शनिवार, ९ जानेवारी, २०२१

ब्राह्मणी घार!

ब्राह्मणी घार!
~ अमित कालेकर
जानेवारी २०२१

साधारण तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्याहून मी आणि माझी आई माझ्या शेताकडे निघालो होतो. अकलूज रस्त्यावर सराटी नावाच्या एका गावाला पार करून थोडंसं पुढे जात असताना अचानकपणे माझी नजर कार ड्रायव्हिंग करता करता थोडीशी वर एका झाडावरती गेली. झाड तसं निष्पर्ण म्हणण्याच्या कॅटेगरीतलं होतं. पण जमिनीपासून सुमारे ३० ते ४० फुटावरती झाडाच्या एका बेचक्यात मला एक घरटं दिसलं. त्याच्यात एक गरुड सदृश पक्षी बसला होता. आणि दुसरा सिमिलर पक्षी आकाशात उडत होता, त्या घरट्यावरती घिरट्या घालत. दिसायला दोघेही सेमच त्याच्यामुळे नर आणि मादी कोण ते ओळखू येत नव्हते. मी तातडीने गाडी साईडला घेतली आणि कॅमेरा बाहेर काढला. (नशिबाने कॅमेरा बरोबर होता, त्याच्यात मेमरी कार्ड होतं आणि कॅमेऱ्याची बॅटरी फुल चार्ज्डही होती!! हे सर्व गुण जुळून येणे माझ्यासारख्या आळशी, धांदरट माणसाच्या आयुष्यात खूप अवघड असते!) पटकन हवी तशी सेटिंग्ज केली आणि काही फोटोज काढले. स्थिर असतानाचे सेटिंग्ज वेगळे आणि उडतानाचे वेगळे, शटर स्पीडमुळे. बऱ्यापैकी चांगले फोटोज मिळाले होते, लाईट चांगला असल्यामुळे. फोटोज झूम करून पाहिल्यानंतर लक्षात आलं की ही ब्राह्मणी घार (Brahminy  Kite) आहे. शास्त्रीय नाव: Haliastur indus. हिलाच समुद्री घार असेही म्हणतात. मोठा आणि डौलदार, रुबाबदार असा पक्षी. मस्त बाकदार, तीक्ष्ण, पिवळी चोच. पांढरी शुभ्र मान आणि तपकिरी रंगाचे पंख.


या सराटी गावानंतर लगेचच नीरा नदी लागते आणि या ब्राह्मणी घारीला नदीतले मासे, मृत खेकडे आणि इतर छोटे छोटे कीटक खाण्यासाठी हे घरटं खूप सोयीचं पडत असावं. कधी कधी हे ससे आणि वटवाघळेही मारून खातात. यांचा विणीचा हंगाम डिसेंबर ते एप्रिल हा असतो. निळसर छटेची पांढरी दोन अंडी घातली जातात. त्यातून साधारणपणे एक महिन्याच्या आत पिलांचा जन्म होतो.
एकदा आता मला हे घरटं माहित झालं होतं, त्यामुळे पुढच्या ट्रिपच्या वेळी मी मुद्दाम येथे गाडी थांबवली. पण यावेळी त्या पक्ष्यांना माझं तिथं नुसतं थांबणंसुद्धा पसंत पडलं नाही. दोघेही माझ्या डोक्यावरती घिरट्या घालू लागले. थोडे थोडे खाली येऊ लागले. त्यांना अधिक त्रास देण्यात अर्थ नाही असं मानून मी पटकन गाडीत बसून पुढे निघालो.

(लेख आवडल्यास कंमेंट, शेअर करा! गूगल लॉगिन असल्याने अजून वेगळं लॉगिन करायची गरज नाही.)

रविवार, २६ मे, २०१९

फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा


फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा
~ अमित कालेकर, 26 मे 2019 (Do like and comment!)


हे क्रीडाप्रेमी लोकहो, त्यातही टेनिसप्रेमी!

आजपासून वर्षातली दुसरी ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा, म्हणजेच फ्रेंच ओपन सुरू होतीय. होतीय म्हणजे काय, झालीय! आणि अँजेलिक कर्बरसारखी जर्मन दिग्गज खेळाडू पहिल्याच फेरीत बाहेरही पडलीय! लांबलचक चालणाऱ्या सामन्यांमुळं ही स्पर्धा इतर स्लॅम्सच्या तुलनेत एक दिवस आधीच, म्हणजे रविवारीच सुरू होते. मातीवरची ही एकमेव ग्रँडलॅम. इतर ग्रँड स्लॅम्स भलेही जिंको, पण ही स्पर्धा जिंकणं भल्याभल्यांना जमत नाही. अमेरिकन पीट सँप्राससारखा जगज्जेता खेळाडूही ह्या स्पर्धेच्या विजेतेपदापासून वंचित राहिलाय. आपला आवडता स्वित्झर्लंडचा देखणा रॉजर फेडररही, ज्याने 20 ग्रँड स्लॅम्स पटकावून ग्रेटेस्ट ऑफ ग्रेट होण्याचा मान मिळवलाय, तोही केवळ एकदा म्हणजे 2009 मध्ये ही स्पर्धा जिंकू शकला आहे. तेही त्यात नदाल फायनलपर्यंत पोचू शकला नाही म्हणून! फ्रेंच ओपनचा लेख रफाएल नदालशिवाय पूर्ण होऊच कसा शकेल! तर ह्या स्पेनच्या जिगरबाज डावखुऱ्या आक्रमक खेळाडूने त्याच्या 17 ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या यादीत फ्रेंच ओपन स्पर्धा तब्बल 11 वेळा जिंकलीय!! इतक्या वेळा एखादी ग्रँड स्लॅम आजवर कुणीही जिंकलेलं नाहीय. (फेडररने विम्बल्डन स्पर्धा 8 वेळा जिंकलीय.) त्यातही, नदालने 11 वं विजेतेपद तर प्रत्येक मॅच सरळ सेट्समध्ये जिंकून पटकावलंय! अशी कामगिरीही आजवर कुणीही केलेली नाहीय! 


गतकाळचे फ्रेंच ओपन विजेते खेळाडू मायकेल चँग (अमेरिका), सर्जी ब्रुगुएरा (स्पेन) हेही आज आठवत आहेत. जर्मनीची महान खेळाडू स्टेफी ग्राफ, जिने 22 ग्रँड स्लॅम्स जिंकण्याचा पराक्रम केलाय, तिनेही ही स्पर्धा अनेकदा जिंकलीय.




ज्याने फ्रान्समध्ये विमानयुगाची मुहूर्तमेढ रोवली, अश्या रोलँड गॅरोस नावाच्या एका फ्रेंच वैमानिकाचं नाव दिलं गेलेलं हे स्टेडियम फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आहे. हा पहिल्या वर्ल्ड वॉरचा हिरोही मानला जातो. तांबड्या मातीवर ही स्पर्धा खेळवली जाते. खरंतर, काँक्रीटवर अग्निजन्य खडकांचा थर आणि त्यावर पांढऱ्या लाईमस्टोनची भुकटी असते, आणि त्यावर काही मिलिमीटरचा लाल विटांच्या भुकटीचा थर असतो, जो त्या मैदानाला तांबडा रंग प्राप्त करून देतो. त्यावर अर्थात रोलर अनेकदा फिरवला जातो. ह्या मातीमुळे पाण्याचा निचरा होण्यास चांगली मदत होते, आणि पाऊस पडला तरी कमीतकमी वेळात मैदान परत खेळासाठी योग्य होतं. तब्बल एकवीस एकरात 20 टेनिस कोर्ट्स असलेलं हे एक भव्य क्रीडा संकुल सीन नदीकिनारी पसरलेलं आहे. ह्यातच टेनिसचं एक म्युझियम, टेनिसियम, ही आहे. इथलं सेंटर कोर्ट फिलिप चॅट्रिअर ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्यावर पाऊस पडल्यास सामना सुरू राहावा ह्यासाठी आच्छादित केलेलं आणि मागे घेता येण्याजोगं छप्परही बसविलेलं आहे. त्याची आसनक्षमता साडेपंधरा हजार इतकी आहे. इथं जिंकण्यासाठी फारच वेगळे डावपेच लागतात. सर्वात महत्वाचं म्हणजे, शारीरिक (आणि मानसिकही!) तंदुरुस्तीची परमोच्च कसोटी. इथं सर्व्ह-अँड-व्हॉली, तुफानी सर्व्हिसेस, नेटजवळचा नजाकतभरा खेळ असलं काही फारसं चालत नाही! इथं, आला चेंडू की तडकव, हीच भाषा चालते.
ही स्पर्धा 1928 मध्ये सुरू झाली. फ्रान्सने त्यांच्या देशात डेव्हिस कप स्पर्धा खेळवण्यासाठी ह्या स्टेडियमची निर्मिती केली होती. मे महिन्याचा शेवटचा आणि जूनचा पहिला आठवडा ह्या कालावधीत, जो फ्रेंच वसंत ऋतू असतो, त्यात ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते. कमाल 27 अंश ते किमान 8 अंश सेल्सिअस अश्या सुरेख तापमानात जगभरातले 128 खेळाडू आपलं कसब इथं पणाला लावतात! जगातली सर्वात लाडकी आणि जुनी (1889 साली सुरू) विम्बल्डन हिरवळ स्पर्धा फ्रेंच ओपननंतर केवळ महिन्याभराच्या आतच सुरू होत असल्यामुळे बहुतांश खेळाडू दमलेले असतात! त्यात विम्बल्डनच्या तयारीसाठी एक स्पर्धा अनेकजण खेळतात. जो फ्रेंच ओपन जिंकून, ही क्वीन्स ओपन खेळून (कदाचित जिंकूनही!) लगेचच विम्बल्डनही जिंकून दाखवतो, तो खेळाडू केवळ ग्रेट! केवळ 4 पुरुष खेळाडूनी आजवर हे साध्य केलंय. स्वीडनचा बियों बोर्ग, ऑस्ट्रेलियन रॉड लेव्हर, नदाल आणि फेडरर. म्हणूनच हे लोक ग्रेट आहेत!! अनेकांच्या करिअर स्लॅमच्या (चारही ग्रँड स्लॅम्स किमान एकदातरी जिंकणे) स्वप्नात फ्रेंच ओपन हाच एक मुख्य अडसर असतो, उदा. तीन वेळचा विम्बल्डन विजेता आणि एकंदर 6 ग्रँड स्लॅम विजेता जर्मन बोरिस बेकर, 14 ग्रँड स्लॅम जिंकणारा पीट सँप्रास.
यंदाही नदाल विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. पण तो फ्रेंच ओपनची तयारी समजल्या जाणाऱ्या 3 स्पर्धांमध्ये (माँटेकार्लो, बार्सिलोना आणि माद्रिद ओपन) मध्ये सेमीफायनल्समध्येच गारद झालाय. मात्र त्यानंतरची रोममध्ये अगदी मागच्या आठवड्यात खेळली गेलेली इटालियन ओपन स्पर्धा जोकोविचला बेस्ट-ऑफ-थ्री सेट्सच्या लढतीत हरवून जिंकत नदाल फॉर्मात आलाय! जोकोने आधीच्या तीनही ग्रँडस्लॅम्स सलग जिंकल्या आहेत (विम्बल्डन-अमेरिकन 2018 आणि ऑस्ट्रेलियन 2019). त्यामुळं फ्रेंच ओपनमध्ये जोकोच पहिला मानांकित खेळाडू आहे. नदाल दुसरा, तर फेडरर तिसरा मानांकित आहे.
आज काही वेळातच, म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार 5:55 pm ला फेडरर आपली पहिली मॅच खेळेल. नदाल आणि जोको आपल्या मॅचेस उद्या खेळतील. आज आपल्या देशाचा एक खेळाडूही, P गुणेश्वरन, आपली पहिली मॅच कोर्ट नंबर 13 वर खेळणार आहे! 
1975 मध्ये जन्मलेला मी आजवर अनेक विजेत्यांचा खेळ पाहत लहानाचा मोठा झालोय. बोरिस बूम-बूम बेकर, पिस्टोल पीट सँप्रास, रिटर्न स्पेशालिस्ट आंद्रे आगासी, ग्रेसफुल पॉवरफुल स्टेफी ग्राफ हे माझे अतिशय आवडते खेळाडू. ह्यांचा आपापला एक ऑरा आणि एरा होता. तो संपल्यानंतर दुसऱ्या खेळाडूंनी त्यांची जागा घेत आपली मक्तेदारी निर्माण केली. पण 2003 पासून आपलं अढळ स्थान निर्माण केलेल्या सदतीस वर्षीय बुजुर्ग फेडरर, बत्तीस वर्षांचा नदाल आणि 2007-8 पासून अवतरलेला बत्तीस वर्षांचाच जोकोविच ह्यांना पुरून उरेल असा एकही खेळाडू अजूनही निर्माण होत नाही हेच एक दुःख आहे! ब्रिटनचा अँडी मरे थोडा काळ ह्यांच्या पंक्तीत गणला गेला, पण तोही अंतर्धान पावला. हे तिघे ग्रेटच आहेत, पण नवीन रक्तात त्यांच्याइतकी धमक दिसत नाही. थोडीफार आशा जर्मन झ्वेरेव बंधू, त्सित्सिपास, डॉमिनिक थिएम, मरियन चिलीच ह्यांत दिसते, पाहू.
चला तर मग, औत्सुक्याने भरलेली फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा पाहायला आता टीव्हीकडे वळू या!

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

भाई- व्यक्ती, की वल्ली!



भाई- व्यक्ती, की वल्ली!

~ अमित कालेकर, 10 फेब्रुवारी 2019

(लेख आवडल्यास कॉमेंट आणि शेअर जरूर करा!)


काल 'भाई 2' (किंवा, भाई- व्यक्ती, की वल्ली: उत्तरार्ध) बघितला. पहिल्या भागापेक्षा चांगला आहे. (पहिलाही उत्तमच होता!) ह्या चित्रपटात प्रेक्षकांना इमोशनल केलंय खूप. 'बटाट्याची चाळ'चा जन्म आणि रंगमंचावरचा पुलंचा सहज वावर छान दाखवलाय. 'ती फुलराणी' आणि भक्ती बर्वे-सतीश दुभाषी दाखवलेत. दीप्ती लेले एकदम हुबेहूब भक्ती बर्वेच वाटते! 'आनंदवन', बाबा आमटे ह्यांचा खूप चांगला उल्लेख आहे. पुलं-सुनीताबाईंची भरीव मदत आणि तिथलं त्यांचं वास्तव्य! 'नाच रे मोरा' गाणं बघून डोळे पाणावले! सुनीताबाईंचा मोटार ड्रायव्हिंगचा एक अफाट पैलू आपल्यासमोर येतो! रसिक मित्र 'रामुभैय्या दाते' (प्रसिद्ध गायक अरुण दातेंचे वडील) त्यांच्या इंदोरच्या घरी पुलंना कुमार गंधर्वांसाठी बोलावताना दिसतात. आणि मग वसंतराव, भीमण्णा, माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर (म्हणजेच चंपूताई) ह्यांची रंगलेली मैफल काय बहार आणते!👌पण कुमारांच्या 'अजुनी रुसुनी आहे' गाण्याने मजा नाही आणली. कुमारांचा आवाज आणि ह्या चित्रपटातल्या गाण्यातला आवाज ह्याची तुलना नाही होऊ शकत. एखादं गाणं ओरिजिनलच वापरलं असतं तर चाललं नसतं का? (कदाचित कुमारांचा आजारपणातून उठल्यानंतरचा थोडा खालावलेला आवाज म्हणून तसं केलं गेलं असू शकतं.) कुमार गंधर्वांच्या निधनाच्या बातमीचा प्रसंग परिणामकारक झालाय. 'सखाराम गटणे', 'बबडू' ही पुलंची व्यक्तिचित्रं छान डोकावलीत! बबडूचं चित्र गिरीश कुलकर्णीने मसससस्त उठवलं आहे. बाळ ठाकरे आणि पुलं वाद चांगला दाखवलाय.

पुलं प्रयाग हॉस्पिटलमध्ये आपल्यातून जाण्याचा प्रसंग हेलावून टाकतो. म्हणजे, प्रसंग साधाच घेतलाय, पण आपले इमोशन्स आपल्या डोळ्यात परत एकदा पाणी आणि हुंदका आणतात. दिनेश अमेरिकेतून येण्यासाठीच पुलं थांबले होते. तो सुनीताबाईंच्या भावाचा मुलगा आणि पुलंचा सर्वात लाडका (मानसपुत्रच).

सुधीर फडक्यांसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाचा उल्लेखही भाई (1 आणि 2) मध्ये नाही. (किंवा मी मिस केला का??) पुलंशी त्यांचं तितकं सख्य नव्हतं का? की वाद होता? तीच गोष्ट प्र. के. अत्रेंबद्दल. अत्रेंना निदान एका (छोट्या का होईना) प्रसंगात तरी दाखवलं आहे. सुनीताबाईंनी लेखकाच्या रॉयल्टीबद्दल सुरू केलेली मागणी / प्रथा योग्यच होती. त्याचा प्रसंग छान. त्यामुळे, आणि त्यांच्या काटकसरी स्वभावामुळं 'पुलं फाउंडेशन' कडे चांगली रक्कम साठत गेली, आणि त्याचा अतिशय योग्य विनिमय पुलं आणि सुनीताबाईंनी पुढील आयुष्यात असंख्य समाजसेवी संस्थांना देणग्या देऊन केला. पुलंनी 'NCPA' सारख्या ख्यातनाम संस्थेची स्थापना मुंबईत JRD टाटांसोबत केली. पुलं फाऊंडर मेंबर आणि डायरेक्टरही होते, पण त्याचाही उल्लेख टाळण्यात आलाय. पुलंची अफाट गाजलेली प्रवासवर्णनं (अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्यांच्या देशा इत्यादी) ह्यांचा उल्लेख चित्रपटात यायला हवा होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा तो खूप मोठा पैलू होता. 1977 च्या आणीबाणीनंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीतल्या प्रचारसभांतला पुलंचा सक्रिय सहभाग छान दाखवलाय. 'इरावती हर्षे'ने सुनीताबाईंच्या भूमिकेचं सोनं केलंय!👌 'सागर देशमुख'ने पुलं खूप मस्त उभे केलेत. अगदी शेवटच्या पुलंचा आवाजही त्याचाच. 

काल आम्ही सिटी प्राईड कोथरूड थिएटरमधून चित्रपट पाहून बाहेर पडताना 'भाई'चे दिग्दर्शक महेश मांजरेकर त्यांच्या गाडीतून थिएटरमध्ये शिरले, तेंव्हा त्यांचं ओझरतं दर्शन आम्हाला घडलं!👍

अजून एक चित्रपटाचा भाग करून त्यात पुलंचे अजून थोडे पैलू दाखवता आले असते, तर छान वाटलं असतं. हा चित्रपट आहे, डॉक्युमेंटरी नाही हे बरोबर आहे, पण काही प्रसंग हवे होते हे मात्र निश्चित. पण शेवटी दिग्दर्शक / निर्मात्याची इच्छा. अजून एक म्हणजे पुलं चा काळ 2000 पर्यंतचा. आज 18/19 वर्षानंतर काही पात्रांबद्दल लोकांना विस्मरण व्हायची शक्यता आहे. ते नीट समजण्यासाठी त्यांच्या एन्ट्रीला एकेक छोटंसं टायटल दाखवलं गेलं असतं तर बरं झालं असतं असं माझं आपलं मत.


माझं रेटिंग 3.5 / 5.

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

टेकडीवरची धाव!

टेकडीवरची धाव!
~ अमित कालेकर, 9 डिसेंबर 2018


आज 9 डिसेंबर, म्हणजेच इंटरनॅशनल माउंटन डे (IMD) च्या निमित्ताने गिरिप्रेमी ह्या नावाजलेल्या (2012 मध्ये एव्हरेस्ट सर केलेली संस्था) संस्थेने IMD मॅरेथॉनचं आयोजन पुण्यात ARAI टेकडीवर केलं होतं. मी गेले बरेच महिने गुडघेदुखीमुळं मॅरेथॉन्स धावू शकत नव्हतो. साधी प्रॅक्टिससुध्दा सुरू नव्हती. ह्याआधी बऱ्याच 10 किलोमीटर मॅरेथॉन्स धावलोय पण गुडघेदुखी बरीच वाढली होती. पण ह्या स्पर्धेच्या निमित्ताने परत फिटनेस रेजीम सुरू करावा असा विचार केला. मग गेल्या 15 दिवसात ऑलमोस्ट रोज संध्याकाळी घराजवळील MIT कॉलेज ग्राऊंडवर 2 - 3 km रनिंग आणि थोडे स्ट्रेचिंग - रिलॅक्सिंग व्यायाम सुरू केले. रात्रीची लवकर झोपही स्ट्रिक्टली सुरू केली (10 pm). (हे म्हणजे परीक्षेला 5-6 दिवस असताना रात्रीचा दिवस करून अभ्यास करण्यासारखे आहे!) आयोजकांनी फक्त बिब आणि टोपी दिली ते बरे झाले, आधीचेच खूप मॅरेथॉन टी-शर्ट्स जमलेत!

आज पहाटे 6:10 ला पत्रकार नगरच्या कामायनी मुनोत हॉलमध्ये जमलेल्या सगळ्या उत्साही धावकांकडून स्ट्रेचिंगचे व्यायाम उत्तमपणे करवून घेतले गेले. त्यामुळं खूप मदत झाली! माझ्या ऑफिसमधला एक मित्रही त्याच्या मुलासकट आज आला होता. शिवाय, आयोजकांमध्ये माझ्याच ऑफिसच्या 2 जणांचा समावेश होता.
6:35 ला फ्लॅग-ऑफ झालं. पोलीस कॉलनीजवळचा पहिलाच चढ सगळ्यात मोठा! खूपच दमछाक करणारा! थोडं चालत, थोडं(च!) पळत एकदाचा वरती ARAI च्या मारुती मंदिरापाशी पोचलो. एक मोठा वळसा घालून ARAI प्लँटच्या मागल्या बाजूने मातीच्या रस्त्यावर रनिंग सुरू. हा रस्ता नयनमनोहर आहे! दुतर्फा खूप झाडी, पुण्यात इतर ठिकाणी न लाभणारी अशी शांतता, आणि डिसेंबरचा (पण थोडासाच!) गारवा! हे एक मिनी जंगलच! अजून पुण्याची ती प्रसिद्ध थंडी पडलेलीच नाहीय! त्यामुळे मी जॅकेट / जर्कीन वगैरे घालून नव्हतो आलेलो. पण हा टरेन दमवणारा आहे. मग परत एक मोठा चढ, आणि परत दमछाक! वाटेत 2-3 ठिकाणी पाण्याचे स्टॉल्स ठेवलेले होते. स्वयंसेवक नाक्यानाक्यावर प्रोत्साहित करत होते, फोटोजही काढत होते. (पण त्यामुळे मला थांबता येत नव्हतं! सतत पळावं लागत होतं!) स्वतःशी संवाद साधत धावता येतं इथं. शरीराच्या कुठल्या अवयवांचा नक्की किती फिटनेस आहे तेही आजमावता येतं! शेवटीशेवटी माझा डावा पाय गुडघ्याखालीपासून पावलापर्यंत जाम दुखत होता. मे बी, माझंच पळण्याचं टेक्निक कुठंतरी चुकत असेल. शेवटचा उताराचा पॅच मी जोरात धावत पूर्ण केला (म्हणजे मी काहीच केलं नाही, फक्त ग्रॅव्हिटीपुढे स्वतःला झोकून दिलं!) आणि
अखेर 1 तास 16 मिनिटे घेतल्यावर मी परत मुनोत हॉलपाशी पोचलो आणि 10 किलोमीटरची ही आयुष्यातली आजवरची सर्वात खडतर रेस पूर्ण केली! गळ्यात मेडल पडलं तो काहीतरी चांगलं मिळवल्याचा क्षण खूप छान होता, ही धाव माझ्या कायम स्मरणात राहील! गिरिप्रेमीला छान आयोजनासाठी धन्यवाद! तसेच त्यांना त्यांच्या कांगचेनजुंगा (आपण कांचनगंगा म्हणतो!) एक्स्पिडिशनसाठी शुभेच्छा!
आजचे मला मिळालेले काही टेक-अवेज् ..:
स्वतःला कधीही कमी समजू नये, स्वतःवर विश्वास ठेवा.
आपल्यापुढच्या धावकाला मागे टाकण्याचा सतत प्रयत्न करावा.
निदान मागे असलेल्या स्पर्धकांना तरी आपल्यापुढे जाऊ न देण्याइतपत धावत राहावं!
रनिंगदरम्यान थोडं थोडं पाणी पीत राहावं.
आयोजकांनी पाणी ठेवलं आहे का त्याची चौकशी करून, नसेल तर स्वतःचं पाणी बाळगावं.
ह्या रेसमुळे मला आता हाफ मॅरेथॉन (21 km) करण्याची स्फूर्ती मिळालीय!
सर्वात महत्वाचं म्हणजे दररोज थोडासा का होईना व्यायाम करावाच. कोअर स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यात 2 दा झालं पाहिजे. म्हातारपण येणं थोडं लांबतं!

(लेख आवडल्यास कंमेंट, शेअर करा! गूगल लॉगिन असल्याने अजून वेगळं लॉगिन करायची गरज नाही.)

शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

हॅम्लेट!


हॅम्लेट

~ अमित कालेकर, 2 नोव्हेंबर 2018 (तुमची टिप्पणी जरूर पोस्ट करा!)

20 ऑक्टोबरला दसऱ्याच्या सुट्टीदरम्यान पुण्यात दुपारी 12 वाजता हॅम्लेट नाटक पाहिलं, बालगंधर्वला. हाऊसफुल्ल हो!
खूप छान केलंय हे मराठीतील हॅम्लेट. चंद्रकांत कुलकर्णींचं उत्कृष्ट दिद्गर्शन, अष्टविनायक आणि जिगिशाचं प्रेझेंटेशन आणि झी मराठीची निर्मिती.

तुषार दळवी क्लॉडियस (हॅम्लेटच्या बापाचा लहान भाऊ, जो नंतर कपटाने राजा बनतो), मुग्धा गोडबोले गरट्रुड (राणी), सुनील तावडे पोलोनीयस, मनवा नाईक ऑफिलिया (पोलोनियसची मुलगी आणि हॅम्लेटची प्रेयसी), मराठीतला उगवता हँडसम नायक भूषण प्रधान लियाटस (ऑफिलियाचा भाऊ) ह्यांनी मुख्य भूमिका छान केल्यात!  इतर भूमिका करणारे नटही छान वावरलेत, उदा आशिष कुलकर्णी (हॅम्लेटच्या बापाचं भूत किल्ल्याच्या तटबंदीवर पहिल्यांदा पाहणारा हॅम्लेटचा मित्र, होरॅशिओ). नेपथ्य, प्रकाशयोजना आणि ध्वनी केवळ लाजवाब.

आणि, हॅम्लेटच्या भूमिकेत सुमित राघवन अक्षरशः घुसलाय!अप्रतिम काम, हॅट्स ऑफ!

आणि हे सगळं थेटरात पहिल्या रांगेत बसून पाहायला मिळणं हा किती भाग्याचा अवसर! (अर्थात, हजार रुपये तिकिटं थोडं दडपण आणतंच म्हणा! पण, वर्थ इट) महिनाभर आधी आईने तिकिटं बुक करून ठेवली होती, शेजारच्या काकूंना सांगून.

शेक्सपिअरच्या ओरिजिनल जडजम्बाळ इंग्रजीतल्या वाक्यांचं मराठीत, आणि तेही अर्थ न बदलता भाषांतर करणं किती अवघड काम, पण नाना जोगांनी खूप छान केले आहे ते. राहुल रानडेंचं म्युझिक मस्तच! किती वर्षांनी 3 अंकी नाटक मराठीत पाहायला मिळालं! नाहीतर हल्ली 1 किंवा 2 अंकीच असतात बहुधा. आणि ह्या भल्या मोठ्या लांबलचक वाक्यांचे संवाद बिनचूक, भाव पकडून, बेअरिंग मध्ये राहून सादर करायला सर्वच पात्रानी, विशेषतः सुमितने काय मेहनत घेतली असेल,
सही!!!

लहानपणापासूनच शेक्सपिअर माहीत असतो आपल्याला. पण त्याची नाटकं आवर्जून वाचावीत हे कधी सुचलं नव्हतं मला. त्यात ती जुनी अवघड इंग्रजी, आणि खेळण्यातून वेळ कुठला मिळायला! त्यामुळं फक्त "टु बी ऑर नॉट टु बी, दॅट इज द क्वेश्चन" हेच वाक्य फक्त ठाऊक. बाकी काही माहीत नव्हतं. आणि हो, ते हॅम्लेटच्या बापाचं भूत! पण काहीही काँटेक्स्ट नाही. म्ह्णून मग असं मायमराठीतलं नाटक आवर्जून बघावंस वाटलं. आणि असला कलाकार वर्ग! मक्काय हो!
नाटकातले म्युझिक पीसेस बरेचसे बीथोवन - मोझार्ट च्या सिंफनीतले आहेत ... आता युट्यूबवर बघणार / ऐकणार मी त्या सिंफनीज!
त्या प्राचीन काळच्या चालीरीती, संगीत, कपडे यांचं खूप छान असं सादरीकरण आहे हे नाटक. शेवटी एक छोटंसं द्वंद्वयुद्ध (तलवारबाजी)ही आहे नाटकात. हॅम्लेट आणि लियाटसमधलं. ते पाहताना त्यामागचे कष्ट समजून येतात. आणि शेवटी सगळेच जण या ना त्या कारणाने एकामागोमाग एक मरतात. शोकांतिकाच आहे ही.
हॅम्लेटचे पुढचे प्रयोग 12 ते 14 नोव्हेंबरला मुंबईत आहेत हो sssssss!

बुधवार, १ ऑगस्ट, २०१८

पासपोर्ट!

पासपोर्ट डिपार्टमेंटच्या कार्यक्षमतेची कमाल!

~ अमित कालेकर, 1 ऑगस्ट 2018, पुणे (Do like and comment!)

शुक्रवारी, 27 जुलैला आईच्या पासपोर्ट रिन्युअलची अपॉईंटमेंट घेतली. (अगदी, कार्यालयीन मराठीतच लिहायचं, तर 'पारपत्राच्या नूतनीकरणाची आगाऊ वेळ'! पण असं लिहिलं तर हल्ली किती जणांना कळेल?? 😀 जाऊद्या, इंग्रजाळलेल्या भाषेतच लिहितो!) ऑनलाइन फॉर्म भरला, तोही फक्त 15 मिनिटांत. पासपोर्ट अजून काही दिवस व्हॅलीड असल्याने फक्त आधार कार्ड आणि पासपोर्ट नंबर टाईप करावा लागला. (आधार व्हॅलीडेशन पण अक्षरशः एका मिनिटात ऑनलाईन होतं! UIDAI साईटची त्वरित संलग्नता!) इतर कुठलेही डॉक्युमेंट्स नाही लागले.
अपॉइंटमेंट नॉर्मल घेतली, तात्काळ नाही. पण, सोमवारची, म्हणजे 30 जुलै, 3:30 PM ची मिळाली. एकच दिवसानंतरची! (शनिवार-रविवार नका हो लगेच मोजून '3 दिवस की हो', असे म्हणू! पासपोर्ट ऑफिसलाही 5 वर्किंग डेज आहेत!) अपॉईंटमेंट घेतानाही, आपण आपल्याला हवी ती तारीख निवडू शकतो. आणि एकदा घेतलेली अपॉईंटमेंट आपल्याला जमत नसल्यास अजून एकदा पोस्टपोन करून मिळू शकते.
आई-पप्पा सोमवारी जरा लवकरच, म्हणजे पावणेतीनलाच मुंढवा ऑफिसात पोचले. MSEB बिल, 2-3 फोटोज वगैरे घेऊन. तर, त्यांना लगेचच आत घेतले. सव्वातीनला प्रोसिजर पूर्ण होऊन ते बाहेरही पडले! आतमध्ये 4-5 टेबलांवर जाऊन काही कागदपत्रे, फोटोज काढणे, डॉक्युमेंट स्कॅनिंग वगैरे अशी काहीशी ती प्रोसेस असते. बरोबर आणलेली इतर कागदपत्रे, फोटोसुद्धा लागले नाहीत, फक्त पासपोर्ट आणि आधार कार्ड बास.
आणि, आश्चर्याचा शेवटचा धक्का म्हणजे आज, बुधवार 1 ऑगस्टला पासपोर्ट घरपोच आलाही!!!

जबरदस्त काम! 👌🏼👌🏼👌🏼 कशाला हवंय तात्काळ! किंबहुना, आता असं म्हणावंसं वाटतंय, की तात्काळ केलं असतं, तर पासपोर्ट तिथेच सोमवारी आईच्या हातातच दिला असता!!

प्रायव्हेटायझेशनचा हा एक अतिशय उत्कृष्ट नमुना! थँक्स गव्हर्नमेंट आणि TCS कंपनी, अतिशय कार्यक्षम गव्हर्नन्स! 👌👌👌👌आणि, ह्या सगळ्या कामाची फी फक्त ₹ 1,500/-. इतक्या जलदगतीने जर आपलं काम होत असेल तर ते खरंच वर्थ!

ता.क.: जर का व्हॅलीड पासपोर्ट नंबर मी ऑनलाइन फॉर्म भरताना  दिला, तर .... तो अर्ज भरायला मला 15 मिनिटं तरी का लागावीत! 😀😀😀 आमची सगळी माहिती तर आहेच की पारपत्र कार्यालयाकडे! (आता, ह्याला म्हणतात, मूर्तिमंत हावरटपणा! आणि म्हटलं, की माझ्या ह्या लेखाचा शेवटही मायम्हराटीतच करावा! रेडिओ fm 95 वर हल्ली म्हणे सलग 30 सेकंद मराठीत, एकही इंग्रजी शब्द न उच्चारता बोललं, तर चांगलं बक्षीस मिळतं! इच्छुकांनी / जाणकारांनी 'अख्ख्या पुण्यात वर्ल्ड फेमस' असलेल्या त्या 'RJ बंड्याला' फोन ... चुकलं ... दूरभाष / भ्रमणध्वनी लावावा!)




शनिवार, २६ मे, २०१८

डॉ. लागूंची भेट!


डॉ. लागूंची भेट!

अमित कालेकर, 26 मे 2018, वेताळ टेकडी, कोथरूड पुणे
(Do like and comment!)


ARAI टेकडीवर मी तसा नेहमीच जातो. तिथं अतिशय नित्यनेमाने ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व नटसम्राट डॉ. श्रीराम लागू संध्याकाळी येऊन एका ठरलेल्या बाकावर बसतात. आणि मला दिसतातही, पण मी त्यांना कधी डिस्टर्ब करायला जात नाही. पण काल वाटलं. मग त्यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांच्या पायाशी बसलो. त्यांच्या शेजारी दीपा लागूही बसल्या होत्या ... दोघांनी माझी आस्थेने चौकशी केली. नावगाव विचारलं. कुठले तुम्ही? काय करता? वगैरे वगैरे.

'तुमच्याबरोबर एक फोटो काढू का' असं विचारल्यावर लगेच हो म्हणाले! दीपा लागूंनी लगेच केस सारखे करत छान पोझ दिली!

दीपा लागू म्हणाल्या, 
तुम्ही रेग्युलर व्यायामाला येत नाही 😄 यायला पाहिजे तुम्ही. इतक्या जवळ राहता टेकडीच्या!

आपले सोनारानेच का कान टोचले पाहिजेत नेहमी?? 😟

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

बाबासाहेब पुरंदरे

बाबासाहेब पुरंदरे

~अमित कालेकर, 24 डिसेंबर 2017 (Do like and comment!)

21 आणि 23 डिसेंबरला 'अफझलखान' या विषयावर इतिहासकार आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदऱ्यांची व्याख्यानं आयोजित केली होती त्यामुळं ऑफिसातून लवकर (6 ला) येऊन ती ऐकायची होती. ते नेहमीप्रमाणेच वेळेपूर्वी स्थानापन्न झालेले! मला मात्र 5 मिनिटे उशीर. माझ्याआधी थोडा उशीर झालेल्या एका लहानग्याला त्यांनी धारेवर धरलं होतं (त्यामुळे मी वाचलो!). दिलेलं वचन आणि दिलेली वेळ पाळणं सर्वात महत्त्वाचं हे ते सांगतात. नेताजी पालकरसारख्या आपल्या सर्वात शूर, विश्वासू सहकाऱ्याला, सरसेनापतीला शिवाजी महाराजांनी महत्वाची वेळ पाळली नाही आणि त्यामुळे एका मोठ्या लढाईत सपशेल अपयश आलं म्हणून बडतर्फ केलं हेही बाबासाहेब आवर्जून सांगतात. अफझलखान हा विषय आपल्याला नवा नाही. शिवचरित्रातल्या असंख्य रोमहर्षक प्रसंगांपैकी तो वरच्या काही प्रसंगांत मोडेल. शालेय चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातही तो होताच. आमचे नूमवी सोलापूरचे तडसरे सर काय पोटतिडिकीने शिकवत इतिहास! 👌 मला त्या प्रसंगातले आणखी काही बारकावे ऐकण्याची इच्छा होती. आणि बाबासाहेबांनी निराश नाहीच केले! अफझलखान स्वराज्यावर स्वारीस आला, तो पुण्याच्या ऐवजी सोलापूर-हैदराबाद-नळदुर्ग भागाकडे आधी गेला, हे माहीत आहेच. पण तिकडं तो नक्की कुठं कुठं आणि कसा गेला, त्याचं नेमकं पर्पज काय होतं आणि महाराजांनी ते कसं आधीच हेरलं होतं ते बाबासाहेबांनी सविस्तर सांगितले. कसे? तर आपल्या थरथरत्या हातात मॉडर्न स्टाईलचा व्हाईटबोर्ड मार्कर घेऊन नकाशा काढत! अगदी छोट्या गावांच्या आणि तिथल्या देवळांच्या नाव आणि महात्म्यासह. काय अचाट स्मरणशक्ती! पुराव्याशिवाय एक शब्दही ते बाहेरचा बोलत नाहीत. महाराष्ट्राच्या कुठल्याही भागाचा उल्लेख नुसता मोठ्या गावाने न करता त्याच्या आजूबाजूस असलेल्या छोट्या गावांची नावे, तिथले शिवरायांचे शिलेदार, त्यांची त्या त्या प्रसंगाच्या वेळची वयं, त्यांचे व्यवसाय, त्यांचं सामान्यत्व, त्यांची मनस्थिती, त्यांचे भाऊबंद, त्यांचा स्वराज्याला वेळोवेळी झालेला उपयोग ... किती किती डिटेल्स! शिवाय अस्सल पुरावे. आणि ते कुणी कधी दिले ह्याचेही तारीखवार वर्णन! शिवाजी राजाने ह्या सामान्य जनतेकडून किती असामान्य दर्जाची कामगिरी केवळ आपल्या शब्दाने आणि प्रभावाने करवून घेतली! हा संदेश बाबासाहेब सतत आपल्यापर्यंत पोचवतच राहतात. त्यांचं कळकळीचं म्हणणं असतं, की शिवचरित्र हे फक्त मनोरंजन नाही. फक्त तोडलेली बोटे, बिचव्याने काढलेला कोथळा, पेटाऱ्यातून पलायन ह्या रोमांचक प्रसंगापुरते मर्यादित नाही. वेळेचा, परिस्थितीचा, माणसांचा, साधनसामुग्रीचा पुरेपूर वापर कसा करावा, शिवचरित्राचा बोध घेऊन सर्वांनी वागले पाहिजे, राष्ट्रवाद सर्वात महत्वाचा, स्वयंशिस्त अतिशय महत्त्वाची हे विचार बाबासाहेब आपल्यात रुजवू इच्छितात. त्यासाठी ते शिवचरित्रापलीकडेही जाऊन नेपोलियन, महायुद्धं, असंख्य पौराणिक दाखलेही देतात. पुराणातली वांगी असं म्हणून सोडून न देता ते कृष्ण आणि शिवाजी ह्यांची तुलना करतात. शिवाजी हा कृष्णाचा सच्चा अनुयायी होता, असे ते आपल्याला अनेक प्रसंगांतून पटवून देतात. राष्ट्रधर्म दोघांच्यात ठासून भरला होता हे सांगतात. त्यासाठी नीती-अनीतीच्या पलीकडे जाण्यासही दोघे कसे कचरले नाहीत हेही उदाहरणे देऊन सांगतात. कृष्णाने अर्जुनाला चाक रुतलेल्या स्थितीत असलेल्या कर्णाला 'हीच ती वेळ, तू त्याला आत्ताच मार' असं सांगत नीती अनितीचा विचार करण्याची ही वेळ नाही, ते नंतर बघू असं सांगितलं, आणि शिवाजींनीसुद्धा ह्याचा अवलंब करून शत्रूला नामोहरम केलं हेही सांगितलं. कमीतकमी साधनसामुग्री, माणसं, युद्धसाहित्य असूनही केवळ परफेक्ट युद्धनीतीच्या जोरावर शिवाजी कसा सर्वांपेक्षा वरचढ, विजयी कसा होत गेला ह्याची असंख्य उदाहरणे ते देतात. त्याचवेळी इतर अनेक शूरवीरांना, राजांना त्यांच्या महत्वाकांक्षी मोहिमांमध्ये का अपयश आलं (ते योग्य ती स्ट्रॅटेजी नसल्याने) त्याचा अभ्यास ते आपल्यापुढे मांडतात. संख्याबळ कधीच शिवाजीच्या बाजूला नव्हते. होती ती फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मावळ्यांमध्ये जागवलेली स्वामी आणि राष्ट्रनिष्ठा. दर वेळी वेगळा आणि अधिक प्रबळ, मातब्बर शत्रू असूनही शिवरायांची नीती सतत वेगळी असल्यामुळे ते सतत अन्प्रेडिक्टेबल होत राहिले. अफझलखान विजयाची खात्री करून घेऊन नंतर पुढं काय, कसं, कुणी, कधी, कुठं करायचं ह्याची तपशीलवार योजना तयार असल्यामुळे फक्त 10-15 दिवसात शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा प्रचंड मुलुख काबीज केला आणि आदिलशाही मोडकळीस आणली. त्या प्रसंगात महाराजांचं काही बरेवाईट झालं असतं, तरीही ही योजना 100% सफल झालीच असती ह्या लेव्हलचं हे प्लॅनिंग होतं.
ह्या वयातही बाबासाहेबांच्या आवाजातल्या तेजाला तोड नाही. शिवाजी म्हटलं की ते विशीपंचविशीचेच होऊन जातात! शिवरायांचं हेरखातं हा तर त्यांचा एक अतिशय आवडीचा आणि अभिमानाचा विषय आहे. बहिर्जी नाईक आणि इतर सर्वांबद्दल ते अतिशय औत्सुख्याने बोलतात, त्यांचे डिटेल्स आणि महानता ते आपल्याला भरभरून सांगतात. बहिर्जी हा गागाभट्टाच्या बुद्धिमत्तेचा होता, त्याचा जातधर्म कुठला होता हे गौण आहे असेच त्यांचे म्हणणे आहे आणि ते सर्वार्थाने खरेही आहे.
बाबासाहेब त्यांच्या शारीरिक उमेदीच्या वर्षांत सगळा मुलूख स्वतः पायी / सायकल / ST / गाडी असा हिंडलेत. रायगड राजगड सिंहगड आणि इतरही असंख्य किल्ल्यांच्या त्यांनी अगणितवेळा वाऱ्या केलेल्यात! त्यांचं वाचन अफाट आहे. शिवकालीन पुरावा सापडलाय असं कुणी म्हटलं तर आजही वयाच्या 95 व्या वर्षी ते धावत जाऊन तो आपल्याकडे खेचून आणू शकतील! त्यांचा शिवाजीबरोबरच त्यावेळच्या इतर सर्व इतिहासावर तितकाच दांडगा अभ्यास आहे. त्यांना पेशवेकालीन इतिहासही अवगत आहे. तसाच विजयनगर, बहामनी राज्य ह्यावरही ते खूप लिहू बोलू शकतात, किंबहुना त्यांनी लिहिलंही असेल! त्यांनी 'शिवाजीची वाघनखं' ह्यावर स्वतः एक लेख सुमारे 40 वर्षांपूर्वी लिहिला होता हेही आम्हाला सांगितले! (ती वाघनखं आता लंडनमध्ये म्युझियममध्ये आहेत.) शिवाजी महाराजांच्या 'भवानी तलवारी'बद्दलही, ती कुठं बनवली (स्पेनमध्ये), काय मटेरियलची (पोलाद) होती हेही ते सांगतात.
बाबासाहेबांची मराठीसारखीच इंग्लिशवरही खूप पकड आहे. अफझलखानाने लपवून आणलेली 'कृपाणिका' उजव्या हाताने उगारून महाराजांवर त्यांच्या उजव्या बगलेत पहिला वार केला असे सांगताना त्यांनी कृपाण म्हणजे मोठी तलवार आणि कृपाणिका हे त्याचं 'diminutive' असून त्याचा अर्थ छोटी तलवार आहे असं, ती किती असू शकेल हे तळहाताच्या मापाने दाखवत सांगितलं! किती बारीक वर्णन! तो वार महाराजांच्या चिलखतामुळे निष्प्रभ ठरला हे समजल्यानंतर त्याने दुसरा घाव घालण्यासाठी हात उगारला, तेंव्हा तो वार कुठं घालावा ह्याच्याबद्दल त्याच्या मनात काय होतं हेही बाबासाहेबांनी सांगितलं! भेटीची वेळ (म्हणजे दुपारचे 2) काय ठरली होती आणि नक्की कितीला घडली त्याविषयीसुद्धा त्यांनी एक अस्सल दाखला (बखरीतलं वाक्य) जसाच्या तसा सांगून टाकला. 
(हा लेख बायकोला व्हाट्सअपवर पाठवला तेंव्हा तिला 'Read more' लिंक दिसली! गमतीने मी तिला म्हणालो की आज मला पहिल्यांदा पुरवणी घ्यावी लागलीय!)
ह्या विषयावर कितीही लिहिलं तरी ते अपुरं ठरेल. म्हणून इथंच थांबतो, आणि बाबासाहेबांना असंच पुढं अनेक वर्षं ऐकत राहण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य आणि स्वास्थ्य चिंततो!