणि अचानक आजूबाजूच्या झाडांवर काळ्या तोंडाच्या शेपटीवाल्या सवंगड्यांनी स्वागत केलं! माणसे नव्हतीच. एखाददुसरी व्यक्तीच काय ती. उन्हाळ्याचे दिवस आहेत हे सांगूनही खरं वाटू नये अशी हवा. पण थोडीशी दमटही. बहुधा, अस्मि ह्या आंध्र किनारपट्टीवरच्या चक्रीवादळाचा परिणाम! 


आता उत्साहात निघालो. रात्रीच्या पूर्वतयारीत सॅकमध्ये टोपी-गॉगल ठेवलेले, पण पुढे पूर्ण ट्रेकभर त्यांची गरजच पडणार नव्हती! पाण्याची एक बाटली आणि ग्लुकोज बिस्किटांचा एक पुडा होता बरोबर. घरून निघताना काही ड्राय फ्रूटस (बदाम, खजूर आणि अंजीर) खाऊन आणि 2 पेले पाणी पिऊनच निघतो मी सायकलिंग / रनिंग / ट्रेकिंगला. त्यामुळे पुढचे 2 तास तरी पोटाला काही लागत नाही.
अर्ध्या अंतरात पोचलो असेन, तेवढ्यात परत येणारा एक 4 जणांचा ग्रुप भेटला. आणि त्यातल्या एकाने (बहुधा 55-57 वयाचे असतील) सहज हात पुढं करत पटकन माझ्या हातावर खडीसाखर ठेवली आणि पुढे निघून गेले! छान वाटलं. मीही आता नेक्स्ट ट्रेकला ही परंपरा सुरू ठेवीन. खडीसाखर द्यायला घ्यायला ओळख हो कसली लागते!
अर्ध्या अंतरावरती, म्हणजे मेट्याला एक छोटी अशी शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना आहे. वाटेत अर्थात 3-4 ठिकाणी थांबून सेल्फीज आणि समोरची दृश्यंही टिपली. तेवढीच क्षणभर विश्रांती. आणि ह्या विश्रांतीनन्तर परत चालायला सुरुवात केली की नवी एनर्जी आलेली असते!



शेवटच्या टप्प्यात एकाला 'अजून किती वेळ लागेल हो मला'? असं विचारलं तर 10-12 मिनिटात पोचालच वर असं उत्तर मिळालं आणि अजूनच उत्साह वाढला. आता एक खडी चढण लागली. वास्तविक तिला टाळून वळसा घेऊन कमी स्लोपच्या वाटेने जाता आलं नसतं का? पण किडे! कोअर स्ट्रेंथ ट्रेनिंगमधला माऊंटन क्लाइम्बर व्यायाम खरोखरच, अगदी सरपटत करता येईल अशी ती चढण घेऊन वर गेलो. कातळावर स्वतःला पेलत. आणि इतक्यात, अंगावर पावसाचे 3-4 शिंतोडे! पण 3-4 च. पाऊस असा पडलाच नाही. 
वरती आलो, आणि टायमिंग चेक केलं. 59 मिनिटांत आलो होतो आज मी!!! 10-12 मिनिटं विश्रांतीची वजा केली, तर 47 मिनिटे लागली मला आज. इतक्या कमी वेळात मी गेल्या 7-8 वर्षांत आलेलो नाहीय. शेजारी असलेल्या मावशींच्या ठेल्यातून पटकन आधी सुमधुर लिंबू सरबत घेतलं. आणि एकाकडून फोटोज काढून घेतले, अर्थात FB वर आणि व्हाट्सपवर मिरवायला म्हणून! कात्रज-सिंहगड ट्रेकच्या (K2S) डोंगररांगा काय सुंदर दिसत होत्या! 7:24 ला वर पोचलो त्यामुळे हाती थोडासा वेळ होता.




मग कार पार्किंगवर गेलो. 2 खाजगी गाड्या आणि परिवहन मंडळाच्या 2 इलेक्ट्रिक बसेस तेवढ्या होत्या. हे पार्किंग असं मोकळं मोकळं बघायला नशीब लागतं महाराज! हल्ली गडावर जायला फक्त ह्या इ-बसेसच आहेत म्हणे. ह्या सेवेची उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेली कोनशीलाही दिसली.

तोरणा-राजगड दिसतात त्या जागेकडे गेलो. भणाणणारा वारा होता! तिथंच फक्त माझ्या मोबाईलला (एअरटेल! हवेमुळे का!) रेंज आली! मघा काढलेले आणि सेंडलेले फोटोज काही व्हाट्सप ग्रुप्सवर पोचले. तोरणा राजगड दोघेही ढगात! डोंगररांग तेवढी दिसत होती.

नेहमीच्या संतोषच्या ठेल्यावर आज भजी / मटका दही खायलाही वेळ नव्हता. तसाच परत फिरलो. तिथंच नाडगीर आज्जी भेटल्या. मूर्तिमंत सळसळत असणारा उत्साह! सत्तरी पार केली असेल त्यांनी, पण सतत गडांवरच असतात.


7:40 ला उतरायला सुरुवात केली. डावा गुडघा थोडीशी अस्तित्वाची जाणीव देत राहिला, पण मी सपशेल दुर्लक्ष केलं. बहिणीने गिफ्ट केलेले रनिंग शूज खूप मस्त आहेत! वाटेत पक्ष्यांचे अनेक आवाज येत राहिले. Black-rumped flameback ह्या सुतारपक्ष्याचं आज प्रथमच याचिडोळा दर्शन घडलं. आजवर ह्याला फक्त फोटो / इंटरनेटवरच पाहिलंय. पण आज फोटोग्राफी हे इंटेन्शन नसल्याने कॅमेरा बाळगला नव्हता. बॅबलर्स, बुलबुल खूप. क्रेस्टेड बंटिंग (युवराज) आणि ब्ल्यू रॉक थ्रश मात्र आज नाही दिसले. 34 मिनिटांत पायथा गाठला. अगदी शेवटी 2 भाजीवाल्या काकूंकडून गवार आणि वांगी घेऊन निघालो.

या वयात नको तिथं पाय घसरायला नको, असं लोक बोलतील म्हणून जास्त काळजीपूर्वक उतरलो! साधारण 8:30 ला कार घेऊन परत निघालो. वारजे परिसरात रस्त्यावर बरीच गर्दी. तरीही, सव्वानऊला अस्मादिक घरी! घरी पोचून आंघोळ उरकली. ब्रेकफास्टसाठी 2 अंडी उकडून घेतली, 2 कप चहा माझ्यासाठी अन बायकोसाठी बनवला, आणि काही फळे. आणि लग्गेच WFH ही सुरू!  आज दिवसभर कसलीतरी छान एनर्जी अंगात जाणवत राहिली. आणि सिंहगड सतत मनात येत राहिला.

दर गुरुवारी हा प्लॅन जमवायचा, पण बसने, असं ठरवतोय खरा, पण बघू, कितपत जमेल ते!

गुरुवार, ५ मे, २०२२

केगावकर सर

केगावकर सर
~ अमित कालेकर, 5 मे 2022 (Do like and comment!)

बहुधा 7वी किंवा 8वी इयत्ता असावी. आम्हाला नुकतंच फॉसिल्स (जीवाष्म, मराठी मिडीयममधला शब्द) बद्दल आमच्या सोलापुरातल्या हरिभाई देवकरण प्रशाळेत शिकवून झालं होतं. त्या दरम्यान, एकदा नव्या पेठेतल्या माझ्या घराच्या गच्चीवर क्रिकेट खेळत असताना तिथंच बाजूला पडलेल्या काही फरश्यांच्या ढिगात आमचा चेंडू गेला. कुणाचं तरी घराचं रिनोव्हेशन सुरू होतं, म्हणून त्या शहाबादी फरश्या तिथं आणून ठेवलेल्या होत्या. अस्मादिक चेंडू शोधायला निघाले. एका फरशीमागे दिसलाही. तो चेंडू बाहेर काढत असताना ती फरशी सरकवली, आणि मला त्या फरशीवरचं अतिशय सुंदर असं नक्षीकाम दिसलं! गडद हिरव्या रंगाच्या एखाद्या बारीक धाग्याने एखादी खूप कॉम्प्लिकेटेड वेलबुट्टी एखाद्या कापडावर विणावी ना, अगदी सेम तसंच दिसत होतं ते डिझाइन! आणि फरशीचा मागचा संपूर्ण पृष्ठभाग त्याने व्यापला होता. मक्काय, क्रिकेट सोडून आम्ही ती नक्षी बघण्यात गुंग! आणि मग अचानक बायोलॉजीमधला फॉसिलचा धडा डोळ्यांसमोर आला की. लाखों वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात गाडल्या गेलेल्या वनस्पती, आणि त्यावर प्रचंड दाब अन उष्णता ह्यामुळे त्या वनस्पतींचं रूपांतर असं फॉसिल्समध्ये होतं. आणि नेमकी तशीच एक मौल्यवान फरशी माझ्या आयती हाती गवसली होती! केवढं हे लक! 
केंव्हा एकदा दुसऱ्या दिवशीची सकाळ होते, आणि मी हा अनमोल ठेवा शाळेत नेऊन सरांना दाखवतो, असं झालेलं मला.
सकाळी शाळेत जाताना आठवणीने फरशी दप्तरात ठेवली. फरशी बरीच जड होती. 1'x1' साईझ असावा, पण सायकल मारत शाळेत पोचेपर्यंत माझा घाम निघाला होता! जीवशास्त्र शिकवायला आम्हाला केगावकर सर होते. तडक सरांकडे म्हणजे बायो लॅब मध्ये गेलो, आणि सरांना भेटलो. त्यांना फरशी दाखवली. सर अतिशय खुश झाले! कुठं मिळाली, डिझाइन वेगळं असलेल्या अजून काही फरश्या होत्या का, असले काही प्रश्न विचारून त्यांनी ती फरशी शाळेत लॅबमध्ये ठेवून घेतली. आपण काहीतरी उपयोगी वस्तू शाळेला देऊ शकलो, ह्या समाधानाने अस्मादिक वर्गात गेले! 
आज सरांच्या दुःखद निधनाची बातमी समजली, आणि हा प्रसंग आठवला....

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

कांडेसर (Woolly Necked Stork)



कांडेसर (Woolly Necked Stork)
~ अमित कालेकर, 27 फेब्रुवारी 2022 (Do like and comment!)

शनिवार दुपारी साडेतीनची टळटळीत दुपार. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील माझ्या गावातल्या शेतातला मुक्काम संपवून पुण्याच्या म्हणजेच कर्मभूमीच्या वाटेला लागतच होतो (अर्थात, जड अंत:करणाने!). अजून कार ओढ्यातून वरती घेतच होतो. ओढ्यात अजूनही थोडं पाणी शिल्लक होतं. अर्थात, वाहतं नव्हतं. पात्रातले दगडगोटे चुकवत वाट काढत गाडीच्या क्लच-ब्रेकची आणि माझ्या ड्रायव्हिंग स्किलची (सारथ्यकुशलता! आज मराठी भाषा दिन आहे म्हटलं, मंडळी!) सत्त्वपरीक्षा घेत वरती येत होतो. तेवढ्यात डावीकडच्या बाजूला ओढ्यातच वूली नेक्ड स्टॉर्कची एक जोडी दिसली! तिथंच गाडी थांबवली. शेजारच्या सीटवर बसलेल्या आईचा ओरडा खात! ('झाsssलं ... गेली आता 15-20 मिनिटं वाया', असं कायसं ऐकू आलं, पण मी नेहमीप्रमाणेच कानाडोळा केला.) इतक्या उन्हाचं कुठल्यातरी डेरेदार झाडावर जाऊन 1 ते 4 मस्त झोपायचं, वामकुक्षी वगैरे घ्यायची, की उगं मासे, किडे खात हिंडायचं?? पण हे लोकरमानेचे करकोचे मात्र मजेत नदीतळ, त्यातलं गवत उपसत खाद्य धुंडाळत होते.

गडद काळसर चॉकलेटी पंख आणि पाठ. गडद हिरव्या निळ्या जांभळ्या रंगांच्या काही पिसांमुळे चमचमणारा भास. लाल डाळिंबी डोळे. उंची सुमारे अडीच ते 3 फूट. डोक्यावरही त्याच काळसर चॉकलेटी रंगाची टोपी घालावी, असा एक पॅच. लांब, टोकदार, लाकडी वाटावी अशी राखाडी जाड, अगदी सरळ, निमुळती होत जाणारी चोच, आणि टोकापाशी थोडीशी लालसर रंगाची झाक. मानेभोवती पांढरीशुभ्र लोकर गुंडाळली आहे असं वाटण्याजोगी पांढरी बारीक पिसे. उडत जाताना दिसणारी रुबाबदार फ्लाईट. माझी चाहूल लागली, अन दोघांतला एक करकोचा उडून थोडा लांबवर जाऊन स्थिरावला, आणि परत त्याने नदीपात्रात चोच खुपसली. बहुधा त्याला माझं तिथलं अस्तित्व आवडलं नसावं.
मायमराठीत ह्याला कांडेसर, कौरव, पांढर्‍या मानेचा करकोचा अशी नावे आहेत. (कौरव का, ते मात्र समजलं नाही.)

मला फोटोला पोझ द्यायला उभे असलेले हे महाशय (की महाशया?) मात्र तिथून हलले नाहीत. माझी दया आली असावी त्यांना! गवतातच इकडे तिकडे चालत राहिले. सावध नजर मात्र माझ्यावरच रोखलेली होती. उंच गवतामुळे मला त्याचे पाय नीटसे दिसले नाहीत. (मक्काय, गूगल बाबा!) सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे मोठ्या संख्येने आढळतात. मी त्यांना अनेक पाणवठ्यांवर, शेतांत पाहिलेले आहे. मासे, साप, बेडूक, सरडे, जंगली पाली (Gecko), मोठे कीटक हे ह्यांचे प्रमुख भक्ष्य. नर आणि मादी जवळजवळ सारखेच दिसतात, फरक असा ओळखू येत नाही. (नर थोडा मोठा, आणि जास्त रंगीत असतो, असंही वाचनात आलं.) विणीच्या हंगामात (म्हणजे डिसेम्बर ते मार्च) वाळक्या काटक्या एकत्र करून एखाद्या वीसेक मीटर उंच झाडावर घरटं बांधून त्यात 2 ते 5 अंडी दिली जातात. घरटं नर की मादी बांधते हा मात्र एक अनुत्तरित प्रश्न. तेच घरटं वर्षानुवर्षे वापरलं जातं. हा पक्षी फिलिपिन्ससारख्या आशियायी देशामधून आता जवळपास नामशेष झालेला आहे.

ह्यावेळी फक्त 4-5 मिनिटांत फोटोग्राफी उरकून पुढे गेलो. भूभागाच्या चमत्कारिकपणामुळं आणि वेळेअभावी मी जास्त फोटोज नाही काढू शकलो. शिवाय गावच्या जत्रेमुळं त्या ओबडधोबड वाटेवरही वर्दळ होतीच. त्यामुळं तिथं थांबणं अशक्य होतं. पण गावाकडच्या पुढच्या फेरीत जास्त वेळ देऊन निरीक्षण करणारे मी ह्याचं. 
घरी आल्यावर, हे फोटोज जेंव्हा आईला दाखवले, तेंव्हा ती म्हणते, 'अजून 10 मिनिटं थांबून नीट फोटो काढायला हवे होतेस!'

कांडेसराबरोबरच, सराटी, म्हणजे काळ्या डोक्याचा पांढरा बगळा (Black Headed White Ibis) ही त्याच ओढ्यात जोडीने फिरताना दिसला. पण त्याविषयी थोडं नन्तर, चांगलं निरीक्षण केल्यावर लिहीन. तोवर, रामराम!

ता. क. : 1. आज जरी मराठी भाषा दिन असला, तरी इंग्रजी सुद्धा नीटच लिहावं. उदा. Necked असंच लिहावं, naked असं करू नये ☺️☺️आणि उच्चारही, नेक्ड असा हवा, नेकेड नाही!
2. Woolly, की Wooly???

रविवार, ६ फेब्रुवारी, २०२२

मल्हारगड

 मल्हारगड ट्रेक

6 फेब्रुवारी 2022

~ अमित कालेकर (विनीत जतकर आणि डॉ अमित थत्तेंसोबत)

 (Do like and comment!)

सिंहगड सोडून इतरही किल्ले करण्याचं ठरवून त्यानुसार आज मल्हारगडाची भ्रमंती प्लॅन केली. सासवड/जेजुरीच्याजवळ असलेला हा एक छोटासा किल्ला, झेंडेवाडी आणि काळेवाडी ह्या 2 छोट्याश्या गावांच्यामध्ये. पुण्यापासून जेमतेम 37 किमी वर. मराठ्यांनी बांधलेला हा अगदी शेवटचा किल्ला. पुण्याहून सासवडला जाताना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती इ. स. १७५७ ते १७६० या काळात केली गेली. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ’सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते. सासवड म्हटलं, की गप्पांच्या ओघात उत्तुंग व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे आणि कऱ्हा नदी आठवणारच! 

रात्रीच बॅग भरून ठेवलेली. झोपायला 10:30 चे 12 वाजलेच तरी! मोबाईलवर फुकाचा टाईमपास कोण करणार! पहाटे 5 ला उठून आवरून 6 च्या ठोक्याला घराबाहेर पडलो, कार घेऊन वाटेत इतर 2 मित्रांना उचलून कर्वेनगरमार्गे मार्गस्थ झालो. मल्हारगड हे ह्यातल्याच एका अनुभवी मित्राचं सजेशन.

सुमारे 7:30 ला पायथ्याशी कार पार्क करून चढाई सुरू केली. रस्ता केलाय, तो बराच वरपर्यंत जातो. शिवाय एक छोट्या पायवाटेच्या शॉर्टकटनेही वरती जाता येते. थंडी होती, पण साडे आठनन्तर ऊन लागायला लागलं. ब्राईट लाईट! डोळ्यांना त्रास देणारा. किल्ल्यावर आज बरीच गर्दीही होती. बरेच जण पिकनिक मूडवाले.

किल्ल्याचं आणि तटबंदीचं बांधकाम इतर मोठ्या किल्ल्यांच्या तुलनेत जुजबी वाटलं. उंची काही फार नाही, छोट्या डोंगरावर बांधलेला हा किल्ला. किल्ल्याची पडझडही खूप. थोडाफार जीर्णोद्धार केला गेलाय. किल्ला संपूर्ण फिरून पाहायला पाऊण तास पुरेसा आहे. वरती 2 छोटीशी पण छान मंदिरे आहेत, एक खंडोबा आणि दुसरं शिवमंदिर.

किल्ल्याभोवतालचा परिसर बराच सपाट आहे, पण पाणी आहे, अनेक शेततळी अलीकडच्या काळात सरकारी अनुदानावर तयार झालेली आहेत. त्यामुळं हिरवळ आणि मग चांगली शेती दिसते. परिसरात मुख्यतः अंजीर लागवड आहे. आम्ही एका शेताशेजारी गाडी थांबवून थोडी अंजिरे गाडीतच खायला आणि काही घरी न्यायला घेतली. अतिशय ताजी आणि गोड. इतरही काही पालेभाज्या त्यांच्या टवटवीतपणामुळे घ्याव्याश्या वाटणे स्वाभाविकच होते! ह्या कुटुंबवत्सलपणाचे घरी थोडे कौतुकही होते!

अंजिरे घेऊन / खाऊन गाडी पुढं सरकली, आणि रस्त्याच्या डावीकडे असलेल्या एका पाणथळीशेजारी थांबवली, कारण तिथं Little Egret (बगळा), Red Wattled Lapwing (टिटवी), Pond Heron (बगळा) ह्या कॉमन पक्ष्यांबरोबरच Common Moorhen (पाणकोंबडी) आणि Spot Billed Duck (हळदीकुंकू) जोडी ही दिसले. आणि तारेवरती White Breasted Kingfisher (खंड्या) होताच! पण उतरून डिकीतून कॅमेरा बॅग काढून DSLR बाहेर काढून नेम धरेपर्यंत टिटवी सोडून सगळेजण उडाले! पण मग थोडंसं पुढं गेल्यावर डोळ्यांच्या कोपऱ्यात एक ओझरती हालचाल जाणवली अन गाडी परत थोडी मागे घेऊन उजवीकडच्या कंपाऊंडच्या सिमेंट खांबावर नजर गेली, तर त्यावर बसलेला Ashy Crowned Sparrow Lark Male (डोंबारी चंडोल नर) दिसला! जड अशी कॅमेरा बॅग आणि अजून एक छोटी सॅक (पाणी, टोपी, खाणं इत्यादीसाठीची) अंगावर वागवत ट्रेक करण्याचा प्लॅन अगदीच काही वाया गेला नाही! पण, ती टोपी मात्र मी जन्मजात वेंधळेपणामुळं कुठंतरी विसरलो 😢

घरून येताना आणलेले काही खाद्यपदार्थ वरतीच संपवले. पण आता खाली उतरल्यानन्तर मिसळ खायचा प्लॅन होता. इथल्या रस्त्यांवर मिसळीची य दुकाने आहेत. इतकी दुकाने लगोलग का, आणि ती किती चालत असतील हा एक प्रश्नच. आम्ही आपले शकुंतला मिसळीकडे वळलो. चव बरी होती. भरीस थंडगार चविष्ट मठ्ठाही होता. ही झाली रेग्युलर मिसळ. स्पेशल मिसळीच्या प्लेटमध्ये गुलाबजामही देतात! आम्ही लांबूनच हात जोडले!


आता सासवडमध्ये संगमेश्वर मंदिर पहावे म्हणून गाडी तिकडं वळवली. गावातून छोट्या रस्त्याने पेठेतून नदीकाठी जावे लागते. आधी पुरंदरे वाडा लागतो, मग भैरवनाथ मंदिर अन मग पुढं संगमेश्वर.  पुरंदरे वाड्याची भिंत किती भव्य आहे! पण वाडा बंद होता, बहुधा जीर्णोद्धार सुरू असावा. 



संगमेश्वर मंदिर छान आहे, त्याचंही दुरुस्तीचं काम सुरू आहे. पण नदी अतिशय गलिच्छ. पाणवनस्पती आणि सांडपाणी. बरीच दुर्गंधी. बिचाऱ्या संगमेश्वराने ही मास्क घालावा का आता?? अजून एक निरीक्षण म्हणजे इलेक्ट्रिक वायर्सनी मंदिरांची शोभा अक्षरशः घालवली आहे आपल्याकडे. दीपमाळ, कळस किती वाईट दिसतात त्या वायर्समुळं 😢 आणि हे बऱ्याच देवस्थानांच्या बाबतीत आहे.




मोनोलिथिक नंदी काय छान दिसतो! बरीच मोठी कोरीव मूर्ती ती. पण इथं 2 नंदी आहेत, मोठा मंदिरात आणि छोटा बाहेर. ह्याचं कोडं काही उलगडलं नाही. मंदिराचे बांधकाम आवडले, टीपीकल कोरीवकाम, नक्षीकाम आहे.

आता परतीची वाट धरली. येताना बरंच ट्रॅफिक लागलं.

एका छोट्याशा पण छान ट्रेकच्या आठवणी घेऊन दुपारी 12 च्या सुमारास घर गाठलं! (तसं पाहिलं तर आज आमच्यापेक्षा गाडीचाच व्यायाम जास्त झाला!) पुढचा किल्ला वाई परिसरातला करायचा असं ठरवून. बहुधा केंजळगड / पांडवगड. आणि तोही एक महिन्याच्या आत!