रविवार, १७ डिसेंबर, २०१७

ऑफिस आऊटिंग! ड्रीमलँड रिसॉर्ट

ऑफिस आऊटिंग!
~अमित, 17 डिसेंबर 2017


शुक्रवारी फुल-डे ऑफिस आऊटिंग होतं ड्रीमलँड रिसॉर्ट (मुळशी)त. छान स्पॉट आहे. 3 बाजुंनी डोंगरांनी वेढलेला.



भरपूर मोकळी आणि डोंगरांत असूनही सपाट जागा, खालच्या बाजूस मस्त मोठ्ठा आणि स्वच्छ स्विमिंग पूल, टेस्टी फूड, पार्किंगला ample जागा. सकाळी 10 च्या सुमारास आम्ही काही जण बसने तर काही कारने तिथं ( फोटोज काढत काढत!) पोचलो. गेल्यागेल्या मस्त न्याहरी! मग मैदानी खेळ.



आम्ही किती वर्षांनी खोखो खेळलो! सांधे आणि हाडं किती वाईट खिळखिळी झालीयेत हे तिथं समजलं 😫😫 डिसेंबर असूनही दुपारी ऊन बरंच होतं. आपल्याला सवय राहिलेली नाहीय उन्हाची अजिबातच, AC त बसून बसून. दुपारी फुल-टू स्विमिंगही केलं.



रात्री चांदण्यात गप्पाटप्पा. तारकांच्या समूहांवर पण थोडी (गहन) चर्चा 😀 टेंट्स मध्ये निन्नी केली!



थंडी बरीच होती. 👌👌 मस्त एक्सपिरिएंस! 
काल सकाळी 8 ला एकटाच कारने परत निघालो.



सगळं दाट जंगलच आहे तिथं जवळपास. त्या सकाळच्या जंगलाचा आवाज आणि वास अफाट भारी! (समुद्राची जशी 'गाज' तसा ह्या जंगलाच्या आवाजाला पण शब्द असला पाहिजे.) पक्ष्यांची किलबिल, संपत चाललेल्या वाहत्या पाण्याचा आवाज, वाऱ्यामुळे होणारी पानांची सळसळ!👌 एका मोठ्या ओहोळावरच्या पुलापाशी हे झाड वरती आलेलं दिसलं म्हणून थांबून हा फोटो DSLR ने काढला. काटेसावर झाड आहे हे. लाल आणि पांढरा रंग कसला मस्त काँट्रास्टिंग!



त्याआधी एक स्पॉटेड डव्ह (गळ्यावर / मानेवर काळे ठिपके असणारा हलका तपकिरी होला, किंवा छोटं कबुतर. पुण्यात मी कॉलर्ड डव्ह पाहिलेत, पण स्पॉटेड पहिल्यांदाच), आणि Jungle Fowl (रानकोंबडा) विथ फॅमिली पण दिसले होते (5 - 6 पिल्लं (म्हणजे चिक्स!) कसली छोटी, मस्त!), पण कॅम्येरा जवळ न ठेवल्यामुळं फोटोज हुकले. (डिकीत ठेवला होता 'सांभाळून' 😫) खरंतर रस्ता सोडून जंगलाच्या आत शिरून अनुभवलं पाहिजे जंगल. पण त्यासाठी हिंमत हवी 😀 जंगली श्वापदांच्या भुकेच्या वेळा ठाऊक हव्यात, नाहीतर त्यांची न्याहरी आपणच व्हायचे!

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

भुलेश्वर!



भुलेश्वर शिवमंदिर
21 ऑक्टोबर 2017 (Do like and comment!)

आज आम्ही सहकुटुंब भुलेश्वर मंदिराला भेट दिली. शिवमंदिर आहे हे. ते सोलापूर रोडवर पुण्यापासून सुमारे 40 km वर उजवीकडे एक फाटा फुटतो, (चक्कचक्क पाटी आहे!) तिथून पुढं भुलेश्वर घाट पार करून अजून 15-18 km जावं लागतं. रस्ता ओके टाईप्स आहे.


अप्रतिम कोरीवकाम!!


बरीचशी शिल्पं भंगलेली, पण जी आहेत ती खूपच रेखीव.


कासवाचं एक लांबलचक आयताकृती शिल्प वेगळंच.


नंदीचं शिल्प खूपच मोठ्ठं आणि रेखीव!👍


खांबांची शिल्पं 👌



नर्तिकांची शिल्पं केवळ लाजवाब, पण बहुधा सगळीच्या सगळी कुणा कंटकांनी (की मुघलांनी??) वेळोवेळी केवळ विघ्नसंतोषापायी नष्ट केलेली 😡


बहुधा हेमाडपंती असावं मंदिराचं ओरिजिनल बांधकाम.


आधीमधी जीर्णोद्धार झाल्यासारखं वाटलं मला. कारण काही बांधकामे कमी दर्जाची वाटली.




पुरातत्व खात्याची पाटी काही आढळली नाही, त्यामुळे मंदिराबद्दलची माहिती मिळू शकली नाही. इंटरनेटवर मिळेल बहुतेक. अजूनही दगडकाम सुरुय तिथं. सगळा परिसर खूपच रम्य आहे, थोडाफार हिरवीगारही. घाट रस्ता ड्रायव्हिंगसाठी चॅलेंजिंग! मला आवडला. शेवटीशेवटी खूप झाडी लागते, आणि खूपश्या पशुपक्ष्यांची छानछान चित्रे त्यांच्या सामान्य आणि शास्त्रीय नावांसकट दिसत जातात. तिथं हे पक्षीप्राणी आढळत असावेत. पुण्याहून जाताना एक टोल लागतो, रिटर्न Rs. 37.5/-. (पन्नास पैसे आपण मागत नाही, आणि तेही देत नाहीत! सरळ Rs. 38/- का नाही करून टाकत?? किंवा 40?) रस्त्यातली हॉटेल्स जेवणासाठी अगदीच पथेटिक. सगळी नॉनव्हेज. प्युअर व्हेज अगदीच नगण्य. आणि सर्व्हिस अगदी उपकार केल्यासारखी, अतिशय संथ. तुम्ही आपापलं जेवण सरळ बरोबर न्या, आणि भुलेश्वर मंदिरातच मस्त झाडांखाली सावलीत कोरीव दगडांवर बसून जेवा!
मागल्या वर्षी याच दिवशी दिवाळीत आम्ही सगळेजण औरंगाबादजवळ घृष्णेश्वर शिवमंदिरात होतो, आज इथं! त्याच्या मागच्या वर्षी भोरजवळ बनेश्वर शिवमंदिर! मात्र हा केवळ योगायोग!

सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

बाहुबली 2

बाहुबली 2

~अमित कालेकर, 2 ऑक्टोबर 2017
 (Do like and comment!)


काल टीव्हीवर 'बाहुबली 2' चा वर्ल्ड प्रीमियर लागला म्हणून बघायला घेतला, मुलगी नको म्हणत असताना 😃 मुव्ही आला तेंव्हा "कशाला? तेलुगू चित्रपट अतिरंजित असतात, उगा पैसे वाया का घालवा?" म्हणून पाहिला नव्हता. (पहिला भागही अजून नाही बघितला.)
आणि तेंव्हाचा माझा निर्णय सार्थ ठरवत काल पैसे नाहीत तरी वेळ मात्र वाया घालवला आम्ही 😫
एकतर आम्ही जवळपास अर्धा सिनेमा झाल्यावर टीव्ही ऑन केला. त्यात पहिल्या भागाचा रेफरन्स नाही. बाहुबली देवसेनेला एकाच वेळी 3 बाण कसे मारावेत त्याचं प्रात्यक्षिक देत असताना आम्ही टीव्ही ऑन केला. हा चित्रपट 'काहीही' ह्या कॅटेगरीतच मोडतो. हिरोने काय काय करावं?? कश्याही अतर्क्य उड्या, 3-3 बाण असंख्य वेळा मारूनही भाता भरलेलाच, लार्जर दॅन लाईफ असे डायलॉग, रामापेक्षा जास्त सत्यवचनीपणा, 'दिवार'च्या शशीकपूरपेक्षा जास्त कर्तव्यदक्षपणा, वचनबद्धता वगैरे वगैरे. ड्रॉइंग बोर्डवर इंजिनीअरिंग चित्र काढताना, त्रिकोनी गुन्या वापरताना दाखवलाय बाहुबली! भन्नाट वेगात धावणाऱ्या 2 बैलांच्यामध्ये उभा असलेल्या बाहुबलीला बघून अजय देवगणचीच आठवण (बघा: फूल और कांटे) आली.
सिनेमा कसला पळवलाय! आधी अमरेंद्र, मग महेंद्र, किती पिढ्या बघायच्या?? कटप्पा तर मठ्ठप्पा वाटला. अत्युच्च दर्जाचं ग्राफिक्स हाच फक्त उजवा भाग वाटला ह्या मुव्हीचा. खूपच भारी दाखवलीय माहिष्मती नगरी. अतिभव्य. असं वाटावं की इतकं विस्तीर्ण बांधकाम करायला किती शतकं, पैसा आणि कामगार लागले असतील 😃 आणि त्याच्या डेली मेंटेनन्स वर किती वेळ, पैसा ओतावा लागत असेल! आणि ती दुर्बीण तर फारच म्हणजे! भल्लालदेवाची गाडी आणि त्यावरची ती फिरती शस्त्रं, आणि सटासट सुटणारे असंख्य बाण, सारंच अतर्क्य. बाहुबलीला माहिष्मती नगरीत प्रोजेक्टाईल केलेला सीन तर केवळ अफाट! माडाच्या झाडांना वाकवून 7-8 लोकांना कॅटापुल्ट करता येतं? तेही ढाली गुंडाळून?? अक्षरशः काहीही. माहिष्मती साम्राज्याचे रुल्स आणि व्हॅल्यूज म्हणत म्हणत काहीही पाणचटपणा बघावा लागतो. बापाला सख्ख्या 2 मुलांमध्ये एकाबद्दल इतका द्वेष असू शकतो?? बाहुबली सावत्र मुलगा आहे काय राजघराण्याचा? पहिला भाग पाहिला नसल्यामुळे मला रेफरन्स नसेल, त्यामुळं पण हा प्रश्न चुकीचा असू शकेल. भल्लालदेवाला फक्त दुष्टपणा, खलनायकी हे एकच काम आहे. (महाराजा म्हणून काहीच करत नसेल का तो??) आणि त्याच्या वडिलांना शकुनीपणा! देवसेनेला पण नुसते पोकळ आणि आढ्य डायलॉग मारायला दिलेत.
असो. ह्या असल्या टुकार चित्रपटाने हजार कोटींचा व्यवसाय केला असेल हे मला अजिबात पटलं नाही.
जाऊद्या, 'बाहुबली 3' आला तर बघायचा नाही हे मात्र 100% नक्की!

शुक्रवार, ९ जून, २०१७

न्यूझीलंड vs बांगलादेश ODI, चॅम्पियन्स ट्रॉफी, 9 जून 2017

न्यूझीलंड vs बांगलादेश ODI, चॅम्पियन्स ट्रॉफी, 9 जून 2017

~अमित कालेकर

(Do like and comment!)


जिंकायला 266 रन्स हव्यात, समोर न्यूझीलंडसारखा प्रबळ प्रतिस्पर्धी, 11व्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स किरकोळ 34 रन्स मध्ये पडलेल्या, खेळपट्टी आणि वातावरण वेगवान स्विंग गोलंदाजांना पूर्ण अनुकूल (टीम साउदी तोवर 4 ओव्हर्स टाकून 3 विकेट्स गटकावून बसलेला, आणि 4थी विकेट ट्रेंट बोल्टला!). अश्यात धावगती जवळजवळ 6 ला पोचलेली (38.2 ओव्हर्स, 232 रन्स हव्यात).
अश्या परिस्थितीत कुठल्याही संघाचे काय मनोधैर्य असेल???

पण हा सामना चक्क ह्या स्थितीतून बांगलादेशाने जिंकला !  5व्या विकेटसाठी (विश्व?)विक्रमी 224 रन्सची भागीदारी रचत चक्कचक्क 16 चेंडू आणि 5 विकेट्स शिल्लक ठेवून ते जिंकले! महमदुल्लाह (102*) आणि शकीब अल हसन (114, सामनावीर) ही त्या विक्रमवीरांची नावे. हॅट्स ऑफ.

आठवतंय का, (नाही म्हणा, तंगडंच तोडीन!) 1983 प्रुडेंशियल विश्वचषकात आपल्या 'कपिलदेव निखंज' नामक झंझावाताने चिल्लूपिल्लू झिम्बाब्वेविरुद्ध 18 जून 1983 ला इथं इंग्लंडातच (टर्नब्रिज वेल्स) 5 आऊट 17 अश्या (नेहमीच्याच) होप्लेस स्थितीतून (गावस्कर आणि श्रीकांत झिरो!)  तळाच्या फलंदाजांना हाती धरून नाबाद 175 रन्स कुटत आपल्याला एकहाती विजय मिळवून दिलेला, आज हे दोघे बांगलादेशसाठी अहीकपिल - महीकपिल बनले!

Brief scores: New Zealand 265/8 in 50 overs (Ross Taylor 63, Kane Williamson 57; Mosaddek Hossain Saikat 3-13)
lost to
Bangladesh 268/5 in 47.2 overs (Shakib Al Hasan 114, Mahmudullah 102*; Tim Southee 3-45) by five wickets.

बुधवार, १७ मे, २०१७

आजची सकाळ!


आजची सकाळ!

~अमित कालेकर, पुणे, 17 मे 2017 (Do like and comment!)


नेहमीप्रमाणे 5 च्या आसपास जाग आली. 7 ला मुलीला लॉ कॉलेज रोडवर क्लासला सोडून आज ARAI टेकडी एका जवळच्या मित्राबरोबर कांचन गल्लीमधून चढून जायचा बेत केला. टेकडी चढायला सुरुवात करतानाच मित्र 'इकडे फारसे पक्षी दिसत नाहीत' असं म्हणायला आणि मला एक भलामोठ्ठा पक्षी (ब्लॅक काईट/घार, किंवा सर्पंट ईगलपैकी एक) दिसायला एकच गाठ पडली! मोठ्या डौलात तो (का ती?) एका फांदीवर मला क्लिअर दिसेल असा सूर्याकडे तोंड करून (बहुधा फोटोच्या अपेक्षेने!) बसला होता. पण माझं आज फोटोग्राफीचं इंटेन्शन नव्हतं. (का? का?? का???) थोडं वर गेल्यावर टेकडी माथा आलाच. ARAI च्या मुख्य पार्किंगपाशी जाते ही वाट.
वाटेत आम्हाला दोघांनी 'तुम्ही कांचन गल्लीतून आलात का, आम्हाला प्रस्तावित बालभारती-ARAI रस्त्याबद्दल कृपया तुमची प्रतिक्रिया द्या' असा विनंतीवजा आग्रह केला आणि तत्परतेने क्यामेराही उपसून (की परजून?!) माईक घेऊन तयार की! मग मी हळूच त्या माईकवर चॅनेलचं नाव पाहून घेतलं आणि आज आपलं पहिलंवहिलं टीव्ही फुटेज झळकणार ह्या आनंदात चांगली (!) पर्यावरणवादी प्रतिक्रिया (केसांतून हात फिरवून, थोडं नीटनेटकं दिसायचा प्रयत्न करत) दिली. हा रस्ता तर व्हायला हवा, पण तो 'टनेल' असावा, टेकडीवरून झाडे तोडून अजिबात नको, असा खर्चिक (पण टेकडी आणि तिच्यावरची झाडी, असंख्य पक्षी वाचावेत ह्या सद्हेतूने) विचार मांडून पुढे पळत निघालो. थोड्याच अंतरावर ह्या माझ्या सद्विचाराला बळकटी मिळाल्यासारखा उजवीकडून एक 'म्याsssओ' सदृश दबका आवाज आला आणि त्याचा मागोवा घेत गेल्यावर लगेच पूर्ण पिसारा (पण मिटलेला) प्राप्त झालेल्या पक्षीराजाचं, म्हणजेच मोराचं मनोहारी दर्शन घडलं! बघत राहिलो आम्ही एकमेकांना. थोड्या वेळाने त्याला माझा कंटाळा आला आणि तो झाडीत गुडूप झाला. मी नेमकं आजच क्यामयेरा विसरायला काय धाड भरली असं पुन्हा एकदा स्वतःलाच रागावलो. मोबाईलचा कॅमेरा फक्त सेल्फी काढण्यापुरताच असतो, अश्यावेळी तो अगदी 'यूसलेस' (माझ्या मामीचा अगदी लाडका शब्द!) असतो. मग तो कितीही मेगापिक्सेलचा असो.
8 च्या 2 मिनिटं आधी खाली उतरून परत मुलीच्या क्लासकडे आलो. तिथं मित्राने एका तरुणाची ओळख करून दिली, 'आनंद हातवळणे'.  हे नाव ऐकल्याऐकल्या माझं मन एकदम शाळेत, 1989-90 मध्ये गेलं. आम्हाला मराठीत (9वी की 10वीत ते मात्र आठवत नाहीय) एक धडा होता, तो आनंदच्या बाबांनी लिहिलेल्या पुस्तकातला ('यशवंत व्हा') होता! ह्या भावंडांना 10वीत चांगले मार्क्स मिळण्यासाठी त्यांनी कायकाय केलं ते खूप सुरेखरित्या वर्णन केलं होतं. आनंद आणि त्याची मोठी बहीण विनया दोघेही त्यावेळी बोर्डात झळकलेले! अचानक आणि सुखद भेट घडल्यामुळे फार मस्त वाटलं! पुस्तकात वाचलेले कॅरॅक्टर्स समक्ष भेटल्यावर फिल्मस्टार्स भेटल्यासारखा आनंद होतो! आनंदचं स्वतःचंही एक पुस्तक ('अक्षरशिल्पे', 2 भाग) 'राजहंस' तर्फे प्रकाशित झालंय तेही समजलं, आणि ते वाचायची ओढ लागलीय आता! 

एका तासात काय काय घडू शकतं!

कडक उन्हाळ्यातली आजची सकाळ अशी एकदम गार, इव्हेंटफुल आणि तरतरीत गेल्यामुळे लै भारी वाटलं राव!

रविवार, २३ एप्रिल, २०१७

S-P आणि भारतीय बॅडमिंटन!

S-P!

~अमित कालेकर
23 एप्रिल 2017 (Do share, like and comment!)

भारताच्या बॅडमिंटनसाठी 2 आद्याक्षरं लकी आहेत. P आणि S. कसं? चला बघूया कसं.

प्रकाश पदुकोण यांनी पहिल्यांदा जागतिक प्रतिष्ठेची 'ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप' (1980) जिंकली. त्यांना 1982 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. आद्याक्षर P.
नंतर ती स्पर्धा पुलेल्ला गोपीचंद याने (2001) जिंकून बॅडमिंटनविश्वात आपलं एक अढळस्थान निर्माण केलं. गोपीचंद इतकंच करून थांबला नाही. 6 कोटी रुपये खर्चून (त्यासाठी स्वतःचं राहतं घर गहाण ठेवून) त्याने हैद्राबादला बॅडमिंटन अकॅडमी स्थापली आणि आणि अनेक प्रतिभावान मुलामुलींना बॅडमिंटन शिकवलं, त्याची माहिती खाली येईलच. खरा 'द्रोणाचार्य' पुरस्कार विजेता (2009), आणि 2014मध्ये पद्मभूषण! आद्याक्षर P.
मधल्या काळात महाराष्ट्राची कन्या अपर्णा पोपट ही राष्ट्रीय स्तरावर खूप नावाजली गेली होती, अनेक वर्षे. तिने सलग 9 वेळा (1997 - 2006) राष्ट्रीय स्पर्धा जिंकून विक्रम केलाय (पुरुषांमध्ये प्रकाश पदुकोण यांच्या नावावरही हा विक्रम आहे). आद्याक्षर P.

हल्ली पारूपल्ली कश्यप हा गोपीचंद यांचा पट्टशिष्य बहरात आहे. त्याने 2014 ची ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धा जिंकली. आद्याक्षर P.
अश्विनी पोनाप्पा ही 2007 पासून वूमन्स आणि मिक्स्ड डबल्स स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. तिने 2011 च्या लंडन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वूमन्स डबल्स मध्ये कांस्यपदक मिळवून पदकांची मालिका सुरू केली. 2010 (दिल्ली) आणि 2018 (गोल्ड कोस्ट) च्या कॉमनववेल्थ गेम्स मध्ये सुवर्ण मिळवलं. आद्याक्षर P.



हे झालं P बद्दल. आता S बद्दल.

सैद मोदी हे नाव नव्वदीच्या दशकात भारतीयांसाठी बॅडमिंटनमधलं एक आशास्थान होतं. त्यांच्या नावे आता भारतात सर्वोच्च प्रतिष्ठेची बॅडमिंटन स्पर्धा दरवर्षी भरवली जाते. आद्याक्षर S.
साईना नेहवाल ही गोपीचंद यांचीच एक आघाडीची शिष्या. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एकेरीत ब्रॉन्झपदक पटकावून भारताची शान बनली साईना. तिच्यामुळे बॅडमिंटन या खेळाला भारतात एक वलय प्राप्त झालं, नव्या पिढीची मुलं या खेळात करिअर करता येऊ शकतं या विश्वासावर राहू लागलीत. बॅडमिंटनमधल्या अनेक वर्षांच्या चायनीज वर्चस्वाला समर्थ टक्कर देऊन काही अव्वल दर्जाच्या सुपर सिरीज स्पर्धा जिंकून जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेणारी साईना! तिला 2016 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं! आद्याक्षर S.
B साईप्रणीत हा भारताचा उगवता तारा, ज्याने कालपरवाच (2017) सिंगापूर ओपन ही खास स्पर्धा आपला सहकारी आणि जवळचा मित्र किडांबि श्रीकांत याला हरवून जिंकली. आद्याक्षर S.


श्रीकांत किडांबिने BWF सुपरसिरीज 6 वेळा जिंकलीय! शिवाय, BWF ग्रँड प्रिक्स 3 वेळा! 2022 च्या थॉमस कप मध्ये भारताने जिंकून इतिहास घडवला, त्यात श्रीकांत होता! हे दोघेही पूर्ण भरात आहेत, आणि वय या दोघांच्या बाजूने असल्यामुळं आपल्याला पुढची काही वर्षं अनेक चांगल्या लढती बघायला मिळणार आहेत! दोघांचीही आद्याक्षरं S. हे दोघेही पुन्हा एकदा द ग्रेट गोपीचंद यांचेच शिष्य!



लक्ष्य सेन: 2022 च्या थॉमस कप मध्ये भारताने जिंकून इतिहास घडवला, त्यात लक्ष्य होता! शिवाय 2022 मध्ये त्याने कॉमनवेल्थ मध्येही सुवर्ण पदक जिंकलं. तो आत्ता फक्त 22 वर्षांचा आहे, आणि पुढे चमकते करिअर करण्याची क्षमता बाळगून आहे! आद्याक्षर S.

आणि आता आपली रौप्यकन्या ... ओळखा कोण? तीच ती, अनेक वर्षं साईना नेहवालच्या छायेत राहून आता मात्र स्वतः च्या दैदिप्यमान यशाने आपणा सर्व भारतीयांची आन बान शान बनलेली ... पुसारला वेंकटा, किंवा PV सिंधू! 2016 रिओ ऑलिम्पिक मध्ये बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत बेधडक धडक मारून सिंधूनं रौप्यपदक निश्चित केलं, आणि मग अंतिम फेरीत पहिला गेम जिंकून सुवर्णपदकाकडे वाटचाल सुरू केली. पण शेवटी खेळात हारजीत चालतेच, या न्यायाने तिला सिल्व्हर मेडल मिळालं. आणि ती आता साईनानंतर भारताचं प्रमुख आशास्थान बनलीय! परवाच तिनं सैद मोदी स्पर्धेत साईनाला सहज हरवलं. शिवाय 'इंडियन बॅडमिंटन लीग' मध्ये तिने स्पेनच्या अव्वल मानांकित कॅरोलिना मारीनला 2 सरळ गेम्समध्ये हरवत रिओ ऑलिम्पिकमधल्या पराभवाचा वचपा काढला! तिला 2020 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं!  आद्याक्षरं P आणि S!

आणि सर्वात महत्त्वाचे, ते म्हणजे हा खेळ 1860 मध्ये भारतातच उदयास आला, आणि तोही पुण्यात! परत P!☺️

तर मंडळी, सांगायचा मुख्य मुद्दा हा, की जे भारतीय S-P आहेत त्यांनी आता आत्मविश्वासाने तयारीला लागावं, यश त्यांच्या नक्कीच पाठीशी आहे! (मी मात्र A-K असल्याने असल्या भानगडीत पडत नाही!😊😊😊)

रविवार, २९ जानेवारी, २०१७

रॉजर फेडरर!

रॉजर फेडरर

अमित कालेकर, 29 जानेवारी 2017
 (Do like and comment!)

टेनिसमध्ये 2012 चं प्रतिष्ठेचं विंबल्डन जिंकल्यानंतर 'ओपन एरा'मधल्या 17 एकेरी ग्रँड स्लॅम्स जिंकून "ऑल टाईम ग्रेट" बिरुद मिळवलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या आयुष्यात पुढचं 18वं ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणं जवळपास अशक्य बनलं होतं. ह्या सतरामध्ये 4 ऑस्ट्रेलियन, 7 विम्बल्डन, 1 फ्रेंच आणि 5 अमेरिकन जेतेपदं आहेत.
2013-14-15-16 अशी तब्बल साडेचार वर्षं (2012 चे अमेरिकन ग्रँड स्लॅम पकडून) तो कित्येक फायनल्समध्ये पोचला. तेही त्या त्या स्पर्धांमध्ये सर्वोच्च दर्जाची कामगिरी करून. पण दर वेळी त्याचा आत्मविश्वास डळमळीत होत होता आणि तो जिंकू शकत नव्हता. दरम्यानच्या काळात इंग्लंडचा अँडी मरे आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे दोन तारे उदयाला आले आणि त्यांनी स्पर्धा गाजवायला सुरुवात केली. मरे तर 2013 मध्ये विम्बल्डन जिंकणारा 76 वर्षातला पहिलाच इंग्लिश खेळाडू ठरला! जोकोविचचा कोच महान खेळाडू जर्मनीचा बोरिस बेकरने तर रॉजरला 'तू कशासाठी खेळत आहेस, निवृत्त का होत नाहीस?' असं सरळ सरळ विचारूनही टाकलं!
2003 मध्ये त्या वेळच्या अव्वल आणि विक्रमी सात वेळा विम्बल्डन जिंकलेल्या पीट सँप्रासला विम्बल्डनमध्येच हरवून आपल्या पहिल्या विजेतेपदाची नोंद करणाऱ्या रॉजरने नंतर दरवर्षी चारपैकी तीन ह्या दराने ग्रँड स्लॅम्स जिंकण्याचा धडाकाच लावला. त्याच्या वाटेत जे जे आले त्यांचा सपशेल पराभव होत गेला. फक्त स्पॅनिश डावखुरा रफाएल नदाल त्याला पुरून उरला. ह्या दोघांनी 17 आणि 14 अशी विक्रमी ग्रँड स्लॅम्स जिंकलीत आजवर! 2008 ची ऐतिहासिक विम्बल्डन फायनल जिंकून क्ले चॅम्पियन नदालने आपला वरचष्मा ग्रासकोर्टवरदेखील सिद्ध केला. पण 2009 मध्ये जिद्दी रॉजरने त्याला आजवर हुलकावणी देणाऱ्या लाल मातीवरच्या जिंकायला सर्वात अवघड अश्या फ्रेंच ओपनचं विजेतेपद मिळवून 'करीअर स्लॅम'सुद्धा मिळवून दाखवलं!
2016 च्या विम्बल्डनमध्ये सेमीफायनलमध्ये पोचला असताना 4थ्या सेटमध्ये रॉजरला गुडघ्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. पुढचे 6 महिने त्याला स्पर्धात्मक टेनिसपासून दूर व्हावं लागलं. हा काळ रॉजरसारख्या टेनिसप्रेमी आणि अव्वल खेळाडूसाठी अतिशय मानसिक तणावाचा आणि वेदनेचा ठरला.
2017 साल उजाडलं आणि नेहमीप्रमाणेच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेने टेनिस मोसमाची सुरुवात झाली. आता पस्तीस वर्षांचा झालेल्या (टेनिससाठी 'वयोवृद्ध!') फेडररने त्यात खेळून आपली क्षमता सिद्ध करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा जवळपास सर्व टेनिसप्रेमी चकित झाले. पण तो क्वार्टर/सेमी फायनलच्या पुढे जाऊ शकेल हे कुणीही गृहीत धरलं नाही. 
शेवटी तो अफलातून खेळ करत आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या खेळाडूंना नेहमीच्याच सहजपणे हरवत फायनल मध्ये पोचला तेंव्हासुद्धा समोर परत एकदा तीस वर्षीय नदालरूपी भिंत होती. पण शेवटी ही स्पर्धा जिगरबाजपणे 5 सेट्समध्ये जिंकून 18वं ग्रँड स्लॅम दिमाखात जिंकत रॉजरने स्वतःला परत एकदा सिद्ध केलं! रॉजर नुसता खेळाडू म्हणूनच नाही, तर एक जंटलमन म्हणूनही तितकाच प्रसिद्ध आहे. "आज नदालकडून हरलो असतो, तरी वाईट नसतं वाटलं, मी फक्त खेळाचा आनंद घेण्यासाठी स्पर्धा खेळत आहे.... मला आणि नदालला आजची ट्रॉफी विभागून द्या' असे उद्गार फक्त जगज्जेता रॉजर फेडररच काढू शकतो!

असाच खेळत रहा! You are my true champion forever!!

~तुझ्या जगभरातल्या असंख्य चाहत्यांमधलाच एक 
अमित

शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

नॉस्टाल्जिया!

 नॉस्टाल्जिया

~अमित कालेकर, फेब्रुवारी 2014

 (Do like and comment!)


काही खूप जुन्या पण त्या काळातल्या आपल्या एकदम फेव्हरेट गोष्टी-गाणी-घटना, किंवा वस्तू-वास्तु-व्यक्ती जर आपल्याला अनेक वर्षानंतर होत्या त्याच (फ़्रोझन इन टाइम!) अवस्थेत असल्यासारख्या भेटल्या, सापडल्या तर जे वाटते, तेच मला ह्या 'टायटन'च्या घड्याळाकडे बघून काल वाटले! 

1993 साली मी सोलापूरला इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षात होतो. तेंव्हा वडिलांनी हौसेने हे गोल्ड प्लेटेड 'रोयाले' घड्याळ माझ्या हाती बांधले. खूप भारी वाटलेले तेंव्हा! आणि कुणास ठाउक, पण ही वस्तू आयुष्यभर जपली जावी अशी एक भावना मनात कायम राहिली.

हे घड्याळ घालून मी असंख्य क्रिकेट म्याचेस खेळलोय. प्रॉडक्शन इंजीनियरिंग करत असल्यामुळं स्मिथि, लेथ मशीन्स, जॉब वेल्डिंगशी सतत संपर्क. पण कधीही पट्टा तुटणे, घड्याळ बंद पडणे अश्या क्षुल्लक, त्रासदायक गोष्टी घडल्याच नाहीत! तसे काचेवर 2 छोटे वेल्डिंग स्पॉट्स आहेत! पण त्या आठवणी म्हणून काच नाही बदलली!

काही इंटरव्यूजनाही हेच घड्याळ सोबतीला होते. नोकरी लागल्यानंतर पहिल्या कंपनीतली पहिल्यावहिल्या बॉसची पहिली भेट ... पहिली जॉब असाइनमेंट ... पहिला पगार ... पहिले प्रमोशन ... पहिला मुलगी बघण्याचा ऑकवर्ड प्रोग्राम ... पहिली (आणि बहुधा शेवटची!) अमेरिका वारी ... बरेच काही नॉस्टालजिक घडले ते ह्याच पिव्ळ्याधम्मक वस्तूबरोबर!

2001 मध्ये केवळ एक बदल म्हणून (आणि बायकोचा हट्ट!) एक नवे डिजिटल घड्याळ घेतले, आणि हे घड्याळ कपाटात विसावले.

पण काल सकाळी परत वडिलांचाच फोन आला. टायटन कंपनी सेल बदलून देतेय, तर तुझे घड्याळ आणून दे असा. टायटन कंपनीतला तो सेल बदलणारा कर्मचारीही हे 21-22 वर्षांपूर्वीचे घड्याळ बघून आनंदित झाला! म्हणाला की आता हे घड्याळ कंपनी बनवत नाही. किती व्यवस्थित अवस्थेत आहे हे तुमचे घड्याळ!

मग काय! परत एकदा 'गोल्डन रोयाले'ची स्वारी अस्मादिकांच्या मनगटावर विराजमान! 'जुनं ते सोनं' म्हणतात ना, ते असं खरं ठरलं!